S R Dalvi (I) Foundation

निसर्गाचं संवर्धन आपण कसे करू शकतो!

How can we conserve nature!

पूर, चक्रीवादळ, दुष्काळ, प्रदूषण, जंगलातले वणवे आणि कोसळणारे हिमकडे… गेल्या काही वर्षांत भारताला अशा अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला आहे. त्या संकटांची तीव्रता पर्यावरणातल्या मानवी हस्तक्षेपामुळे कशी वाढली यावरही अनेकदा चर्चा झाली आहे.

खरं तर पर्यावरणाचं महत्त्व काय आहे आणि माणसाचं अस्तित्व पर्यावणातल्या इतर सर्व घटकांवर कसं अवलंबून आहे, हे वेगळं सांगायला नको. आताची युवा पिढी त्याविषयी सजगही बनली आहे. म्हणूनच संयुक्त राष्ट्रांनी या पिढीचं वर्णन #GenerationRestoration असं केलं आहे.

पण हे रीस्टोरेशन म्हणजे जीर्णोद्धार कसा करायचा? त्यासाठी आपण काय करू शकतो? तर स्वतःपासून सुरुवात करू शकतो.

तुम्ही शहरात राहात असाल, किंवा गावात. एकदम मोठे बदल करणं प्रत्येकालाच शक्य नसतं, पण आपण टाकलेली छोटी पावलंही मोठी मजल मारण्यासाठी महत्त्वाची ठरू शकतात. 

1) हे तीन R कधी विसरू नका

Reduce, Reuse, Recycle अर्थात ‘कमी वापरा, पुन्हा वापरा, पुनर्निर्मिती करा’ हा मंत्र तुम्हाला माहिती असेल.

आपण जितकं निसर्गाकडून घेतो, तितकी पर्यावरणाची हानी होते. त्यामुळे गरज असेल तेव्हाच आणि तेवढ्याच वस्तूंचा वापर करावा. गरजा कमी केल्या की वस्तूंची मागणी कमी होते आणि त्या वस्तूंच्या निर्मितीमुळे निसर्गावर पडणारा ताण कमी होतो.

पर्यावरणपूरक जीवनशैलीचं हेच सूत्र आहे.

जागतिक पर्यावरण दिन

लॉकडाऊनमुळे तर ते आपल्या अंगवळणी पडलं आहे. जसं की, घरून काम करताना आपल्याला खूप सारे कपडे लागत नाहीत याची अनेकांना जाणीव झाली.

2) आपलं अन्न कुठून येतं? हा प्रश्न विचारत राहा

आपण खातो त्या पदार्थांची निर्मिती कुठे आणि कशी झाली आहे याविषयी माहिती करून घ्या.

कधीकधी खाद्यपदार्थ निर्मितीच्या प्रक्रियेत पर्यावरणासाठी हानीकारक घटकांचा वापर होतो. तसंच दूरवरून एखादा पदार्थ आणण्यासाठी वाहनांचा वापर केलेला असतो. असे पदार्थ प्लॅस्टिकच्या वेष्टनात गुंडाळलेले असू शकतात. हे टाळता येईल का याचा विचार करा.

अन्नाच्या ‘कार्बन फूटप्रिंट’चाही विचार करा. कार्बन फूटप्रिंट म्हणजे एखाद्या प्रक्रियेतून जागतिक तापमानवाढीस कारणीभूत असलेल्या वायूंचं उत्सर्जन किती झालं, याची गोळाबेरीज.

मांसाहारी पदार्थांची कार्बन फूटप्रिंट तुलनेनं अधिक असल्यानं अनेक पर्यावरणप्रेमी मांसाहार टाळण्याचा किंवा कमी करण्याचा सल्ला देतात. कुणी तर अगदी व्हेगन बनतात, म्हणजे प्राण्यांपासून मिळणारे कुठलेच पदार्थ खात नाहीत.

