S R Dalvi (I) Foundation

‘नाचणीच्या एका भाकरीत जे आहे, ते गव्हाच्या 10 चपात्यांमध्ये नाही’

"What is in one Nachani bread is not in 10 wheat chapattis"

नाचणी या मिलेट म्हणजेच भरडधान्यात उत्तम प्रतिचं प्रोटीन, व्हिटामिन, मिनरल्स, फायबर म्हणजेच तंतूमय पदार्थ, आणि उर्जा असते. शिवाय, नाचणीच्या पिकात हवामान बदलाला तरी समर्थपणे तोंड देण्याची क्षमता असते. ते कमी पावसातही तग धरू शकतं. त्याला ‘क्लायमेट स्मार्ट पीक’ असंही म्हटलं जातं.

असं हे कणखर सुपरफुड लोकांच्या आहारात असणं ही काळाची गरज मानली जातेय. महाराष्ट्रातल्या काही आदिवासींनी घटलेलं नाचणीचं उत्पादन पाच वर्षांमध्ये कसं वाढवलं त्याची ही कहाणी.

गेल्या तीन दशकांमध्ये भारतीय आहारात गहू आणि तांदूळ या धान्यांचा वापर वाढला. आणि भरडधान्यं आहारातून कमी होत गेली. एकसुरी पिकांचं (Mono-crop) प्रमाणही साहजिकच त्याचा परिणाम इतर पिकांच्या उत्पादनांवर झाला. 1965मध्ये भरडधान्यांच्या लागवडीखालील जमीन 72.6 लाख हेक्टर होती ती 2011 मध्ये साधारणपणे 19 लाख हेक्टरवर आली.

भारत सरकारच्या आकडेवारीनुसार देशात नाचणीची लागवड 1965 च्या तुलनेत 2011 मध्ये निम्मी म्हणजेच 56.4 टक्के इतकी कमी झाली.

भारतात 2018 हे वर्ष भारतात मिलेट वर्षं म्हणून साजरं केलं गेलं होतं. त्यानंतर भारताचा प्रस्ताव स्वीकारत संयुक्त राष्ट्राने 2023 हे वर्षं आंतरराष्ट्रीय मिलेट वर्षं जाहीर केलं. त्या पार्श्वभूमीवर हवामान बदलात आश्वासक पीक म्हणून भरडधान्यांकडे पाहिलं जातंय.

नाशिकच्या आदिवासी भागात पूर्वी नाचणी हे मुख्य पीक होतं. तेव्हा स्थानिक लोक नाचणी हे मुख्य अन्न म्हणून त्याला देव मानत. ही परंपरा आजही टिकून आहे. ‘कणसरी देव’ म्हणून या धान्याची पूजा केली जाते. त्यामुळे या धान्याशी जोडलेल्या लोकांच्या श्रद्धाही आहेत. हे पीक मुख्यतः खरिपात घेतलं जातं.

“नाचणी आमचा देव आहे. आम्ही शेतात कापणी, मळणी करायला जातो तेव्हा पूजा करतो. पूर्वी जात्यावर बसताना नाचणीची गाणीही म्हणायचो. खरंतर नाचणीमध्ये खूप जीवनसत्व आहेत. आम्ही पूर्वी सकाळ-संध्याकाळ नाचणीची भाकर खायचो. आता एकदाच खातो. पण नाचणीच्या एका भाकरीत जे आहे ते गव्हाच्या दहा चपात्यांमध्येही नाही. खूप ताकद मिळते.”

मुलांच्या वाढीसाठी, गरोदर माता यांच्यासाठी तर कुपोषण, मधुमेह, लठ्ठपणा या आजारांवर नाचणी गुणकारी असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

पण अशा या पौष्टिक नाचणीचं पीक हातचं जातं की काय याची चिंता महाराष्ट्रातल्या नाशिक, ठाणे आणि पालघर या गावांमधल्या आदिवासी शेतकऱ्यांपुढे होती. प्रगती अभियान या संस्थेने हा पेच महाराष्ट्राच्या आदिवासी विभागाच्या मदतीने सोडवायचं ठरवलं. बदलत्या हवामानात नाचणी तग धरुन कशी राहिल याचा अभ्यास सुरू झाला. कमी कष्टात आणि खर्च न वाढवता पीक घेण्याची पद्धत संस्थेला सापडली. तसे प्रयोग ओडिशा, तेलंगणा या राज्यांमध्ये झाले होते.

या प्रयोगाचं नाव होतं- आदिवासी नागली विकास कार्यक्रम.

2018 मध्ये त्यांनी आपल्या शेतात नाचणीचा प्रयोग सुरू केला. आज 5 वर्षांनी या शेतकऱ्यांची संख्या 2 हजारच्या आसपास झाली आहे.

यातील बहुतांश शेतकरी अल्पभूधारक आहेत आणि डोंगर उतारावर पारंपरिक शेती करतात. कोकणा, ठाकर, वारली समाजातील हे आदिवासी आहेत. “पाऊस कधी येतो, कधी नाही. समजा एखाद्या वेळ टाकून लावली आणि पाऊस झालाच नाही. तर तुमची वर्षभराची मेहनत फेल जायची. टाकून न लावता आम्ही टोचून लावायला लागलो. त्यामुळे टोचून लावायचो त्याची उगवण क्षमताही चांगली झाली.

नवं तंत्र वापरुन शेती करणाऱ्यांची संख्या 2 हजार झाली आहे.

