S R Dalvi (I) Foundation

छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ

Genealogy of Chhatrapati Shivaji Maharaj

भोसले घराणं सुमारे सतराव्या शतकात उदयास आलेलं आणि सत्ताधीश झालेलं मराठा घराणं.भोसले घराण्याविषयी, त्यांच्या मूळस्थाना विषयी फार माहिती आपल्याला आढळून येत नाही. ज्यावेळी शिवाजी महाराजांचा १६७४ ला राज्याभिषेक पार पडला त्यावेळी भोसले घराण्याचा उदेपूरच्या शिसोदे ( राजपूत ) घराण्याशी संबंध दिसून येतो. तीच क्रमवारी मराठी बखरीत पुढे सुरु ठेवलेली पहायला मिळते. बखरीत आलेल्या उल्लेखा नुसार ज्यावेळी उत्तर हिंदुस्थानात मुस्लिमांचे वर्चस्व वाढीस लागले त्या सुमारास भोसले दक्षिणेत स्थानांतरीत झाल्याचे बोलले जाते.

बाबाजी भोसले :-
भोसले घराण्याचा उल्लेख ज्यावेळी होतो त्यावेळी प्रथम थोडीफार माहिती आढळते ती बाबाजी भोसले यांची त्यांच्यापासून पुढे हि भोसले घराण्याची वंशावळ (Shivaji Maharaj Vanshaval) ठळक पद्धतीने माहिती होते पण त्यापूर्वीची नाही. बाबाजी भोसले यांना दोन मुलं मालोजी आणि विठोजी

मालोजी भोसले :-
बाबाजी भोसले यांचे दोन मुलं मालोजी आणि विठोजी भोसले हे निजामशाहीच्या आश्रयाने वेरूळ आणि घृष्णेश्वर भागात उदयास आले. मालोजी भोसले यांच्याकडे पुणे आणि सुपे भागाची जहागिरी होती. शहाजी व शरीफजी अशी मालोजींची दोन मुलं….!!

शरीफजी भोसले :-
मालोजींचा मुलगा शरीफजी भोसले यांच्या पत्नीचे नाव दुर्गाबाई

शरीफजी अहमदनगर ला जी प्रसिद्ध भातवडीची लढाई झाली त्यात युद्धादरम्यान मारले गेले.

शहाजीराजे भोसले :-
शहाजी महाराजांचा एकूण कार्यकाळ पाहीला तर सन १५९४ ते १६६४ असा कालखंड सांगता येतो. ( जन्म १८ मार्च १५९४, मृत्यू २३ जानेवारी १६६४ ) शहाजी महाराज हे प्रथमत: निजामशाहीत आणि त्यानंतर पुढे आदिलशाहीत सरदार म्हणून नावारूपाला आले. शहाजी महाराजांच्या तीन पत्नी होत्या जिजाबाई, तुकाबाई, आणि नरसाबाई. जिजाबाईंना दोन पुत्र होते…ज्येष्ठ पुत्र संभाजी आणि द्वितीय पुत्र शिवाजी महाराज..! शहाजी महाराजांच्या दुसऱ्या पत्नी तुकाबाई …. तुकाबाई आणि शहाजी राजांचा पुत्र होता व्यंकोजी उर्फ एकोजी राजे शहाजी राजांच्या तिसऱ्या पत्नी नरसाबाई या होत्या आणि त्यांचा पुत्र होता संताजी.

शिवाजी महाराज :-
मराठा साम्राज्याचे संस्थापक. महाराजांनी विजापूरच्या आदिलशाही विरुद्ध त्याचप्रमाणे मोगल आणि युरोपियन संघर्ष करत रायगडाला मराठा राजधानी स्थापित करून स्वतंत्र मराठा राज्य स्थापित केलं.
मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि पहिले छत्रपती होण्याचा बहुमान मिळविणारे शिवाजी महाराज ….!
१६७४ ला महाराजांचा राज्याभिषेक झाला.
जन्म १९ फेब्रुवारी १६२७, मृत्यू ३ एप्रिल १६८०
शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई होत्या.