पण प्रत्येक पदार्थाची अशी आकडेवारी काढणं शक्य होईलच असं नाही आणि प्रत्येकाचं पोट कसं भरायचं असा प्रश्न उभा राहतो. शिवाय शाकाहारी पदार्थांचीही ‘कार्बन फूटप्रिंट’ जास्त असू शकते.

पर्यावरण, निसर्ग, हवामान बदल

मग आपण काय करायचं? स्थानिक पातळीवर तसंच शाश्वत पद्धतीनं तयार केलेल्या पदार्थांना प्राधान्य द्यायचं. शक्य असेल तर भाजीपाल्यासारख्या गोष्टींची घरी लागवड करा किंवा जवळच्या भागातून आलेल्या मालाला प्राधान्य द्या. त्यामुळे तुम्हाला ताजं मिळेल. तसंच साठवणूकीवर खर्च होणारी उर्जा आणि ते सडल्यानं निर्माण होणारा कचरा हे दोन्ही प्रश्न उभे राहणार नाहीत.

3) अन्नाची नासाडी टाळा आणि कचऱ्याचं व्यवस्थापन करा

संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या फूड इंडेक्सनुसार ग्राहकांसाठी दुकानात, रेस्टॉरंट्समध्ये आणि घरात उपलब्ध असलेल्या अन्नापैकी 17% टक्के अन्न वाया जातं. त्यात घरात वाया जाणाऱ्या अन्नाचा वाटा मोठा आहे.

वाया गेलेलं अन्न कुजतं, तेव्हा त्यातून मिथेन वायू बाहेर पडतो. जागतिक तापमानवाढीसाठी हा वायूही कारणीभूत आहे. वर्ल्ड वाईल्डलाईफ फंडच्या अंदाजानुसार अन्नाची नासाडी थांबवली, तर माणसाकडून होणारं हरितवायूंचं उत्सर्जन 6 ते 7 टक्क्यांनी कमी होऊ शकतं.

अन्न उरलं किंवा वाया गेलंच तर कंपोस्ट बनवता येईल. अगदी लहान घराच्या बाल्कनीतही कंपोस्टिंग करता येतं. पण ते शक्य नसेल, तर तुमच्या सोसायटीत किंवा गावात कंपोस्ट प्लांट बसवण्यासाठी प्रयत्न करा.

निदान घरात ओला-सुका कचरा वेगळा ठेवा. सुक्या कचऱ्यातील धातू आणि प्लॅस्टिकसारख्या गोष्टी रिसायकल करा.

4) पाण्याचं महत्त्व नेहमी लक्षात ठेवा

घरात पाण्याची गळती होणार नाही याची काळजी घ्या. घरातले बिघडलेले नळ आणि पाईप दुरुस्त करून घ्या.

गावात असाल, तर जलसंधारणाच्या कामात सहभागी होणं, शहरात असाल तर इमारतीत पावसाचं पाणी साठवण्याची व्यवस्था करणं (रेनवॉटर हार्वेस्टिंग) अशा गोष्टी तुम्ही करू शकता.

शेती किंवा उद्योग व्यवसाय करत असाल तर त्यात पाण्याचा कमी वापर आणि पुनर्वापर करण्यावर भर द्या. धरणं, झरे, विहिरी अशा पाण्याच्या नैसर्गिक स्त्रोतांमध्ये आपल्यामुळे प्रदूषण होणार नाही, याची काळजी घ्या.

5) प्लॅस्टिकऐवजी पर्यायांचा वापर करा

प्लॅस्टिकच्या पिशव्या असोत, वा प्लॅस्टिकचे अगदी सूक्ष्म कण. पर्यावरणावर त्यांचा किती परिणाम होतो आहे, याची जाणीव ठेवा.

