'Chadi lage chhamchham, Vidya yei ghamgham' is the traditional method of education.
‘छडी लागे छमछम, विद्या येई घमघम’ ही शिक्षणाची पारंपरिक रित आहे. पूर्वी अध्ययन करणाऱ्या मुलांच्या शेंडीला दोरी बांधून ताठ बसवले जायचे. मान-पाठ एक करत, रग लागेपर्यंत ताठ बसल्याशिवाय अभ्यासाला गती येत नाही, अशी ठाम समजूत होती. त्यामुळेच अभ्यासाला बसण्यापासून ते तो करण्यापर्यंतच्या पद्धती त्यानुसार निश्चित केल्या गेल्या होत्या. त्यानुसार सुरू झालेली अध्ययन प्रक्रिया वर्षानुवर्षे तशीच राहिली. गरीब, कष्टकरी घरातील मंडळींना आपल्या मुलांनी शिकून त्यांचे जीवन तरी सुखकर, कमी श्रमाचे-अधिक मोबदल्याचे व्हावे, अशी अपेक्षा असायची. त्यामुळेच सरकारी शाळांमध्ये पालकच जाऊन शिक्षकांना शिक्षेसाठी प्रोत्साहित करायचे. मुलाला मारा, झोडा पण तो शिकला पाहिजे, त्याला ‘सगळे’ आले पाहिजे आणि शिस्त लागली पाहिजे, हे समीकरण पक्के असायचे. शिक्षकांचीही धाक दाखवून शिस्त लावण्याची धारणा पक्की असायची. त्यामुळेच हाताने, पट्टीने बडवण्यापासून ते अंगठे धरून उभे करणे, धाक दाखवणे, वर्गासमोर शिक्षा करणे असे प्रकार सर्रास शाळांमध्ये घडत होते आणि त्याला एकप्रकारे समाजमान्यताही होती. पण, यातून मुलांच्या मनावर होणाऱ्या खोलवर परिणामाकडे आजवर जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले.
शिक्षणाची पार्श्वभूमीच नसलेल्या घरांतून आलेल्या मुलांमध्ये अभ्यासाबाबत सकारात्मक भावना निर्माण करताना मोठे आव्हान असते. तर अनेकदा मुलांची आवड आणि सक्तीचे विषय यात विसंगती असल्याने अभ्यासाबाबत नकारात्मकता असते. अशा परिस्थितीत या सगळ्याचा परिणाम हा नेहमी प्राधान्याने आकलनावर होतो. तसेच मुलांची आकलन क्षमता, बुद्ध्यांक यामध्येही फरक असतो, तो ओळखून शिकवण्याची, मुलांच्या गळी उतरवण्याची व्यवस्था आपल्याकडे नाही. अशा परिस्थतीत मुलांना धाक दाखवला, छडीचा-शिक्षेचा बडगा उगारला तर मुलांच्या मनामध्ये ठराविक विषय, शिक्षण, शाळा, शिक्षक याबाबत मुलांच्या मनामध्ये नकारात्मक भावना तयार होते, अनेकदा ती दीर्घकाळासाठी असते आणि याचा परिणाम त्यांच्या वैयक्तिक जडणघडणीवर खोलवर होत असतो.
शालेय जीवनात केलेल्या शिक्षा अनेकदा जिव्हारी लागतात. बरोबरीच्या मुलांसमोर झालेला तथाकथित अपमान मुलांना न्यूनगंड देऊ शकतो किंवा अधिक बेफिकीर करतो. आपण कसेही वागलो, तरी त्याचे फलित शिक्षाच असेल, अशी धारणा होते आणि कोवळ्या मनावर त्याचा दीर्घ परिणाम होतो. अनेकदा पट्टी, काठी, वेताची छडी यांचा वापर मुलांच्या शरीरावर वळ उठेपर्यंत मारण्यासाठी केला जातो. या अघोरी शिक्षा शारीरिक कमकुवतपणा देऊ शकतात.
लांना शाळेपासून दूर नेणारे शिक्षांचे पर्याय वर्गाबाहेर करण्याचा स्वागतार्ह निर्णय बालहक्क आयोगाने घेतला आहे. यात मुलांना मारणे, लाथ मारणे, बोचकारणे, ओरबाडणे, केस ओढणे, कानाला दुखापत करणे, बांबू, खडू, डस्टर, पट्टा, चपला-बूट यांनी मारहाण करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच बाकावर उभे करणे, भिंतीकडे तोंड करून उभे करणे, अंगठे धरून उभे करणे, खुर्चीवर उभे करणे, डोक्यावर दप्तर घेऊन उभे राहणे, कान धरून उभे राहाणे, खोलीत कोंडणे अशा शिक्षांनाही विरोध करण्यात आला आहे. शारीरिक शिक्षांबरोबरच काही मानसिक शिक्षांचाही सखोल विचार करण्यात आला आहे. टोमणे मारणे, मुलांच्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचेल असे बोल लावणे, कमी लेखणे, उपहासात्मक भाष्य करणे यासारख्या मुलांना मनातून कमकुवत करणाऱ्या शिक्षा करण्यासही मनाई करण्यात आली आहे.
