S R Dalvi (I) Foundation

गुरूपौर्णिमा

Guru Purnima

गुरुसमान कुणी नाही सोयरा । गुरुविण नाही थारा ।।

गुरु निधान गुरु मोक्ष । गुरु हाच आपुला आसरा ।।

वर्षभरात १२ किंवा १३ पौर्णिमा येतात त्यापैंकी आषाढात येणारी पौर्णिमा गुरुंच्या स्मृतीत समर्पित केली जाते याच पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन. महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात. या दिवशी भगवान बुद्धांनी सारनाथ इथे पहिल्यांदा प्रवचन दिल्याचे मानलं जातं. भगवान बुद्धांच्या स्मॄती प्रित्यर्थ गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.

गुरूपौर्णिमा हा गुरूपूजनाचा दिवस. ह्या दिवशी शाळेत, मठ, मंदिरात, अभ्यास मंडळांत, आश्रमांत, गुरूकुलात गुरूंचे पूजन केले जाते. आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरूजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. नवजात जन्मलेल्या बालकाची प्रथम गुरू असते ती माता. चालायला बोलायला लागला की त्या जीवावर संस्कार घडवतो तो पिता. शालेय जीवनात ज्ञान, कला, विज्ञान ह्यांचे जे आपल्याला धडे देतात ते शिक्षक-शिक्षिका, आपण कोण आहोत, आपल्या जन्माचं कारण काय ह्याचेच मार्गदर्शन करणारे गुरु.

म्हणूनच ‘आई माझा गुरु, आई माझा कल्पतरु, सौख्याचा सागरु, आई माझी’, असे म्हटले जाते. आईसोबत वडीलही अनेक गोष्टी शिकवत असतात. त्यामुळे ‘मातृदेवो भव:, पितृदेवो भव:’, असेही म्हटले जाते. तसेच अनेक व्यक्तीमत्वांमधून ते गुरूतत्त्व आपण अनुभवत असतो. गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः हा श्लोक तर सर्वांनाच ज्ञात आहे.

हिंदु धर्मांत महर्षी व्यास आदय गुरु समजले जातात. या दिवशी व्यास मुनिंनी ब्रम्हसुत्रांचे लिखाण पुर्ण केले होते अशी मान्यता आहे. याच दिवशी व्यासांचा जन्म झाल्याचे ही मानले जाते. त्यामुळेच गुरूपौर्णिमेलाच व्यास पौर्णिमा असंही म्हणतात. महर्षी व्यास यांनी हिंदु संस्कुतीला अनेक धर्मग्रंथ दिले. म्हणुनच हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणुन साजरा केला जातो. हा दिवस शिष्याने गुरुस्मृतीत अर्पण करुन, आगामी वर्षातील नवनवे संकल्प करायचे असतात. गुरुंच्या मार्गदर्शनाखाली मार्गात येणारे अडथळे दूर करुन आपल्या ध्येयावर केंद्रीत होण्याचा निश्चय करायचा असतो. गुरु या शब्दाचा अर्थ खूपच व्यापक आहे.

गुरु पौर्णिमेदिवशी गुरुतत्व हजार पटीने कार्यरत असते. म्हणजे इतर दिवशी गुरुंसाठी काही केल्याने जो फायदा होतो, त्यापेक्षा गुरुपौर्णिमेला हजार पटीने फायदा होतो, हे या दिवसाचे माहात्म्य आहे. वैदिक काळापासून गुरुबद्दलचा आदर आपणास दिसून येतो. राज्यकर्ते जे, महाराजे देखील गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय राजकारण करित नसतात. भारतीय गुरु परंपरेत गुरु – शिष्याच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. जनक – याज्ञवल्क्य, शुक्राचार्य जनक, कृष्ण – सुदामा संदिपनी, विश्वामित्र – राम लक्ष्मण, परशुराम – कर्ण, द्रोणाचार्य – अर्जुन अशी गुरु शिष्य परंपरा आहे.

निसर्ग हा ही एक गुरुच आहे. त्यागाचे मूर्तीमंत प्रतीक म्हणजे निसर्ग निसर्गातील नद्या, पर्वत, झरे, धबधबे, दऱ्या – खोऱ्या, वली, फळे, पाऊस, सरोवर, वृक्ष हे आपणास, निश्चलता, गांभीर्य, परोपकार सहिष्णुता शिकवतात. निसर्ग हा जणू महान जादुगारच, त्याच्याजवळ ज्ञानाचा अपार खजिना आहे. निसर्गातून आपल्यावर कितीतरी चांगले संस्कार घडतात, पण त्यासाठी सर्वांनी निसर्गोपासना करायला हवी. वृक्ष, वेली, फुले, फळे या पासून शितलता, जमिनीपासून दृढ निर्धार असे कितीतरी सुस्कार आपण निसर्गातून घेऊ शकतो.

आज संस्कृतीचे अवमूल्यन मोठ्या वेगाने होत आहे. गुरु अर्थात शिक्षकाने वर्गात अपमान केला किंवा अभ्यासाबद्दल विचारले तर वेळप्रसंगी त्या गुरुला किंवा शिक्षकाला मारहाण सुद्धा केली जाते. अशा परिस्थितीमध्ये मुलांना गुरु आणि त्यांचे महात्म्य यांचे ज्ञान मिळणे आवश्यक असते त्यामुळे प्रत्येक घरात शाळेत शैक्षणिक संस्थेमध्ये गुरु पौर्णिमा साजरी झाली पाहिजे.

Scroll to Top