Chandraprabha Saikiani: Warrior who played an important role in breaking the practice of veiling in Assam
साल 1925, आसामातल्या नौगावात आसाम साहित्य सभेची बैठक सुरू होती. महिलांना शिकण्यासाठी प्रोत्साहन देण्याबाबत बैठकीत चर्चा होत होती, मुलींच्या शिक्षणाच्या विकासावर भर दिला जात होता.
या बैठकीत महिला आणि पुरुष दोघेही सहभागी होते. पण महिलांची बसण्याची व्यवस्था पुरुषांपासून वेगळी करण्यात आली होती. वेतापासून तयार करण्यात आलेल्या एका पडद्यामागे महिला बसल्या होत्या.

चंद्रप्रभा सैकियानी व्यासपीठावर आल्या आणि माईकवरून गर्जल्या, “तुम्ही सगळ्या पडद्यामागे का बसलायत…” त्यांनी सगळ्यांना पुढे येऊन बसायला सांगितलं.
चंद्रप्रभा सैकियानींच्या बोलण्याने सभेतल्या महिला इतक्या प्रभावित झाल्या की पुरुषांपासून त्यांना वेगळं करणारी ती वेताची भिंत मोडून काढत त्या पुरुषांसोबत येऊन बसल्या.

आसाममध्ये त्या काळात प्रचलित असणारी पडद्याची प्रथा मोडून काढण्यामध्ये चंद्रप्रभांची ही कृती महत्त्वाची मानली जाते.
16 मार्च 1901ला आसाममधल्या कामरूप जिल्ह्यातल्या दोइसिंगारी गावात चंद्रप्रभांचा जन्म झाला.
त्यांचे वडील रतिराम मजुमदार गावचे सरपंच होते आणि त्यांनी त्यांच्या मुलीच्या शिक्षणसाठी खूप प्रयत्न केले.
चंद्रप्रभा फक्त स्वतःच शिकून थांबल्या नाहीत. त्यांनी त्यांच्या गावातल्या शिक्षण घेणाऱ्या इतर मुलींकडेही लक्ष दिलं.
चंद्रप्रभा यांचे नातू अंतनू सैकिया सांगतात, “13 वर्षांच्या असताना त्यांनी त्यांच्या गावातल्या मुलींसाठी प्राथमिक शाळा सुरू केली. तिथे या किशोरवयीन शिक्षिकेला पाहून शाळेची पाहणी करणारे इन्स्पेक्टर प्रभावित झाले आणि त्यांनी चंद्रप्रभा सैकियानींना नौगांव मिशन स्कूलची शिष्यवृत्ती दिली. नौगाव मिशन स्कूलमध्येही त्यांनी मुलींसोबत शिक्षणाविषयी होणाऱ्या भेदभावाविषयी आवाज उठवणं सुरू ठेवले. असं करणाऱ्या त्या पहिला महिला असल्याचं मानलं जातं.”
1920-21मध्ये त्यांनी किरण्मयी अग्रवाल यांच्या मदतीने त्यांनी तेजपूरमध्ये महिला समितीची स्थापना केली.

चंद्रप्रभा आणि इतर स्वातंत्र्य सैनिकांनी ‘वस्त्र यज्ञ’ म्हणजे परदेशी कपड्यांवर बहिष्कार घालणारी मोहीम राबवली आणि या कपड्यांची होळी केली. यामध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या असल्याचं चंद्रप्रभांवर कादंबरी लिहीणाऱ्या निरुपमा बोरगोहाई सांगतात. याच दरम्यान गांधीजी तेजपूरला आले होते.

‘अभियात्री’ या निरुपमा बोरगोहाईंच्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला होता. मागास जातीत जन्माला आलेल्या चंद्रप्रभा सैकियांनींच लग्न त्या अगदी लहान असतानाच त्यांच्यापेक्षा वयाने अतिशय मोठ्या पुरुषासोबत लावण्यात आलं होतं आणि त्यांनी या लग्नाला नाकारलं होतं.

शिक्षिका म्हणून काम करत असताना चंद्रप्रभा यांना एका वेगळ्या नात्यातून दिवस गेले आणि त्या अविवाहित माता झाल्या. हे नातं फार काळ टिकलं नाही पण या नात्यातून जन्माला आलेल्या मुलाला त्यांनी स्वतःकडेच ठेवण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःच त्याचं पालनपोषण केलं.

चंद्रप्रभा सैकियानींनी फक्त मुलींच्या शिक्षणासाठीच काम केलं नाही तर त्यांना स्वतःच्या हक्कांची जाणीव करून दिली आणि स्वातंत्र्याचं आंदोलन त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी संपूर्ण राज्यभर सायकल यात्रा केली. असं करणाऱ्या त्या आसाममधल्या पहिल्या महिला असल्याचं मानलं जातं.

“गावातल्या अनुसूचित जातीच्या लोकांना तळयातून पाणी घ्यायची परवानगी नव्हती. पण चंद्रप्रभा सैकियानींनी याविरुद्ध आवाज उठवला, लढा दिला आणि या लोकांना त्यांचा हक्क मिळवून दिला. त्यांच्याच प्रयत्नांमुळे लोकांना तळ्यातून पाणी घेण्याचा अधिकार मिळाला. मंदिरांमध्ये खालच्या जातीच्या लोकांना प्रवेश मिळावा यासाठीही त्यांनी आंदोलन केलं, पण यात त्यांना यश मिळालं नाही.”
1930साली त्या असहकार आंदोलनातही सहभागी झाल्या होत्या. त्यांना तुरुंगवासही झाला. 1947 पर्यंत त्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या म्हणून काम करत होत्या.
त्यांच्या कार्याबद्दल 1972मध्ये त्यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
