S R Dalvi (I) Foundation

शिक्षण कसे हवे?

How should education be?

तरुणांना सक्तीचे लष्करी शिक्षण, तसेच संत, देशभक्त आणि क्रांतीकारक यांच्या कथा अभ्यासासाठी दिल्याने त्यांना देशासाठी जगणे आणि मरणे याची प्रेरणा मिळेल.

शिक्षण कसे हवे, याचा विचार आणि कृती आवश्यक आहे. भारतात जे जे क्रांतीकारक झाले, जे संत झाले, जे देशभक्त स्वातंत्र्यासाठी लढले आणि त्यासाठी हुतात्मा झाले, जे शास्त्रज्ञ झाले, जे समाजाच्या उन्नतीसाठीच जगले, ज्यांनी समाजाच्या उत्थानासाठी संघटना निर्माण करण्यास जीवन दिले, त्या सर्वांचे पूर्ण चरित्र हे तरुण पिढीला, लहान मुलांना अभ्यासासाठी असलेच पाहिजे. मुलांना सक्तीने २ वर्षे लष्करी शिक्षण असावे. संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम, समर्थ रामदास यांचे हे ग्रंथ विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी ठेवले पाहिजेत. क्रांतीकारक भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, वासुदेव बळवंत फडके, चाफेकर आणि स्वा. सावरकर यांच्या सर्व कथा तरुणांसमोर आल्या पाहिजेत.

उच्चशिक्षित असण्यापेक्षा सुसंस्कारांचे शिक्षण महत्त्वाचे
सध्याची मुले आणि तरुण यांना पंचतंत्र, इसापनीती, रामायण, महाभारत, शिवराय आणि क्रांतीवीर यांच्या कथा ज्ञात नसतात; कारण त्यांच्या पालकांनी त्यांना त्या सांगितलेल्या नसतात. हॅरी पॉटर वाचून संस्कारीत पिढी निर्माण होणार नाही. आजचा तरुण विद्यार्थी विनाशकारी (destructive) झाला आहे. त्याला त्या दुष्प्रवृत्तीपासून परावृत्त करण्याकरता जगभरातील शिक्षणतज्ञांनी मूल्यशिक्षणावर (value education) अधिष्ठीत अभ्यासक्रम सांगितला आहे. मूल्यशिक्षणामुळे त्याच्यातील आसुरी प्रवृत्तींचा नाश होऊन तो आदर्श नागरिक होईल, असा या शिक्षण शास्त्रज्ञांचा दावा आहे.

चारित्र्यनिर्मितीचे शिक्षण
जीवननिर्मिती, मानवनिर्मिती, शील आणि चारित्र्य यांची निर्मिती अन् विचारांची एकरूपता या पाच गोष्टींचे शिक्षण मिळाल्यास अन् त्यांचे पालन केल्यास माणूस आदर्श होईल ! हल्लीचे शिक्षण म्हणजे तुमच्या डोक्यात कोंबलेली केवळ माहिती. ही डोक्यात शिरलेली माहिती न पचल्यामुळे सर्व जीवनभर गोंधळ उडत असतो. आपल्याला जीवननिर्मिती, मानवनिर्मिती, शील आणि चारित्र्य यांची निर्मिती करणारे आणि विचार एकजीव करणारे शिक्षण हवे. तुम्ही केवळ हे पाच विचार पचवले आणि आपल्या जीवनात त्यांचे पालन केले, तर तुम्ही संपूर्ण ग्रंथालय मुखोद्गत असलेल्या माणसापेक्षा जास्त शिक्षित असाल. हे शिक्षण राष्ट्राच्या आदर्शांना धरून असेल आणि शक्यतो ते प्रायोगिक असेल.

चारित्र्यसंपन्न तरुण पिढी निर्माण होण्यासाठी सत्य, प्रामाणिकपणा असलेले आणि पारदर्शी व्यवहार असलेले शिक्षण तरुण पिढीला मिळाले, तरच ती पिढी सुधारेल आणि देश वैभवशाली होईल. आज देशातील आतंकवाद, भ्रष्टाचार, महागाई, लोकसंख्या विस्फोट, बेरोजगारी आणि पाणीटंचाई हे प्रश्‍न उद्या अराजक निर्माण करतील. त्याला चारित्र्य निर्माण करणारे शिक्षण हेच उत्तर आहे

धर्मशिक्षण
नैतिक मूल्ये जपली जावीत, यासाठी केवळ वरवरच्या उपाययोजना कामी येणार नाहीत. त्यासाठी सर्वांना धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे. धर्मपालनामुळे समाजाचा सत्त्वगुण वाढतो. त्यातून नैतिक मूल्ये जपण्यासाठी आत्मबल मिळते. हे आत्मबलच आजची शिक्षणप्रणाली देऊ शकत नाही. समाजाचा सत्त्वगुण वाढवल्यामुळे सर्वच क्षेत्रांतील अधःपतन रोखणे शक्य होईल.

Scroll to Top