S R Dalvi (I) Foundation

अल्प ज्ञान एक धोकादायक गोष्ट…

A lack of knowledge can be dangerous…

एखाद्या वेळेस जर तुमच्याजवळ कोणत्याही घटनेबद्दल पूर्ण माहिती नसेल तर स्वतःला शांत ठेवा.

“अल्प ज्ञान एक धोकादायक गोष्ट आहे.”

अर्धवट ज्ञान हे कित्येकदा धोकादायकच असतं. प्रत्येकाला ज्ञान असणं आवश्यक आहे. परंतु कोणत्याही गोष्टीचं ज्ञान घेताना जर अर्धवट ज्ञान घेतलं गेलं तर ते निश्चितच पुढे जाऊन धोकादायक ठरू शकतं.

अनेकदा काय होतं, आपल्याला बऱ्याच गोष्टीची पूर्णपणे माहिती नसते कधी कधी आपल्या कानावर उडत उडत आलेलं आपण सत्य मानतो तर कधी कधी जे दिसतय तेच खरं मानतो. इतकच नाही तर कधी कधी एखाद्या गोष्टीविषयी थोडी माहिती असते परंतु तीही अनेकदा अर्धवट असते. आणि यामुळेच अनेकदा चुकीच्या गोष्टी घडतात अर्धवट माहितीमुळे किती धोकादायक गोष्टी घडू शकतात आणि किती नाही है। सांगायलाच नको.

तर मित्रांनो, कोणतीही गोष्ट असूद्या, आपल्याकडे जर त्या गोष्टीबद्दल अर्धवट माहिती असेल किंवा पुरेशी माहिती नसेल तर ते कोणत्याही क्षणी आपल्याला दगा देऊ शकतं हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवं. आणि स्वतःकडे ज्यावेळेस एखाद्या गोष्टीविषयी अर्धवट काही असेल त्यावेळेस शांत रहायचा प्रयत्न करा.उगाचच त्या अर्धवट माहितीच्या जोरावर काहीही बोलून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यात काहीही अर्थ नाही. यामध्ये स्वतःचं नुकसान तर होतच पण दुसऱ्याचही यामध्ये नुकसान होतं. मला त्या बद्दल काही नीट माहीत नाही’ असं सांगितलं तरी चालेल. परंतु अर्धवट जर काही माहीत असेल तर ते पूर्ण खात्रीशिवाय शेअर करू नका. अशावेळेस शांतच रहा. गोष्टीचं पूर्ण ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा.

साधारणपणे अशीही काही उदाहरणं तुम्ही आजुबाजूला पाहिली असतील.

कुणीतरी नुकतच डिप्रेशनमधून बाहेर येतं. खरं तर त्या डिप्रेशनच कारण त्या व्यक्तींच्या घरातील लोकांनाच माहीत असतं. परंतु आजुबाजूला असणारी लोकं विनाकारण काहीही माहीत नसताना नको त्या गोष्टी सगळ्यांना सांगत बसतात. आणि मग तीच गोष्ट वाऱ्यासारखी पसरत जाते.

लोकांच लग्न होतं, कुणाचं ब्रेकप होत. याला कारणं वेगळीच असतात पण लोकं त्यांच्या मनात येईल तसं इतरांना सांगत बसतात. (त्यांच असच होतं, तसचं होतं. पळूनच गेली, वगैरे वगैरे.)

तब्येत ठिक नसल्याने रिमा दहावीला नापास झाली. पण कोणतीच शहानिशा न करता लोकांनी तिच्यावर ‘ढ’ चा शिक्का मारला होता. आणि नंतर लोकांना कळतं की खरचं रिमाला मलेरिया झाला होता.

प्रकाश आयसीयुमध्ये होता. काही लोकांनी तर त्याला आधीच मृत घोषित केलं होतं. पूर्ण चाळीमध्ये प्रकाश गेला अशी चर्चा सुरू झाली होती… पण नंतर कळतं प्रकाश तर ICU मध्ये होता. त्याला आता सेमीमध्ये शिफ्ट केलं आहे. तो सुखरूप आहे.

पहा, अर्धवट माहिती असेल तर काय होतं हे काही उदाहरणांवरून तुमच्या लक्षात येईलच.

आपल्याला एखाद्या घटनेबाबत पूर्ण कल्पना नसते. आपण आपले तर्क लावत राहतो. किंवा कधी कधी इतरांच्या सांगण्यावरूनही आपण हो ला हो करतो. वरचीच उदाहरणं बघा, आता कुणाच्या आयुष्यात नेमकं काय चालू असतं आणि काय नाही याची खरी कल्पना अनेकदा आपल्याला नसतेच. त्या रिमावर खरं तर लोकांना ‘ढ’ असा शिक्का मारण्याची काहीच गरज नव्हती. आधीच व्यवस्थित जर खात्री केली असती तर अशी वेळ आलीच नसती.

थोडक्यात सांगायचे तर, माहीत नसताना पुढे पुढे करणं, बोलत राहणं कधी कधी खूप महागात पडू शकतं. काही गोष्टी इतरांपर्यंत चुकीच्या पद्धतीने पोहोचल्या जातात. आयुष्यातील अडचणींमध्ये परिणामी वाढ होत जाते. इतरांच्या चिंता वाढत जातात. त्यामुळे परिणाम फारसे चांगले होत नाहीत…

मित्रांनो, म्हणूनच अशावेळेस शांत राहणं केव्हाही योग्य ठरू शकतं जर तुम्हालाही कोणत्याही घटनेबाबत व्यवस्थित माहिती नसेल तर आधी चौकशी करून, खात्री करून सगळं माहीत करून घ्या. आणि नंतरच त्यावर चर्चा करा. संवाद साधा. आपल्यामुळे इतरांच, स्वतःचं नुकसान होणार याची पुरेपूर काळजी घ्या. अर्धवट ज्ञान जस धोकादायक असतं तसचं अर्धवट माहिती देखील तितकीच धोकादायक, नुकसानकारक, आणि त्रासदायक असते..

म्हणून नीट विचार करा आणि वेळप्रसंगी स्वतःला शांत ठेवा…

Scroll to Top