बियाणांची निवड, जमिनीची मशागत, गादी वाफे, लावणी, कापणी, खत याच्या नव्या पद्धती त्यांनी तज्ज्ञांकडून प्रशिक्षण घेऊन शिकून घेतल्या. इथले आदिवासी जूनमध्ये पेरणी करण्याआधी उन्हाळ्यात राब करायचे. राब म्हणजे पालापाचोळा जाळून जमीन भाजण्याची पद्धत. ही पद्धत अनेक पिढ्या चालत आली होती. त्यासाठी जानेवारीपासून मे महिन्यापर्यंत त्यांना या जळणाची तजवीज करावी लागायची.

पूर्वी इथे एका हेक्टरमागे नाचणीचं सरासरी उत्पादन 500 किलोच्या आसपास होतं होतं. आता तेच उत्पादन चौपट म्हणजे हेक्टरी सरासरी 2000 किलो इतकं झालंय.

शेतकरी चंदन कुंवर सांगतात- “पूर्वजांचं म्हणणं होतं मूठभर पेरायचं तर खंडीभर पिकत होतं. आता गोणभर पेरलं तरी गोणभर पिकत नाही, अशी अवस्था होत.

या प्रयोगाचा अभ्यास करून त्याच जागेत त्याच प्लॉटवर जेव्हा मी पाच मीटरचे दोन गादीवाफे केले. अर्धा एकरमधून मला 3 क्विंटल नागली झाली. आता बदल असा झालाय की 50-60 ग्रॅम जरी पेरलं तरी 3-4 क्विंटल त्याचं उत्पादन मिळतं. कमी क्षेत्रात, आणि कमी खर्चात.”

काही शेतकरी पूर्वी एकरी दीड क्विंटल करायचे ते आता एकरी 8 क्विंटल करू लागले आहेत.

नाचणीचं उत्पादन वाढलं पण मागणी कमी असल्याने योग्य भाव मिळत नाही ही शेतकऱ्यांची अडचण होती. बाजारात साधारण 15 ते 20 रुपये भाव इथल्या शेतकऱ्यांना मिळतो. पण 35 रुपये हमीभाव मिळाल्याने त्यांची आर्थिक चणचण कमी होऊ शकते.

आनंदा चौधरी यांनी वयाच्या साठीच नाचणीला इतके चांगले दिवस आलेले पाहिले आहेत. नाशिकच्या कृषी प्रदर्शनात त्यांनी 50 रुपये किलो दराने नाचणी विकली. नाचणीने त्यांना आत्मविश्वास दिलाय.

स्थानिक गावकरी आहारात नाचणीची भाकर खात असले तरी दैनंदिन वापरात इतर कोणतेही पदार्थ नसतात. कोणी आजारी असेल तरच पेज दिली जाते. या धान्याचं पोषणमुल्य पाहाता आदिवासींचं आरोग्य कसं सुधारेल याकडे लक्ष दिल्याचं प्रशिक्षण समन्वयक संगीता जाधव सांगत होत्या. धान्याच्या उत्पादकवाढीसोबतच नाचणीच्या पदार्थांचे काही प्रयोग प्रगती अभियानने केले आहेत.

अल्पभूधारक शेतकऱ्याला आर्थिक सुरक्षितता अशा भरडधान्यातून मिळेल का?

पाच वर्षांच्या खरीप हंगामानंतर उत्तर महाराष्ट्रातला नाचणीचा प्रयोग आता तिथे पूर्णपणे रुजू शकतो, असा विश्वास प्रगती अभियानच्या संचालक अश्विनी कुलकर्णी यांना वाटतोय. “आदिवासी विकास विभागाने महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा प्रयोगाला मदत केली. या यशाच्या जोरावर आता फक्त नाचणीच नाही तर इतर भरडधान्य त्याची उत्पादकता महाराष्ट्रभर वाढवण्यासाठी प्रयत्न करता येऊ शकतात. ते कसं याचं गणित इथे सापडलेलं आहे.” “पूर्वी पावसाचा ठरलेला पॅटर्न बदलत चाललाय. एक वेळ भाताचं पीक जीव सोडेल. पण या तग धरून राहण्याची ताकद नाचणीत आहे. अगदी मुरबाड, उताराच्या जमिनीवर, मातीची खोली कमी आहे अशा ठिकाणी पीक घेता येतं हे लोकांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. अशा जमिनीतूनही कमाई होऊ शकते, असा विश्वास आता आदिवासींना मिळालाय. पावसात चार पीकं गेली तरी कोणत्याही वातावरणात नाचणी टिकेल याची त्यांना खात्री असते.”

एप्रिल महिन्यात सुरगाण्याच्या खिरमाणी गावात शेतकऱ्यांचा गट चौधरी कुटुंबाची गुंठाभर शेती पाहात होता. अशोक चौधरी आणि कलीबाई चौधरी यांनी शेतातल्या विहिरीच्या जोरावर रब्बीच्या हंगामात नाचणी लावली आहे. हा नवा प्रयोग असल्याचं चौधरी सांगत होते. पावसाने दोन-तीन वेळा जोरदार हजेरी लावली. नाचणी दीड फुट उंच झाली होती. पिकावर किड आली म्हणून चौधरी कुटुंब जरा चिंतेत होतं. पण गुंठ्यावर करून तर पाहू, झालं यशस्वी तर ठीक असं म्हणत त्यांनी कंबर कसलीये. हा आत्मविश्वास त्यांना 5 वर्षांच्या खरिपाच्या नाचणीने दिलाय.

Scroll to Top