कापडी पिशवी बाळगणं हा सवयीचा भाग बनू द्या. बाहेर फिरायला जाताना सोबत एखादी पाण्याची बाटली ठेवा, म्हणजे प्लॅस्टिकची बॉटल विकत घ्यावी लागणार नाही. जवळपास सर्वच हॉटेलमध्ये पाण्याचे फिल्टर्स किंवा प्युरिफायर बसवलेले असतात. तरीही पाण्याच्या शुद्धतेविषयी शंका असेल, तर ते उकळवून घेता येईल का, ते पाहा. फक्त रिसायकल करता येईल असंच प्लॅस्टिक वापरावं. एकदा वापरून फेकून द्यावं लागणाऱ्या स्ट्रॉ किंवा कॉटन बड्ससारख्या वस्तू वापरणं बंद करावं.

6) प्रवास करताना जागरूक राहा

खासगी वाहनांपेक्षा सार्वजनिक वाहनांचा वापर पर्यावरणासाठी फायद्याचा ठरतो. मात्र भारतासारख्या देशात अनेक शहरांमध्येही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरेशी चांगली नाही.

पर्यावरण

अशा वेळी आपण कुठल्या वाहनातून प्रवास करतो आहोत, कशासाठी करतो आहोत, याचा विचार करावा.

जवळच जाण्यासाठी शक्य असेल तर सायकलचा वापर किंवा पायी चालत जाणं हे पर्याय तब्येतीसाठीही चांगले आहेत आणि पेट्रोलच्या किंमती पाहता, खिशालाही परवडणारं आहे.

7) इलेक्ट्रॉनिक उपकरणं वापरताना विचार करा

फ्रिजसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर ते किती उर्जा खर्च करतात याविषयीची माहिती दिलेली असते. ती पाहूनच योग्य उपकरणांची खरेदी करा.

फ्रिज आणि फ्रिझरचं तापमान नियंत्रित राहील याची काळजी घ्या. युरोपियन एन्व्हायर्नमेंट एजन्सीच्या मानकांनुसार फ्रिजचं तापमान 1 ते 4 अंश सेल्सियस आणि फ्रीझरचं तापमान -18 अंश सेल्सियस असावं.

एअर कंडिशनर खोलीचं तापमान कमी करतात, मात्र बाहेरच्या तापमानात थोडी भर टाकतात. अशी उपकरणं सतत सुरू ठेवणं टाळा. भारतात एसीचं तापमान सेट 24-28 डिग्रीच्या रेंजमध्ये असावं, असं तज्ज्ञ सांगतात.

पर्यावरण

वापरलेल्या जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तू अशाच कचऱ्यात न टाकता रिसायकलिंगसाठी द्या. तुमच्या शहरात किंवा इंटरनेटवर त्यासाठी काय पर्याय आहेत याची माहिती घ्या.

8) स्थानिक झाडांचीच लागवड करा

तुमच्या परिसरात झाडांची लागवड, संगोपन आणि संरक्षण करण्यासाठी मदत करा. झाडं फक्त झाडं नसतात, तर ती पक्षी, फुलपाखरं, खार, अशा सजीवांचे अधिवास असतात. त्यामुळे स्थानिक प्रजातींची झाडं लावण्यावर भर द्या.

9) परिसराविषयी जागरूक राहा

तुम्ही वावरता त्या परिसरातील निसर्गाविषयी, पर्यावरणासमोरील समस्यांविषयी तज्ज्ञांकडून माहिती घ्या आणि ती इतरांपर्यंत पोहोचवा. पर्यावरणासाठी काम करणाऱ्या खासगी किंवा सरकारी उपक्रमात तुम्ही स्वयंसेवक म्हणून सहभागी होऊ शकता.

10) जे शक्य असेल, ते करत राहा.

या सगळ्या सवयी लावणं सुरुवातीला कठीण वाटतं, पण एकदा सुरुवात केलीत, तर ते तुमच्या सवयीचा भाग बनतं, असा अनुभव सगळेच पर्यावरणप्रेमी नोंदवतात. एखादी सवय किंवा एखादी गोष्ट वापरणं पूर्णपणे सोडून देता येत नसेल, तर तिचा वापर कमीत कमी करणं, हेही महत्त्वाचं आहे. काहीच न करण्यापेक्षा, काहीतरी करणं केव्हाही चांगलंच असतं.

Scroll to Top