George Fernandes: 8 things about the leader who agitated for the work of Mumbai Municipality to be done in Marathi
देशाचे माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचं मुंबईशी घट्ट नातं होतं. कामगार नेते म्हणून मोठं योगदान असलेल्या जॉर्ज फर्नांडिस यांनी मुंबई महापालिकेचा कारभार मराठीतून चालावा, यासाठी आंदोलन केलं होतं, शिवाय काळाघोडा पुतळा हटवण्याची मागणीही केली होती.
त्यांच्या संदर्भातील या 8 आठवणी
1) मुंबई महानगरपालिकेचा कारभार मराठीमधून चालवा, अशी मागणी करणारे आणि नगरसेवक या नात्याने ठाण मांडून बसणारे ते पहिले नेते होते. त्यांच्याबरोबर मृणाल गोरे आणि शोभनाथसिंहसुद्धा होते. समाजवादी चिंतक अमरेंद्र धनेश्वर यांनी ‘जॉर्ज – नेता, साथी, मित्र’ या पुस्तकात हा महत्त्वाचा उल्लेख केला आहे.
2) ‘ब्रिटिश साम्राज्यशाहीचे प्रतीक’ असणारा काळाघोडा पुतळा हटवावा यासाठी त्यांनी सत्याग्रह केला होता.
3) 1967च्या निवडणुकीत ‘धनदांडग्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या पाटलाना तुम्ही हरवू शकता,’असं पहिले भित्तिपत्रक काढून जॉर्ज यांनी प्रचार सुरू केला आणि काँग्रेसचे नेते स. का. पाटील यांना पराभूत केले. मोठ्या मताधिक्याने निवडून येत ते खासदार झाले.
4) जॉर्ज यांना कोकणी, तुळू, मराठी, इंग्लिश, हिंदी, कन्नड अशा भाषा येत होत्या.
5) या भाषांमध्ये संवाद साधत भाषणे करत त्यानी सबंध कामगार वर्गाची मने जिंकून घेतली होती. मुंबई महानगर पालिका युनियन, टॅक्सी चालक युनियन, बेस्ट कामगार युनियन अशा युनियन अशा संघटना त्यांनी स्थापन केल्या.
6) कामगार संपाच्या वेळेस जॉर्ज अत्यंत व्यग्र असत. त्यांच्याबद्दल कुमार सप्तर्षी यांनी ‘जॉर्ज – नेता, साथी, मित्र’ या पुस्तकात आठवण लिहून ठेवली आहे. “मुंबईच्या घामाघूम करणाऱ्या हवेत जॉर्ज फक्त लुंगी आणि बनियन घालून फिरत असे. टॅक्सीमध्ये केळीचा घड ठेवलेला असे. वडापाव आणि भरपूर केळी खाऊन तो लगातार कामगारांच्या बैठका घेत असे,” असे जॉर्ज यांचे वर्णन सप्तर्षी करतात.
7) “मुंबईमध्ये आल्यानंतर ऑफिस समोरच्या फूटपाथवर हा तरुण (जॉर्ज) झोपत असे. कधी कधी माझ्या राखीव जागेवर का झोपला म्हणून त्याच्या आधी मुंबईत आलेल्या लोकांच्या लाथा खात असे,” असेही सप्तर्षी यानी आपल्या आठवणीमध्ये लिहून ठेवले आहे.
8) 1974 साली जॉर्ज आणि कामगार नेत्यांनी मोठा संप घडवून आणला. 3 मे रोजी कामगारानी मुंबई बंदची घोषणा केली. दोन दिवस मुंबई बंद पडली. 5 मेपासून देशातील रेल्वे कामगार संपावर गेले. देशातील 20 लाख कामगार एकाच दिवशी संपावर गेले. सरकारने 13 लाख कामगारांच्या सेवा खंडित केल्या. 50 हजारहून जास्त कामगार पकडले गेले. वीस दिवस संप झाल्यावर 26मे रोजी जॉर्ज यानी तिहार जेलमधून संप मागे घेतला. 29 मेरोजी कामगार कामावर गेले.