Face the exam easily by getting rid of the fear or anxiety of the exam!
परीक्षा म्हटली की, सर्वांच्याच पोटात गोळा येतो. दहावी किंवा बारावीत असलेल्या मुलांनाच नव्हे, तर त्यांच्या पालकांनाही त्यांच्या परीक्षेची चिंता लागून रहाते. दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत ८० टक्के गुण मिळवूनही चांगल्या महाविद्यालयामध्ये आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत ९५ टक्के गुण मिळवूनही आपल्या आवडत्या विषयात विश्वविद्यालयीन पदवी मिळवण्यासाठी आणि चांगल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे परीक्षा जसजशी जवळ येते, तसतसा प्रत्येक विद्यार्थ्याला थोडा तरी परीक्षेचा ताण अनुभवास येतो. या तणावामुळेच विद्यार्थी रात्री जागून अभ्यास करतात आणि त्यांचे अभ्यासावर लक्ष केंद्रित होते; परंतु हाच ताण अधिक प्रमाणात वाढल्यास परीक्षेच्या काळजीमुळेच विद्याथ्र्यांचा अभ्यास होत नाही. त्यांची झोप उडते आणि ते निराश होतात. परीक्षा जवळ आल्यावर मग रात्रंदिवस अभ्यास करण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या सल्ल्यानुसार पहिल्यापासून जोमाने अभ्यास करावा.
मुलांनो, परीक्षा जवळ आली की, तुमच्यापैकी अनेकांच्या पोटात गोळा येतो. काहीजण तर चक्क आजारी पडतात. परीक्षेची वाटणारी भीती किंवा चिंता घालवण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
१. स्वतःविषयी नकारात्मक विचार करू नये, उदा. मला गणिते सोडवता येणार नाहीत. उत्तरपत्रिका लिहितांना मला काहीच आठवणार नाही इत्यादी. असे नकारात्मक विचार मनात आल्यास ते लिहून काढावेत आणि त्यांविषयी आई-वडिलांशी, मोठ्या भावाशी किंवा शिक्षकांशी चर्चा करावी.
२. स्वतःची क्षमता समजून घ्यावी. त्याला एवढे गुण मिळाले, म्हणजे मलाही तेवढेच मिळाले पाहिजेत, अशी इतरांशी तुलना करू नये.
३. परीक्षेत मिळणारे गुण म्हणजेच सर्वस्व, असे समजू नये.
४. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवाव्यात. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो.
५. काही दिवस आधीपासून परीक्षेच्या प्रसंगाचा सराव करावा : ‘प्रसंगाचा सराव करणे’, ही ताण येणे, भीती वाटणे यांसारखे स्वभावदोष दूर करण्यासाठी उपयोगात आणावयाची मानसोपचार पद्धत आहे. यामध्ये आपल्याला सर्व जमते, अशी कल्पना करून त्याप्रमाणे मनाला सांगायचे असते.
६. परीक्षेला जाण्यापूर्वी मारामारी, हत्या आदी प्रसंग असलेले चित्रपट पाहू नयेत. त्यामुळे आपले मन दूषित होते. आपण त्या प्रसंगांचा विचार करत रहातो. त्यामुळे मनाच्या एकाग्रतेवर परिणाम होतो. शक्यतो आनंदाचे क्षण आठवावेत.
७. परीक्षेला जाण्यापूर्वी घरचेच अन्नपदार्थ ग्रहण करावेत; कारण अन्न बनवणार्या व्यक्तीच्या मनातल्या विचारांचा परिणाम अन्नावर होतो आणि हे अन्न सेवन केल्यावर त्याचा परिणाम आपल्यावर होतो. बाहेरचे अन्न हे व्यावसायिक हेतूने बनवलेले असते, तर घरच्यांनी आपल्यावरच्या प्रेमापोटी ते बनवल्यामुळे ते सात्त्विक असते.
पालक कसे साहाय्य करू शकतात ?
जी मुले आरंभापासूनच नियमितपणे अभ्यास करत नाहीत, त्यांना परीक्षा जवळ आल्यावर परीक्षेची भीती आणि ताण वाढणे हे स्वाभाविकच आहे; परंतु बर्याच वेळा उत्तम अन् नियमित अभ्यास करणार्या हुशार विद्यार्थ्यांच्या मनावरही परीक्षेचा ताण येतो; कारण त्यांच्या मनात ‘मला ९५ टक्के गुण मिळाले नाहीत किंवा माझा पहिला क्रमांक आला नाही, तर आई-वडिलांना आणि आपल्या नातेवाइकांना काय वाटेल’, ही भीती सतत डोकावत असते. अशा वेळी पालकांनी तू योग्य शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नियमितपणे आणि चांगला अभ्यास करावा, हीच आमची अपेक्षा आहे. ‘जास्तीतजास्त प्रयत्न करूनही तुला अल्प गुण मिळाले किंवा दुर्दैवाने तू अनुत्तीर्ण झालास, तरी आम्हाला काहीच वाटणार नाही’, असे आश्वासन मुलाला द्यावे. त्याला गीतेतील श्रीकृष्णाच्या वचनाची ‘फलाची अपेक्षा न करता कर्म करणे (अभ्यास करणे) हेच तुझे कर्तव्य आहे’, याची आठवण करून द्यावी.