संभाजी :- ( संभाजी शहाजी भोसले )
शहाजी राजांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी राजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू होते. १६२३ सालचा त्यांचा जन्म, जिजाबाईंनी आपले चुलत दीर संभाजी राजे यांच्या नावावरून आपल्या ज्येष्ठ पुत्राचे नाव संभाजी असे ठेवले. अफजल खानाने दगाफटका केल्यामुळे संभाजी १६५५ साली कर्नाटकातील कनकगिरीच्या लढाईत मारल्या गेले.

एकोजी :-
शहाजी राजे आणि तुकाबाईंचा मुलगा म्हणजे व्यंकोजी उर्फ एकोजी राजे ….!
मराठा साम्राज्याची स्थापना तामिळनाडू मधील तंजावर येथे करणारे व्यंकोजी राजे या गोष्टीसाठी इतिहासात ओळखले जातात. मराठ्यांचे कर्नाटकात बंगलोर हे प्रमुख ठिकाण होते, परंतु पुढे शहाजीराजांचे निधन झाल्या नंतर व्यंकोजी राजेंनी साम्राज्याचे स्थानांतरण केले आणि तामिळनाडू मधील तंजावर येथे साम्राज्य स्थापित केल्यामुळे मराठ्यांचे फार नुकसान झाल्याचे म्हंटल्या जाते.

संभाजी महाराज ( संभाजी शिवाजी भोसले ) :-
छत्रपती शिवरायांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला तो १४ मे १६५७ ला
संभाजी राजे अवघ्या दोन वर्षांचे असतांना त्यांच्या मातोश्री सईबाईंचे निधन झाले.
छत्रपती संभाजी राजांच्या पत्नीचे नाव येसूबाई असे होते आणि त्या दोघांच्या पुत्राचे नाव शाहू असे ठेवण्यात आले होते.
संभाजी राजांना छावा आणि शंभूराजे म्हणून देखील ओळखलं जायचं.
शिवाजी महाराजांच्या निधना नंतर संभाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची जवाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. १६८९ साली शंभू महाराजांसमवेत जो विश्वासघात झाला त्यामुळे ते मोगलांच्या हाती लागले आणि ११ मार्च १६८९ ला त्यांची हत्या केल्या गेली.

राजाराम महाराज ( सन १६७० ते सन १७०० ) :-
छत्रपती राजाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र
त्यांच्या मातोश्री म्हणजे सोयराबाई.
राजाराम महाराजांच्या पत्नी म्हणजे ताराबाई, जानकीबाई, आणि राजसबाई
ताराबाईंचे पुत्र शिवाजी द्वितीय
औरंगजेबाशी लढा देत असतांना संभाजी महाराजांची हत्या झाल्यानंतर राजाराम महाराजांकडे छत्रपती पदाची सूत्र आली.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राजाराम महाराजांनी संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या विश्वासू सेनापतींच्या मदतीने राज्यकारभार सांभाळला.
राज्यकारभार हातात आल्यापासूनच मुघल राजाराम महाराजांच्या मागावर होते.
परंतु राजाराम महाराजांनी मोगलांना गुंगारा देत आपल्या कुटुंबा समवेत विश्वासू सैनिकांच्या बळावर पन्हाळा मार्गे जिंजी गाठली. राजाराम महाराजांचे निधन १७०० साली सिंहगडावर झाले.

छत्रपती शिवाजी द्वितीय :-
राजाराम महाराज आणि राणी ताराबाई यांचा पुत्र म्हणजे शिवाजी दुसरे. राजाराम महाराजांच्या मृत्यू पश्चात ताराबाईंनी त्यांच्या या पुत्राला राज्याभिषेक केला आणि राज्यकारभाराची सूत्र सांभाळली. राजाराम महाराज आणि ताराबाई यांचे पुत्र शिवाजी दुसरे यांना ताराबाईंनी छत्रपती घोषित केले आणि त्यांना कोल्हापूर ची गादी स्थापित करून त्यावर विराजमान केले. औरंगजेबाला कडवी झुंज देत त्याच्या मृत्यू पर्यंत ताराबाईंनी मराठ्यांच्या ध्वज फडकता ठेवला. भाऊबंदकीच्या वादात तारा बाईंच्या आयुष्याचा बराच काळ कैदेत गेला.

