मी इम्तियाज इमामुद्दिन सिद्दिकी.माझे शिक्षण एम.एस्सी.बी.एड. झाले असून मी गेली 14 वर्षे तालीमी इमदादिया कमिटी, मुंबई , रत्नागिरी, संचलित मिस्त्री हायस्कूल, रत्नागिरी या प्रशालेत सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. माझी उर्दू माध्यमाची शाळा असून सुमारे 550 विद्यार्थी माझ्या शाळेत शिकतात आणि मी या शाळेत विज्ञान आणि गणित विषय शिकवतो.
शिक्षक का आणि कधी व्हावेसे वाटले?
माझे वडील मौलवी (धार्मिक गुरु) होते. ते त्यांच्या विद्यार्थ्यानां धार्मिक शिक्षण देत ,आणि माझी मोठी बहीण प्राथमिक शिक्षिका होती. माझ्या लहानपणापासूनच शिक्षकांविषयी असणारा आदर , मान सन्मान मी माझ्या घरी पाहत होतो. तेव्हापासूनच शिक्षक बनण्याची इच्छा मनात निर्माण झाली होती. एकदा इयत्ता दहावीत असताना मुख्याध्यापकांनी मला प्रश्न विचारले कि मोठा होऊन काय बनशील तेंव्हा मी मोठ्या आभिमानाने सांगितले कि मी शिक्षकच होणार. आणि मी जे लहानपणीच ठरवले होते तेच स्वप्न मी पूर्ण केले.
सुरुवातीला ‘शिक्षक’ हे क्षेत्र निवडताना काही अडचणी आल्या का?
अडचणी अशी नाही पण एकदा आपण करिअर वेगळे निवडावे का? हा विचार मनात नक्की आला होता. एकदा महाविदयालयीन जीवनात वक्तृत्व स्पर्धा करत असताना मनामध्ये पत्रकार होण्याचा विचार येऊन गेला. शिवाजी विद्यापीठात जर्नालिझमला ॲडमिशन घेण्यासाठी ठरवलं पण माझे गुरुवर्य इक्बाल मोमिन सर आणि माझी मोठी ताई जकिया सिद्दिकी यांनी माझं समुपदेशन केलं, आणि पुन्हा एकदा मी शिक्षक व्हावं यासाठी मार्गदर्शन केलं आणि त्यात त्यांना यशही मिळालं. लहानपणी मी पाहिलेलं स्वप्न पुन्हा एकदा मला आठवलं आणि मी करियर फेजमध्ये असताना शिक्षक होण्याचे ठरवले.
शिक्षक म्हणून 14 वर्षांच्या प्रवासातील असे काही क्षण/अनुभव जे अविस्मरणीय आहेत
जेव्हा मी शिक्षक झालो तेव्हापासून आतापर्यंत अनेक अविस्मरणीय क्षण माझ्या आयुष्यात निर्माण झाले आहेत. काही बहुमूल्य क्षण यानिमित्ताने मी इथे व्यक्त करू इच्छितो ज्यावेळी पहिल्यांदा सातारा येथे शिक्षण परिषद झाली होती त्यावेळी मी रत्नागिरी जिल्ह्याचा विज्ञान विषयाचा प्रतिनिधी म्हणून गेलो होतो मी माझं प्रेझेंटेशन अत्यंत चांगल्या पद्धतीने सादर केलं, आणि स्वतः त्यावेळचे शिक्षण सचिव नंदकुमार साहेबांनी माझ्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आणि आपण शिक्षक झाल्याचं समाधान मला तेव्हा वाटलं. रत्नागिरी जिल्ह्याचा मोठा सन्मानाचा शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल संस्कृती सन्मान 2019 या पुरस्काराने पहिल्यांदा एक आदर्श शिक्षक म्हणून सन्मानित झालो. आयुष्यातला आणखी एक महत्त्वाचा क्षण म्हणजे लॉक डाऊन परिस्थितीमध्ये ज्या वेळी शाळा बंद होत्या विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणणे अवघड होते अशावेळी त्यांना ऑनलाईन शिक्षण देणे, त्यांच्यासाठी वह्या पुस्तकांची सोय करणे , कोरोना सारख्या महामारी मध्ये कोरोनाच्या शासनाने नेमून दिलेल्या विविध ड्युटी करणे, या सर्व कार्याची दखल घेत एस. आर .दळवी फाउंडेशन यांनी घेतली आणि कोरोना कालावधीत केलेल्या कार्याचा सन्मान केला हा एक अविस्मरणीय क्षण म्हणून माझ्या आयुष्यात राहील राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते एवढा मोठा सन्मान होणे शिक्षक म्हणून या गोष्टीचा अभिमान नेहमीच राहील.
तुमची आतापर्यंतची मोठी Achievement कोणती?
राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते शैक्षणिक वर्ष 2020- 21 मध्ये लॉकडाऊन परिस्थिती केलेल्या कार्याबद्दल एस.आर. दळवी फाउंडेशन च्या वतीने झालेला सन्मान ही माझी सर्वात मोठी Achievement आहे.
तसेच सलग सहा वर्षे शैक्षणिक साहित्य निर्मिती मध्ये विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवणे हा ही माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे.
समाजात शिक्षक-विद्यार्थी यांच्यासाठी अजुन काय बदल होण्याची गरज आहे अस वाटते?
आज वेळ आणि काळ बदललेला आहे.आताच्या या डिजिटल युगामध्ये अनेक माध्यमांच्या माध्यमातून विद्यार्थी बरच काही शिकत आहेत. शिक्षकाने स्वतःला अपडेट करून घेणे ही काळाची गरज आहे विद्यार्थी आणि शिक्षक हे नातं मैत्रीचा असावं तसेच बदलत्या शैक्षणिक प्रवाहात विद्यार्थ्यांमध्ये बदल घडवायचा असेल, विद्यार्थ्यांना आजच्या जगाच्या माणसांबरोबर खांद्याला खांदा लावून चालवायचा असेल तर त्यासाठी आपणही आपण ही वैश्विक विचारसरणी अमलात आणणे गरजेचे आहे त्यासाठी जागतिक स्तरावरची शिकवण्याच्या नवीन पद्धती काय आहेत याचा विचार आणि मंथन करून त्याची अंमलबजावणी आपल्या शिकवण्याच्या पद्धतीत करणे ही काळाची गरज आहे.
ज्यांना शिक्षक व्हायचे आहे त्यांना तुम्ही काय सल्ला दयाल?
खरंतर शिक्षकी पेशा हे प्रत्येक काळात टिकणार आहे पण बदलत्या काळाबरोबर शिक्षकाच्या विचारसरणीला सुद्धा बदलणे गरजेचे आहे त्यासाठी फक्त डी .एड .आणि बी .एड. या डिग्री वरती मर्यादित न राहता स्वतःला डिजिटलाईज करणे हे नवीन शिक्षकांसाठी काळाची गरज आहे. नवीन शैक्षणिक धोरण 2020 येत आहे त्याच्यामध्ये शिक्षणाची पद्धत बदलणार आहे जो समर्पक असेल तोच टिकेल भविष्यात आव्हाने खूप आहेत शिक्षकी पेश्यात जो स्वतःला विद्यार्थी समजत असेल आणि नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करायची तयारी असेल तोच भविष्यात एक चांगला शिक्षक म्हणून टिकेल.