आपल्या घरात अभ्यासू, शांत, आनंदी, वातावरण निर्माण करून देणे, हे पालकांचे उत्तरदायित्व त्यांनी पार पाडावे. मुलांचे अभ्यासात लक्ष लागून त्यांची एकाग्रता वाढवण्यासाठी खालील गोष्टी उपयोगी पडतील.
१. मुलाला अभ्यासासाठी वेगळी खोली द्यावी किंवा शक्य नसल्यास खोलीतील एका भागात छोटीशी विभागणी (पार्टीशन) करून द्यावी.
२. घरात दूरचित्रवाणी आणि आकाशवाणी लावू नये.
३. घरात आई-वडिलांची किंवा इतर मुलांची भांडणे होणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी.
४. घरातील भांडणतंटे मुलाच्या समोर सोडवू नयेत.
५. आपले मित्र किंवा आपल्या मुलाचे मित्र यांना घरी बोलावू नये.
६. अभ्यासासाठी मुलगा रात्री जागत असल्यास आपणही तत्त्वज्ञान किंवा आपल्या आवडीच्या विषयाचे वाचन करून त्याला साथ द्यावी.
परीक्षेचा विषय चांगल्या रीतीने समजण्यासाठी आणि परीक्षेत प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी तज्ञ शिक्षकांची योजना करावी. या तज्ञ शिक्षकांना शिकवण्याची आवड असावी आणि कठीण विषय सोपा करून सांगण्याची हातोटी असावी. विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्याच्या सर्व शंका त्यांनी प्रेमळपणे आणि न रागावता त्याला समजेपर्यंत समजावून सांगाव्यात. शिक्षकांनी आपल्या विद्याथ्र्यांकडून परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सोडवून घ्याव्यात. प्रश्नपत्रिका परीक्षेच्या ठराविक काळातच सोडवून त्याला आवश्यक ते मार्गदर्शन करावे. प्रत्येक विषयाची प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे मुलाच्या मनातील परीक्षेची भीती निघून जाईल आणि त्याचा आत्मविश्वास वाढेल.
विद्यार्थ्याला प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी पुरेसा वेळ नसल्यास मनातील परीक्षेची भीती घालवण्यासाठी खालील उपक्रमांचा लाभ होईल. या कामी पालकांनी मुलांना सहकार्य करावे.
विद्यार्थ्यांनी एका आसंदीमध्ये पाठ टेकून बसावे आणि डोळे मिटून शरिरातील सर्व अवयव शिथील करून स्वस्थ अन् शांत मनाने पुढील सूचनांकडे लक्ष देऊन ऐकावे आणि सूचनांशी मनाने एकरूप व्हावे. ‘तुझी परीक्षेच्या सर्व विषयांची संपूर्ण सिद्धता झालेली आहे. उद्या परीक्षा आहे. रात्रभर शांत झोप मिळाल्याने तू सकाळी ताजातवाना होऊन उठलेला आहेस. आपल्या आजच्या विषयाचे टाचण तू भराभर चाळत आहेस. ‘आता कोणत्याही प्रश्नाचे उत्तर चांगल्या प्रकारे लिहू शकेन’, असे तुला वाटत आहे. थोडासा अल्पोपहार घेऊन तू परीक्षेच्या सभागृहात वेळेवर पोहोचलेला आहेस. पहिली घंटा (बेल) वाजलेली आहे. आपल्या जागेवर बसून, डोळे मिटून, निर्विचार अवस्थेत तू शांत चित्ताने बसलेला आहेस. आता दुसरी घंटा (बेल) वाजलेली आहे. तुझ्या हातात प्रश्नपत्रिका मिळालेली आहे. प्रत्येक प्रश्न वाचून आणि गुण पाहून तू कोणते प्रश्न सोडवणार आहेस, याचा विचार केलेला आहेस. परीक्षेचे सर्व प्रश्न सोपे आहेत. तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर समाधानकारक लिहिले जात आहे. शेवटची १० मिनिटे राहिल्याची घंटा (बेल) वाजत आहे. तू भराभर सर्व पाने चाळून सर्व प्रश्न अचूक लिहिले आहेस का, याची निश्चिती करून घेतलेली आहेस. शेवटची घंटा (बेल) वाजली आहे आणि तू आपली प्रश्नपत्रिका पर्यवेक्षकांच्या हातात आणून देत आहेस. तू आता घरी आला आहेस आणि घरातील सर्वांना ‘प्रश्नपत्रिका सोपी गेली आहे’, असे सांगत आहेस. आता जेवून तू थोडा वेळ झोपणार आहेस आणि नंतर उद्याच्या परीक्षेची सिद्धता करणार आहेस. सर्व धड्यांचा सारांश वाचून झालेला आहे आणि आता तू शांत झोपत आहेस.’’ याप्रमाणे ५-६ वेळा सूचनांद्वारे मनाने परीक्षेच्या सभागृहामधून प्रश्नपत्रिका सोडवून आल्यामुळे विद्यार्थ्यांची परीक्षेची भीती न्यून होईल.