प्रत्येक माणूस ही वेगळी व्यक्ती आहे. अर्थातच व्यक्तिपरत्वे जमेच्या बाजू आणि उणिवा या वेगवेगळ्या असतात. तीच बाब विद्यार्थ्यांना लागू होते. प्रत्येक विषयात, प्रत्येक खेळात, प्रत्येक कलेत आपल्या मुलाला रूची आणि गती असेल, अशी अपेक्षा बाळगणे आणि त्याचे ओझे मुलांवर लादणे योग्य होणार नाही. ही बाब आधी पालकांनी समजून घेतली तर ते मुलांच्यादृष्टीने उपयुक्त ठरू शकते. मुलांची आवडनिवड लक्षात घेऊन त्यात त्याला प्रोत्साहन देणारी शिक्षणयंत्रणा आणि शिक्षणपद्धती विकसित झाली तर शिक्षेची फारशी वेळच येणार नाही. एखाद्या विषयात विद्यार्थ्याला गती कमी असेल तर भर वर्गात टोमणे मारणे, हिणवणे अशा प्रकारांमुळे मुलांचे खच्चीकरण होत असल्याचे मानसशास्त्रज्ञ सांगतात. तसेच संबंधित विषय, शिक्षक याबाबत त्यांच्या मनात कायमस्वरूपी अढी निर्माण होऊ शकते. त्यामुळेच एखाद्या विद्यार्थ्याची आकलन क्षमता लक्षात घेऊन त्याला पालक, शिक्षकांनी समजून घेतले तर शिक्षेचे प्रसंग टळू शकतात.
आपल्याकडे लहान वयात शिस्तीचे अवडंबर करण्याची पद्धती रूढ आहे. उठ म्हणले की उठले पाहिजे हा पूर्वापार खाक्या आजही मनात घर करून आहे. त्यामुळे मुलांना स्वातंत्र्य, मुक्तता, खुलेपणा यांचा अनुभव घेता येतच नाही. कदाचित एका विचित्र दडपणाखाली ते राहातील. त्यामुळेच शिस्त मुलांच्या गळी उतरवतानाही त्याचा जाच न वाटता जगण्याची पद्धती म्हणून ती रुजवणे कौशल्याचे आहे. एखादी वर्तणूक, गोष्टीसाठी टोकाचा आग्रह धरल्यास मुले विरुद्ध वागतात. त्यातून संतापजन्य कृतीचे प्रसंग उद्भवू शकतात. त्यामुळेच प्रत्येक कृतीमागचे, शिस्तीमागचे कारण आणि उपयुक्तता मुलांना सोप्या शब्दांत समजावता आली तर त्यांना त्या शिस्तीचा जाच वाटणार नाही.
अनेक गोष्टी लहान वयात मुलांमध्ये खेळीमेळीने, सकारात्मक कृतीतून रुजवता येऊ शकतात, याचाच शिक्षक, पालकांना अनेकदा विसर पडतो. मोठ्यांच्या कृतीतून चांगल्या-वाईटाची जाणीव करून दिल्यास ती रुजते आणि चटकन आपलीशी केली जाते. त्यातही मुले प्रामुख्याने पालक आणि शिक्षकांचे चटकन अनुकरण करतात. तसेच त्यांच्यावर मुलांचा सर्वाधिक विश्वास असतो. त्यामुळे मुलांसाठी जी योग्य कृती असते ती पालक-शिक्षकांनी अंगवळणी पाडली तर मुलांना धाकदपटशा करण्याची वेळच येणार नाही, याकडे बालमानसशास्त्रज्ञ लक्ष वेधण्याचा प्रयत्न असतात.
शिक्षकांवर असलेला कामाचा ताण, मुलांच्या प्रगतीबाबत पालकांच्या अवास्तव अपेक्षा, शाळाबाह्य कामे या सगळ्याचेच दडपण आज शिक्षकांवर आहे. शाळाबाह्य कामाचे प्रमाण प्रचंड असल्यामुळे मुलांना शिकवणे ही सरकारी शाळांमध्ये दुय्यम बाब होत आहे. त्यामुळेच शिक्षकांवर अभ्यासक्रम पूर्ण करणे, मुलांच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडणे आणि शाळाबाह्य कामे उरकणे याचे एकाचवेळी दडपण आहे. त्यातही दर दहा वर्षांनी मुलांच्या आकलन आणि भोवतालच्या परिस्थतीत होणारे बदल लक्षात घेऊन शिक्षणपद्धतीत बदल करण्याचे, त्यानुसार शिक्षकांना प्रशिक्षित करण्याचे प्रयत्न आपल्याकडे होत नाहीत. त्यामुळेच वेदनेची आठवण झाली की हातालाही वळण येते, याच तत्त्वावर अनेक ठिकाणी शिक्षण चालते. शिक्षा हा शालेय जीवनाचा अविभाज्य भाग ठरतो.
मुलांचे बालपण जपण्याची, ते सुखद-आनंददायी करण्याची जबाबदारी पालक-शिक्षकांची आहे. कोणत्याही भीती, दडपणाशिवाय मुलांना हा काळ अनुभवता यायला हवा आणि एक चांगला माणूस घडायला हवा. त्यासाठी शिक्षेविना शिक्षण महत्त्वाची भूमिका बजावेल. शिक्षकांच्या हातातील छडीच नव्हे; तर मुलांच्या दिशेने रोखलेल्या नजरेतला धाकसुद्धा तितकाच त्रासदायक असतो. म्हणूनच शिक्षण प्रक्रियेचे लोकशाहीकरण व्हायला हवे. मुलांच्या आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब शाळांच्या दैनंदिन कामकाजात उमटायला हवे.