S R Dalvi (I) Foundation

कामगारांची सुरक्षितता एका शिक्षकाचा ध्यास- श्री रोहन मोरेश्वर होमकर

आपल्या आयुष्यात स्वप्न बघून त्यांना साकारायचा प्लॅन बनवून त्यावर घेतल्या गेलेल्या कृतींमुळे आपल्याला आयुष्यात यश मिळते व आपण आपल्या यशस्वी कार्यामुळे समाजाला फायदा करून देऊ शकतो असे मानणाऱ्या  श्री. रोहन मोरेश्वर होमकर यांचा जन्म १९९१ साली अलिबाग येथे झाला.

बालपण बदलापूर येथील नदीकिनारी असलेल्या टुमदार बंगल्यात व्यतीत झाले. बंगल्याच्या अवतीभवती जवळपास १० नारळाची व ५ आंब्याची झाडे आजोबांनी लावलेली होतीं. उद्योजक वृत्तीचे व समाजउपयोगी  काम सतत करणारे त्यांचे वडील हे  टाटा पॉवर कंपनीत नोकरीला होते. रोहन सरांचे बालपण हे खूप  मस्ती करण्यात व खोड्या करण्यात गेले .एकदा तर शाळा देखील एकदा बदली करावी लागली. परंतु इयत्ता पाचवी नंतर त्यांच्या आयुष्यात आलेल्या सर्वोत्तम शिक्षकांनी रोहन सरांच्या यशस्वी भविष्याची पायाभरणी केली. नववीत असताना घडलेल्या एका प्रसंगामुळे सर्वजण त्यांच्यावर एक विद्यार्थी म्हणून अविश्वास दाखवू लागले होते. त्यावेळी  त्याची आई त्यांच्यासोबत खंबीरपणे उभी होती आणि शिक्षकांना म्हणाली, “तुम्ही त्याला एक संधी द्या, तो नक्कीच तुमच्या शाळेचे चांगले नाव काढेल”.

रोहन सरांच्या बंगल्याला २००५ साली आलेल्या पुरामुळे खूप नुकसान झाले संपूर्ण घर वाहून गेले व जेमतेम  त्यांची व त्यांच्या कुटुंबीयांचे जीवन वाचले. त्याला तर एक पुनर्जन्म म्हणता येईल. अशा वेळेस त्यांच्या परिवारावर आर्थिक संकट देखील आले. पण आई – वडिलांच्या चांगल्या संस्कारांमुळे त्यांचे लक्ष अभ्यासात टिकून राहिले आणि दहावीच्या परीक्षेत शाळेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्यावेळी त्यांच्या पाटील सरांनी केलेले मार्ग दर्शन त्यांना नेहमी आठवते ,” रोहन हि दहावीनंतरची पुढील ६ वर्ष चांगली मेहनत कर आणि पुढील सर्व वर्ष आराम कर  किंवा दहावीनंतरची पुढील ६ वर्ष आराम/ टाइमपास कर आणि पुढील सर्व वर्ष मेहनत कर “ आणि त्यातून घेतलेला संदेश रोहन सरांच्या आयुष्यात यश संपादन करायला कारणीभूत ठरला.

लहानपणी रोहनची आई – अनुश्री होमकर त्याला पुढील वर्गात शिकवले जाणारे धडे गोष्टीरूपाने वाचून दाखवायची . तसेच इतर उपदेशपर गोष्टींची पुस्तके वाचून दाखवताना आई जाणूनबुजून एक दोन ओळी गाळायची ज्यामुळे रोहनला उत्सुकता निर्माण व्हायची व नंतर तो स्वतः ते पुस्तक वाचून काढायचा. अशारीतीने रोहन सरांना पुस्तके वाचण्याची आवड त्यांच्या आईने लावली .

आपल्या कृतीतून आपल्या मुलांवर कसे संस्कार करायचे हे त्यांच्या वडिलांना श्री. मोरेश्वर होमकर यांना  खूप चांगल्या प्रकारे अवगत होते. जेव्हा पुरामध्ये घरदार सगळे वाहून गेले होते, कुटुंब मनाने खचले होते तेंव्हा आपल्या १६ वर्षाच्या रोहनला ते म्हणाले  “तू दहावीच्या परीक्षेचे जास्त टेन्शन नको घेऊस, तू त्यात नापास झालास तरी चालेल, पण तुला रोज एक गोष्ट करावी लागेल…ती म्हणजे रोज शाळेतून घरी आल्यावर मला शाळेत काय शिकविले, ते नीट समजावून सांगायचे”. हे ऐकून त्यावर कृती केल्यामुळे अभ्यास आपोआपच व्हायचा आणि त्याला शिक्षक व्हायचे स्वप्न मनात रुजलं. त्यांच्या आई-वडिलांना रोहनला  फक्त पुस्तकी ज्ञानामध्ये आणि मार्कांमध्ये सिमीत ठेवायचे नव्हते तर कोणताही विषय आपल्या पर्सनॅलिटी मध्ये उतरवायला शिकवणे अपेक्षित होते .

घराचा झालेला विध्वंस व त्यानंतर लाडक्या आजीला झालेली देवाज्ञा अजून एक समस्या घेऊन आली व काही कौटुंबिक कारणामुळे त्यांच्या कुटुंबियांना बदलापूरचे राहते घर सोडावे लागले आणि ते चेंबूर येथे टाटा पॉवर कंपनी निवासी  संकुलात मध्ये स्थायिक झाले. दहावीनंतर इलेक्ट्रिक डिप्लोमा कोर्स साठी उत्कृष्ट अश्या के. जे. सोमैया तंत्रनिकेतन या संस्थेत प्रवेश मिळाल्यामुळे ते त्यातल्या त्यात आनंदी होते .

