World Theatre Day
27 मार्च हा दिवस दरवर्षी ‘जागतिक रंगभूमी दिन’ (World Theatre Day 2022) म्हणून साजरा केला जातो. 1961 मध्ये ‘युनेस्को’च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिटय़ूटने या दिवसाची सुरुवात केली होती. पहिला जागतिक रंगभूमी दिन 1962 मध्ये साजरा झाला. त्यानंतर दरवर्षी या दिवशी विविध कार्यक्रम आणि उपक्रमांद्वारे जागतिक रंगभूमी दिन उत्साहाने साजरा होतो. यानिमित्ताने जगभरातील नाट्य जगतातील महत्त्वाची एक व्यक्ती संदेश देते. हा युनेस्कोच्या जागतिक रंगभूमी दिनाचा महत्त्वाचा भाग आहे. 1962 साली ज्यो कॉक्चू यांना संदेश देण्याचा पहिला मान मिळाला होता.
खरंतर, समाजासाठी मनोरंजनाच्या बदलत गेलेल्या माध्यमांमध्ये रंगभूमीने मोठा काळ व्यापला आहे. नंतरच्या काळात सिनेमा आणि आता तंत्रज्ञानाची अनेक साधने बसल्या जागी उपलब्ध झाली. मात्र, रंगभूमीचा प्रभाव आजही कायम आहे. व्यावसायिक आणि प्रायोगिक रंगभूमीने समाजाच्या मनोरंजक आणि प्रबोधनात मोठे योगदान दिले आहे.
व्यक्ती आणि त्याची संवाद साधण्याची कला यातून सामुदायिक कलाविष्काराला इंग्रजीत `थिएटर’ आणि मराठीत आपण ‘रंगभूमी’ हा शब्द त्याला वापरतो. रंगभूमी, नाट्यसंहिता, नाट्यदिग्दर्शक, रंगभूषा, वेषभूषा, रंगमंदिर, रंगमंच या सर्व गोष्टी रंगभूमीशी निगडित आहेत. नाटक हे वेगवेगळ्या भाषांमधून सादर केले जाते.
मराठी, ग्रीक, रोमन, ब्रिटीश, जर्मन, रशियन, अमेरिकन अशा वेगवेगळ्या भाषांमधून नाटकांचा हा प्रवाह चालत आलेला आहे. पूर्वी आजच्यासारखे रंगमंच नव्हते तेव्हा एका मैदानात रंगमंदिर उभारले जात असे. पुढे हळूहळू आजच्यासारखी बंदिस्त रंगमंचाची संकल्पना अस्तित्वात आली. वैदिक काळापासून ते आजच्या कीर्तन परंपरेपर्यंत तसेच कोकणातील दशावतारी नाटके,तमाशा, बहुरुपी, वीरकथा, देवासुर संग्राम तसेच पौराणिक आणि लोककथेच्या रूपातून आजची आधुनिक नाट्यकला जन्मास आली. मराठी रंगभूमीला सुगीचे दिवस येण्यापूर्वीच्या काळात लोकांसाठी मनोरंजनाचे माध्यम म्हणून पोवाडा, भारुड, कीर्तन, दशावतारी खेळ हीच मुख्य साधने होती. त्यानंतर ‘नाटक’या कला प्रकाराला मराठी रसिक प्रेक्षकांनी भरभक्कम पाठबळ दिले आणि रंगभूमी बहरली.
विष्णुदास भावे यांच्या ‘सीता स्वयंवर’ या नाटकाने मराठी रंगभूमीची सुरुवात झाली. 1843 मध्ये सांगली येथे मराठीतल्या या पहिल्या संवाद आणि संगीत नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. दरम्यान, आधी चित्रपट, त्यानंतर टेलिव्हिजन आणि आता मोबाईल, इंटरनेट यांच्या वाढत्या वापरामुळे नाटक टिकणार का? अशीही शंका रसिकांच्या मनात येत आहे. सध्याची तरुणाई ही स्मार्टफोन, फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम यात अडकली आहे. परंतु, यातूनही नाटक पाहणारा प्रेक्षकवर्ग अजूनही अबाधित आहे. आणि तो पुढेही असाच राहील.