After Corona, children’s will go to school… what should parents take care of .
कोरोना महामारीच्या दोन वर्षांच्या कालखंडानंतर शाळा पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी सज्ज होत आहेत. खरंतर कोरोना महामारीच्या काळात ऑनलाइन पद्धतीने अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आणि मुलांनी शिकण्यासाठी प्रयत्न केले गेले. मध्ये काही दिवस शाळा सुरू झाल्यादेखील.पण, हे खरंय की, आपली मुलं एका इयत्तेतून पुढच्या इयत्तेत ढकलली गेली आहेत. ‘ढकलणं’ हा शब्द इथे जाणीवपूर्वक वापरत आहे कारण आपल्या मुलाचं शिक्षण आधीच्याच इयत्तेत थांबलेले आहे. आता इयत्ता बदलली असली आपली मूल शाळेत जाणार असले तरी हे शैक्षणिक वर्षे सुरू होत असताना पालकांनी काही गोष्टी जाणीव आणि उणिवेच्या पातळीवर स्वत:शीच बोलायची गरज निर्माण झालेली आहे.
गेले दोन वर्षात प्रत्यक्ष शिकण्याचा अनुभव न घेता ऑनलाइन पद्धतीने आपली मुलं शाळा शिकत होती. म्हणजेच फक्त अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी ती प्रयत्न करत होती.
अभ्यासक्रमातील पायाभूत कौशल्य शिकण्याबरोबरच मानसिक, भावनिक, सामाजिक- शारीरिक शिक्षण या पातळीवर मुलांचं नुकसान झालेलं आहे. ते भरून काढण्यासाठी पालक म्हणून नेमकं काय करायचं आणि काय नाही करायचं हे, उमजून घेणं महत्त्वाचं आहे.
१) शाळा ही सामूहिक पातळीवरची संस्था आहे. तिथं येणारं प्रत्येक मूल हे त्याच्या त्याच्या पातळीवर अनुभव घेऊन आलेलं असणार आहे. म्हणून आपलं मूल मागे पडण्याची भीती वाटून घेण्यापेक्षा मुलांना त्यांच्या पातळीवर जाऊन समजून घेणं गरजेचं आहे.
२) शिकताना मुलांना भावनिक आधाराची फार गरज आहे आणि पालक म्हणून आपण ती अधिक सजगतेने आपण समजून घेऊ शकतो, हे मनाशी नक्की असावे.
३) कोरोना काळात प्रत्यक्ष अनुभव घेऊन शिकण्याची कोणत्याच प्रकारची संधी नव्हती आणि त्यामुळे इंटरनेटच्या मायाजाळात अडकून मुलांची विचार करण्याची क्षमता कमी होत चालली आहे. कारण सगळ्या प्रश्नांची उत्तरं इंटरनेटवर अगदी सहज मिळतात आणि इंटरनेट वापरण्याची साधने बहुतांश पालकांकडे अगदी सहज उपलब्ध आहेत.
४) आपलं मूल शालेय पातळीवर शरीराने आणि मनाने उपस्थित राहावं यासाठी जो स्क्रीन टाइम वाढलेला आहे तो कमी करायचा आहे. त्यासाठी प्रत्यक्ष छोट्या छोट्या अनुभवाच्या पातळीवर जाऊन संवाद वाढवायचा आहे.
५) जी दोन वर्षे गेली ती एकदम भरून काढण्याचा अट्टहास न करता आता ज्या इयत्तेत मुलं आहे ते तिथंच असून तिथूनच सुरुवात करायची आहे, अशी मनाची तयारी असायला हवी.
६) प्रत्येक मूल एकाच पद्धतीने शिकत नाही. त्यामुळे शाळेत मिळालेल्या टक्क्यांवरून मुलांच्या गुणवत्तेची तुलना करत बसू नये. त्यापेक्षा मुलांना वेळ देऊन त्यांना प्रथमत: शैक्षणिक वातावरणात आनंदी व सुरक्षित कसं वाटेल, हे महत्त्वाचं आहे. मुलांचं सामाजिक आणि भावनिक आरोग्य जपणं आणि त्यासाठी त्यांना वेळ देणं गरजेचं आहे.
७) विशेषत: कोरोना महामारीच्या काळात तर प्रत्यक्ष अनुभव न मिळाल्याने मुलांना व्यक्त होता आलेलं नाही. तेव्हा त्यांनी बोलतं व्हावं म्हणून कृतियुक्त अनुभव शाळेसह घरातही देता यायला हवेत. घरात खेळीमेळीचं वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी पालकांचीच आहे.
८) मुलांचा बुद्धिमत्ता विकास म्हणजे फक्त गुण मिळवणं नाही. मुलांनी सर्वांगीण शिक्षण घेताना, अभ्यासक्रम शिकताना कृतियुक्त अनुभव घ्यायला हवेत. तरच मुलं पूर्ण क्षमतेने शिकतात. बौद्धिक, शारीरिक, मानसिक, भावनिक अंगांनी विचार करून अनुभवावर आधारित शिक्षण मुलांना मिळायला हवं. त्यासाठी पालक म्हणून तयारी व्हावी.
९) शाळेत येताना मूल हसत येईल आणि दुसऱ्यादिवशी ते पुन्हा फुलपाखराप्रमाणे उडत-बागडत शाळेत येण्यासाठी तयार होईल, असं उत्साही वातावरण शाळेत असावं आणि घरीही. आपलं मूल आनंदाने शिकेल, असा विश्वास वाटावा, हेच तर पालक म्हणून आपण शोधत असतो.