S R Dalvi (I) Foundation

देशाची संस्कृती जतन करून ठेवणारा ग्वाल्हेर किल्ला

Gwalior Fort, which preserves the culture of the country

खरंतर ऐतिहासिक या शब्दाची व्याप्ती आपल्याला आपल्या पूर्वजांनी जे निर्माण करून ठेवले आहे ते बघतांना कायमच येतं. त्यात पुरातन वास्तू बघतांना आपण हरवून जातो कारण पूर्वजांनी जो ठेवा आपल्यासाठी निर्माण केला आहे ते बघतांना आश्चर्य वाटतं. किल्ले,वाडा,मंदिर ही आजही ऊन-वारा-पावसाची तमा न बाळगता दिमाखात उभी आहे. किल्ले आणि महालं बघण्याची पसंती असेल तर राजस्थान आणि महाराष्ट्रासोबतच मध्यप्रदेशात येऊनही आपण भारताची संस्कृती आणि वैभव जाणून घेण्यासाठी आपण ग्वाल्हेर किल्ल्याची भव्यता बघू शकतो.

गोपांचल पर्वतावर असलेला ग्वाल्हेर किल्ला अतिशय लोकप्रिय आहे. गेल्या २ वर्षांपासून हा किल्ला बघण्याचे मनात होते. पण अखेर हे वैभव बघतांना मनात सहज विचार आला की आपला ऐतिहासिक इतिहास आणि त्याची भव्यता ही खरंच मन मोहवून टाकणारी आहे. या किल्ल्यावर गेल्यावर त्या वास्तूची भव्यता डोळे दिपवून टाकणारी आहे सोबतच हा किल्ला देशातील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक आहे. ८व्या शतकात तयार करण्यात आलेला हा किल्ला येथील संस्कृती आणि वैभवाची ओळख करून देणारा आहे. यावर मुघलांपासून ते ब्रिटिशांपर्यंत सर्वांनी राज्य केलं. हा किल्ला दोन भागांमध्ये विभागला आहे. एक आहे मान मंदिर पॅलेस आणि दुसरा गुजरी पॅलेस. याला आता म्युझियमचं रूप देण्यात आलं आहे.

ऐतिहासिक ग्वाल्हेरकिल्ला बलुआ दगडाच्या डोंगरावर उभारला आहे आणि १०० मीटर उंचीवर आहे. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी दोन रस्ते आहेत. पहिला ग्वाल्हेर किल्ला गेट आणि दुसरा उरवाई गेट. किल्ल्याच्या भींती सरळ उंच असून बाहेरील भींती २ मीटर लांब आणि रूंदी १ किमी ते २०० मीटरपर्यंत आहे. डोंगरापर्यंत जाण्यासाठी तयार रस्त्यांच्या दोन्ही बाजूला सुंदर नक्षीकाम बघायला मिळतं.

किल्ल्याचं मुख्य द्वार हत्ती फूल नावाने ओळखलं जातं.किल्ल्याच्या स्तंभावर ड्रॅगनची कलाकृतीही आहे. तसेच किल्ल्यावर गुरू गोविंद यांच्या स्मृतीत एक गुरूद्वाराही तयार केला आहे. सोबतच जुन्या शैलीमध्ये मानसिंग महालही उभा आहे. त्यासोबतच सहस्त्रबाहू मंदिर, चतुर्भुज मंदिर, तेली मंदिर आणि १४व्या शतकातील गुहा सुद्धा इथे आपण बघू शकतो. तसेच जहांगीर महाल, कर्ण महाल, विक्रम महाल आणि शाहजहां महालही सुंदर आहे. या किल्ल्याचं निर्माण आठव्या शतकात राजा मान सिंग तोमर यांनी केलं होतं.

हेरिटेज साइट असल्याकारणाने हा किल्ला बघण्यासाठी पर्यटकांची नेहमीच मोठी गर्दी असते. पण नोव्हेंबर ते मार्च महिना हा कालावधी किल्ला फिरण्यासाठी उत्तम कालावधी मानला जातो. कारण यादरम्यान फार थंडीही नसते आणि फार गरमी सुद्धा नसते. त्यामुळे तुम्ही आरामात किल्ल्याची सफर करू शकता. शनिवार-रविवार किल्ला बघायला गेलात तर गर्दी जास्त मिळू शकते.

शहराच्या मधोमध हा किल्ला असल्याने इथे तुम्हाला सहजपणे टॅक्सी आणि बसची सुविधा उपलब्ध होईल. स्थानिक रिक्षा आणि ऑटोच्या साह्याने आपल्याला किल्ल्यावर सहज जाता येतं. वास्तुकलेचा अप्रतिम नमुना असलेला ऐतिहासिक ग्वाल्हेर किल्ला इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभा आहे.
वर्षांमागुन वर्षे गेली पण हे ऐतिहासिक वैभव आजही दिमाखात उभी आहे . येणारे नवे वर्ष असेच ऐतिहासिक वैभवाची श्रीमंती बघण्यात जावे हीच सदिच्छा आहे. आपणही हे ऐतिहासिक वैभव, संस्कृती बघायला हवेच.

Scroll to Top