S R Dalvi (I) Foundation

मार्क नको,गुण हवेत…

Don’t want only marks, but good qualities

मुलांच्या वार्षिक स परीक्षा नुकत्याच संपल्या आहेत. विविध स्पर्धा परीक्षांच्या निकालांनी तर धुमाकूळच घातलाय जणू त्यात मुलांपेक्षा पालकांचीच तळमळ दिसून येते. आपल्या मुलाने चांगले गुण मिळवावेत आणि चांगल्या क्षेत्रात करिअर करावे, असे अनेक पालकांना वाटते. त्यामुळे ते आपल्या मुलांना विविध स्पर्धा परीक्षांना बसवतात. मुलाने जास्तीत जास्त मार्क मिळवून ‘टॉपर’ राहावे असे प्रत्येक पालकालाच वाटत असते. त्यामुळे मग परीक्षा काळात “घोकमपट्टी’ सुरू असते. त्याकाळात पालक आपल्या पाल्याच्या मानसिकतेचा, त्याच्या सहनशक्तीचाही विचार करत नाहीत. त्यांच्यासमोर केवळ ‘मार्क’ हे एकच उद्दिष्ट असते.

या पार्श्वभूमीवर एका मुलाची गोष्ट सांगावीशी वाटते. माझ्याच पाहण्यातील एक मुलगा, लहानपणापासून खोडकर, अभ्यासात हुशार पण एकाग्रता नाही. परीक्षेत मार्क जेमतेम दहावी कसा तरी पन्नास टक्के मार्क मिळवून पास झालेला. वडील चांगल्या पदावर कामाला. आई गृहिणी, पण याचं लक्ष मात्र अभ्यासात नाही. शेतीविषयीचा एक कोर्स त्याने पूर्ण केला आणि एका कंपनीत कामाला राहिला. वडील फारसे खुश नव्हतेच. पण बाकी काहीच पर्याय नव्हता. वर्गातील बरोबरीचे मित्र चांगले मार्क मिळवून चांगल्या कामाला लागले. पण हा मात्र इथेच आपले गाव धरून राहिला.

लहानपणापासून कोणाच्या हाताखाली काम करायचे म्हणजे याच्या कपाळावर नुसत्या आठ्या. पण निरीक्षणशक्ती आणि तल्लख बुद्धी याच्या जोरावर त्याने एक चांगला निर्णय घेतला. कृषीविषयी साहित्याचे एक छोटेसे दुकान त्याने सुरू केले. छोट्या छोट्या गोष्टी म्हणता म्हणता आता तो कोटींची उलाढाल करायला लागला, एक यशस्वी आणि नवतरुण आदर्श उद्योजक म्हणून त्याचा गौरव करण्यात आला आणि आज खूप मार्क मिळवले म्हणून झळकणारी त्याच्या बरोबरीची मुले मात्र त्याच्या गुणांनी दिपून गेलीत. साऱ्यांनाच त्याचे कौतुक वाटत होते.

यावरूनच असे वाटत की, मनामध्ये जिद्द असू दे, काहीतरी करून दाखविण्याची. आपल्या मुलांकडून चांगल्या मार्काचा आग्रह न धरता चांगल्या गुणांची आशा धरूया. चांगले संस्कार व चांगल्या गुणांची पेरणी करूया. कारण आज ती काळाची गरज आहे. माकपेक्षा मुलामधील गुणांची जडणघडण झाल्यास तो समाजात एक आदर्शवत काम करत राहील, ही गोष्ट त्याच्या पालकांसाठी अभिमानास्पदही ठरू शकेल. त्याचा विचार होणे आता गरजेचे बनले आहे.

Scroll to Top