पुरामुळे समजलेली आपल्या आयुष्याची किंमत व उपलब्ध वेळेचा सदुपयोग करण्याची वृत्ती त्यांना नवनवीन कल्पना व प्रयोग करण्याची प्रेरणा देत असे त्यातूनच त्यांनी आपल्या आवाजात अभ्यासाचे ऑडियो नोट्स रेकॉर्ड करून ते प्रवासात ऐकायला सुरवात केली व आपला प्रवासात वाया जाणारा बहुमूल्य वेळ सत्कारणी  लावला .

के. जे. सोमैया तंत्रनिकेतनमध्ये डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्यांनी नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट , नागपूर येथून Power Engineering ची डिग्री प्राप्त केली. नागपूरला  रूम पार्टनर सोबत राहताना त्यांना एक खूप महत्वाची गोष्ट शिकायला मिळाली ती म्हणजे “आपण काहीही करत असलो, तरी प्रत्येक वेळी आपल्याला कोणी ना कोणी बघत असते,  आपले निरीक्षण करत असते त्यामुळे आपण कायम आपले सर्वोत्तम योगदान द्यायचे”

लहानपणी त्यांच्या कुटुंबीयांवर इतकी मोठी आपत्ती आल्यामुळे त्यांनी ठरवले आपल्याला झालेले नुकसान हे आपण न केलेल्या व्यवस्थापनामुळे झाले आहे व आपण इतर समाजबांधवांना आपत्ती व्यवस्थापन हा विषय समजावणे गरजेचे आहे. स्वतः वर आलेल्या आपत्तीचा अनुभव व त्यातून मिळालेले धडे समाजापर्यंत नेण्याचे  काम करण्यासाठी त्यांनी   डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये PG diploma चे शिक्षण सुध्दा घेतले व आता विद्यार्थ्यांना शिकवण्यासोबतच  त्यांना वेगवेगळ्या कंपन्यांकडून मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रण सुद्धा येतात. अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये कामगारांच्या सुरक्षेसाठी, कंपनीतील आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशिक्षण देण्याचे महत्वाचे कामसुध्दा करतात.

२०१३ सालापासून रोहन सर कायमस्वरूपी अधिव्याख्याता म्हणून के. जे. सोमैया तंत्रनिकेतन मध्ये रुजू झाले व आजतायागत त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना नेहमी काही तरी नवीन माहिती देण्यासाठी आणि सर्वोत्तम घडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

२०१५ साली कावीळ रोगामुळे त्यांना १ महिना हॉस्पिटल मध्ये राहावे लागले व त्यावेळी विद्यार्थ्यांना शिकवायला न मिळाल्यामुळे अशा वेळेस आपल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये  म्हणून त्यांनी पुन्हा एकदा तंत्रज्ञानाचा उपयोग केला आणि स्वतःचे ऑडिओ नोट्स ला व्हिडिओ लेक्चर्स मध्ये बदलून मुलांना पाठवले. ते व्हिडिओज बघून त्यांचे विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले.आणि त्यां घटनेमुळे रोहन सरांच्या युट्युब चॅनल ची सुरवात झाली. ऑडिओ नोट्स अपलोड करणे सुरू केल्या नंतर काही दिवसानी रोहन सरांच्या पत्नी सौ.  अश्विनी होमकर यांनी त्यांना विद्यार्थ्यांना प्रेरणादायी व्हिडिओ बनवण्याचा सल्ला दिला व त्यासाठी खूप चांगल्या प्रकारे मदत केली. विद्यार्थ्यांच्या मनात कोणताही विषय आवडीने शिकून घेण्याची मानसिकता निर्माण करणे , शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आयुष्यात यशस्वी होण्याकरीता जरुरी असलेली धडाडी विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण करण्याचे काम त्यांच्या व्हिडियो च्या माध्यमातून आता ते करत आहेत.

आज जेव्हा आपण बघतो की आग लागून , अपघात होऊन अनेकांचे नुकसान होत आहे किंवा फॅक्टरी मध्ये काही दुर्घटनेमुळे कर्मचाऱ्यांना अपंगत्व येत आहे . असे होऊ नये म्हणून रोहनचे सरांचे प्रयत्न चालू आहेत. स्वतः व्हिडियो बनवताना आलेले अनुभव त्यांनी एका पुस्तकच्या स्वरूपात ऍमेझॉन वर प्रकाशित केले आहे . काही दिवसांनी जसे त्यांचे कार्य समाजातील यशस्वी व्यक्तींना समजत गेले तसे त्यांनी रोहन सरांना त्यांच्या कार्यात मदत करायला सुरुवात केली व त्यांचे स्वानुभव व उपयोगी माहिती The Success Talk Show With Rohan Homkar या सरांच्या युट्युब चॅनल वरील मुलाखतीत ते मांडू लागले . आणि त्या माहितीचा त्यांच्या विद्यार्थ्यांना नक्कीच होईल . आज पर्यंत समाजातील ७० पेक्षा जास्त यशस्वी व्यक्तींची मुलाखत सरांनी घेतली आहे.आपल्या शिक्षणाचा समाजाच्या भल्यासाठी वापर करून देण्याचा विचार रोहन सरांच्या कार्याचा आधारस्तंभ आहे.

चला तर मग आपण पण प्रेरणा घेऊया व आपल्या आयुष्याचा बहुमूल्य वेळ सत्कारणी लावूया.

Scroll to Top