छत्रपती शाहू महाऱाज :-
संभाजी महाराज आणि येसूबाई यांचा पुत्र शाहु महाराज हे सातारा गादीचे संस्थापक म्हणून परिचित आहेत.
शाहू महाराजांचा जन्म १८ मे १६८२ ला सातारा इथं आणि मृत्यू १५ डिसेंबर १७४९ चा
छत्रपती शाहू महाराज आई येसूबाईं समवेत लहानपणा पासून औरंगजेबाच्या कैदेत होते. राजाराम महाराजांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या पत्नी ताराबाई यांनी राज्यकारभार हाती घेतला. औरंगजेबाने ताराबाईंना शह देण्यासाठी शाहू महाराजांची सुटका केली. ताराबाई आणि शाहू यांच्यात युद्ध झाले आणि त्यानंतर तह झाला. तहात शाहू महाराजांच्या वाट्याला सातारा इथं राज्य स्थापन करण्याचे ठरले. शाहू महाराजांनी इ.स. १७०७ ते आपल्या मृत्यू पर्यंत १५ डिसेंबर १७४९ पर्यंत राज्यकारभार चालविला.
आज देखील साताऱ्याची गादी हि थोरली गादी म्हणून ओळखली जाते.

राजाराम महाराजांच्या दुसऱ्या पत्नी राजसबाई यांनी संभाजी या आपल्या मुलाला कोल्हापूर च्या गादीवर बसवलं.

शाहू महाराज १७४९ साली निपुत्रिक वारले. त्यांच्या माघारी ताराबाईंचा नातू दत्तकपुत्र रामराजा गादीवर आले. नानासाहेब पेशवे यांच्या मनात सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही गाद्या दत्तक मार्गाने एकत्र करण्याचा मानस होता, पण याला खुद्द शाहू महाराजांचाच विरोध होता.

संभाजी यांचे नाव ज्यावेळी पुढे आले त्यावेळी ताराबाईंनी रामराजा या आपल्या नातवाला शाहू महाराजांच्या पत्नीच्या मांडीवर दत्तक दिलं. त्यामुळे नानासाहेब पेशवे यांचे मनसुबे बारगळले.
शाहू महाराजांच्या पश्चात राज्य जरी छत्रपतींचे होते तरीही सत्ता पेशव्यांच्या हाती आली होती……

श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले :-
साताऱ्याचे उदयनराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज मानण्यात येतात. काँग्रेस पक्षाचे ते खासदार असून २०१९ ला लोकसभेच्या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून ते तिसऱ्यांदा निवडणुकीत विजयी झाले आहेत. परंतु राजीनामा देत त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला.

युवराज संभाजी राजे छत्रपती :-
सध्या कोल्हापूर संस्थानची धुरा शाहू महाराज दुसरे यांच्या हाती आहे. युवराज संभाजी राजे त्यांचे चिरंजीव आहेत. ११ फेब्रुवारी १९७१ चा त्यांचा जन्म. कोल्हापूर आणि राजकोट इथं त्यांनी शिक्षण पूर्ण केलं असून २००९ ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांनी लोकसभेची निवडणूक लढली होती पण त्यात त्यांचा पराभव झाला. पूढं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं २०१६ साली राष्ट्रपती नियुक्त म्हणून संभाजी राजे राज्यसभेवर गेले. राज्यसभेवर जाणारे ते पहिले कोल्हापूरचे खासदार होते. सयंमी आणि अभ्यासू वृत्ती हे त्यांचे स्वभाव विशेष आहेत.

युवराज संभाजी राजे छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक दिनाचं दरवर्षी रायगडावर आयोजन करतात.

रायगडाशी त्यांनी स्वतःला जोडून घेत गडाच्या संबंधित अनेक उपक्रमात ते हिरीरिने सहभाग घेतात.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधना नंतर मराठ्यांचे स्वराज्य दोन गाद्यांमध्ये विभागल्या गेलेले आढळते.

एक साताऱ्याची गादी आणि दुसरी गादी कोल्हापूर ची.

तसं पाहता आज कुणीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्ताचे वंशज नाहीत कारण सातारा आणि कोल्हापूर अश्या दोन्ही गाद्यांमध्ये बरीच दत्तक विधानं झाली आहेत.

Scroll to Top