Anosmia: Does air pollution impair the ability to smell?
मातीवर पावसाचे पहिले थेंब, उमललेली फुलं, एखादं छान परफ्युम, आईच्या हातचं जेवण आणि लीक होणारा गॅस… या सगळ्यांमध्ये काय साम्य आहे? गंध. पदार्थाची चव असो किंवा धोक्याची सूचना. वास घेण्याची क्षमता माणसाला जगण्यासाठी फार महत्त्वाची आहे.
अॅनोस्मिया म्हणजे काय?
वास घेण्याची क्षमता जाणं याला ‘अॅनोस्मिया’ म्हणतात. काही आजारपणांमुळे किंवा सतत सिगरेट ओढणाऱ्या व्यक्तींना हा त्रास होऊ शकतो.
पण अलीकडे अनेकांना बरेच दिवस तोंडाची चव गेली आहे किंवा वास घेण्याची क्षमता कमी झाली आहे, असा त्रास जणावतो आहे, विशेषतः शहरी भागात.
कोरोना विषाणूसारखा संसर्ग, ऋतू बदलताना झालेलं सर्दी-पडसं, तुम्ही घेतलेली औषधं, काही व्हिटॅमिन्सची कमतरता यांमुळे तात्पुरतं असं होऊ शकतं, असं डॉक्टर्स सांगतात.
पण वायू प्रदूषणामुळे आणि विशेषत: हवेतील पार्टिकयुलेट मॅटर म्हणजे धुलीकणांमुळेही कायमचा अॅनोस्मिया होत असल्याचं नव्या संशोधनातून समोर आलं आहे.
प्रदूषणामुळे नाकावर कसा परिणाम होतो?
वास घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होण्यामागे मुख्य कारण आहे हवेतील पार्टिक्यूलेट मॅटर अर्थात PM 2.5 हे धुलीकण, ज्यांचा आकार मानवी केसाच्या व्यासापेक्षाही कित्येक पटींनी कमी असतो.
जीवाष्म इंधनाच्या ज्वलनातून आणि बांधकामादरम्यानही मोठ्या प्रमाणात धुलीकण हवेत सोडले जातात आणि त्यामुळे फुप्फुसाचे विकार होतात, हे तुम्ही आधी वाचलं असेल. हे धुलीकण नाकावाटे शरीरात शिरल्यावर घ्राणेंद्रियावर दोन प्रकारे परिणाम करतात. ते इथल्या मज्जातंतूंना इजा पोहोचवतात किंवा मेंदूपर्यंत पोहोचतात. नेमकं काय होतं हे समजून घेण्याआधी नाकाची रचना कशी असते, त्यावर नजर टाकूयात.
आपल्या नाकाच्या आत, मेंदूच्या खाली ओलफॅक्टरी बल्ब नावाचा ब्रशसारखा दिसणारा तंतूमय भाग असतो. ओलफॅक्टरी बल्ब हे घ्राणेंद्रियाच्या नसेचं टोक आहे जी नस मेंदूशी जोडलेली असते आणि आपल्याला एखाद्या वस्तूच्या वासाची जाणीव करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. नाकात शिरणारे कोणतेही कण, प्रदूषकं किंवा विषाणू यांना हे तंतू मेंदूत शिरण्यापासून रोखतात.
पण सतत अशा धुलीकणांचा मारा झाला, तर या तंतूंना सूज येऊ शकते, त्यांची झीज होऊ शकते. समुद्रकिनाऱ्यावर लाटांमुळे जशी धूप होते, तसंच काहीसं हे आहे. या तंतूंची झीज आणि वास घेण्याची क्षमता कमी होणं याचं जवळचं नातंय.
स्वाभाविकपणे जितकं वय जास्त, तितकं ही झीज होण्याचं प्रमाण झास्त असतं आणि त्याचा वास घेण्याच्या क्षमतेवर कमी होते. वयानुसार वास घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो, असं याआधी स्टॉकहोमच्या इनग्रिड एकस्ट्रॉम यांनी केलेल्या संशोधनातून समोर आलं होतं.
या धुलीकणांपासून फुप्पुसाचे आजार आणि कॅन्सरही होऊ शकतो. फुप्फुसाच्या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूपैकी निम्मे मृत्यू वायूप्रदूषणामुळे होतात. तसंच हृदयविकार आणि स्ट्रोकमुळे होणाऱ्या मृत्यूपैकी एक चतुर्थांश मृत्यूंचा वायूप्रूषणाशी संबंध आहे.
वास आणि चव याचं जवळचं नातं आहे.
वास घेण्याची क्षमता चव घेण्याच्या क्षमतेवरही परिणाम करते. लोक जेवण बेचव लागत असल्यानं खाणं अजिबात कमी करतात आणि त्यांचं वजन कमी होत जातं. दुसरीकडे काहीजण चव लागावी म्हणून मग जास्त मीठ किंवा जास्त साखर असलेले पदार्थ खाऊ लागतात, ज्याचा तब्येतीवर आणखी घातक परिणाम होऊ शकतो.
वास घेण्याची क्षमता कमी होण्याचा संबंध संशोधकांनी नैराश्यासारख्या मानसिक आजाराशीही जोडला आहे.
काही धुलीकण नाकातला हा अडथळा भेदून मेंदूपर्यंत पोहोचून नुकसान करतात आणि अन्य आजारांना कारणीभूत ठरतात असा दावा ब्रिटनच्या लँकास्टर विद्यापीठातील पर्यावरणशास्त्राच्या प्राध्यापक बार्बरा माहेर यांनी आपल्या संशोधनातून केला होता. अल्झायमर्ससारख्या आजारात 90 टक्के लोकांची वास घेण्याची क्षमताच कमी झाली असते, असंही त्या नमूद करतात.
त्यामुळेच वायुप्रदूषण रोखणं आणि एयर क्वालिटी म्हणजेच हवेची गुणवत्ता सुधारण यासाठी सर्वच पातळ्यांवर प्रयत्न करणं गरजेचं आहे.