S R Dalvi (I) Foundation

प्रबोधनाची बांधिलकी जपणारे अर्थतज्ज्ञ

Meanings that maintain a commitment to enlightenment

महाराष्ट्रातील ख्यातनाम अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा. डॉ. जे. एफ. पाटील ७ डिसेंबर रोजी ८१व्या वर्षी कालवश झाले. प्रा. डॉ. जे. एफ. पाटील यांच्यासारख्या व्यासंगी विचारवंताने अर्थशास्त्रासारखा विषय सोपा करून लोकांपर्यंत पोहोचवला.

महाराष्ट्रातील ख्यातनाम अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा. डॉ. जे. एफ. पाटील ७ डिसेंबर रोजी ८१व्या वर्षी कालवश झाले. ते अर्थशास्त्राचे गाढे व्यासंगी, ख्यातनाम वक्ते, लेखक, विचारवंत म्हणून सुपरिचित होते. पुण्याच्या गोखले इन्स्टिटय़ूटमधून त्यांनी पीएच.डी. प्राप्त केलेली होती. जयकुमार फाजगोंडा पाटील हे त्यांचे पूर्ण नाव. पण ‘जे. एफ.’ या नावाने ते सर्वपरिचित होते. सरांनी भिलवडी, इस्लामपूर, आष्टा सांगली आदी ठिकाणी शिक्षक व अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. नंतर १९८४ पासून ते शिवाजी विद्यापीठात रुजू झाले. १९९८ साली ते तिथेच निवृत्त झाले.

शिवाजी विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक, विभागप्रमुख, महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक, गोडबोले अध्यासनाचे प्रमुख म्हणून त्यांनी दिलेले योगदान अतिशय मौलिक स्वरूपाचे आहे. महाराष्ट्रातील बहुतांश सर्व विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर त्यांनी काम केलेले आहे. महाराष्ट्र शासनाच्या अर्थविषयक समित्यांवर नियोजन समितीवर त्यांनी काम केले आहे. मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या वाटचालीतही सरांचे योगदान अतिशय मोठे आहे. भारतीय कृषी अर्थशास्त्र परिषदेचे सर उपाध्यक्ष होते. मराठी व इंग्रजीमध्ये सातत्याने लेखन करणाऱ्या जे. एफ. सरांची शंभरावर पुस्तके प्रकाशित आहेत.

समाजवादी प्रबोधिनीच्या स्थापनेपासून जे. एफ. सर प्रबोधिनीच्या कार्यात सक्रिय होते. प्रबोधिनीच्या सुरुवातीच्या काळात आचार्य शांताराम गरुड यांनी विविध विषयातले जे अभ्यासक, संशोधक शोधले आणि त्यांना प्रबोधन चळवळीशी जोडून घेतले त्यात जे. एफ. सरांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने सुरुवातीपासून अर्थशास्त्रविषयक पुस्तिका निघाल्या आणि १९९० पासून ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती’ हे नियमित मासिक सुरू झाले. त्यामध्ये सरांचे अर्थशास्त्रविषयक लेखनाचे योगदान सर्वात मोठे आहे. प्रबोधिनीसाठी त्यांनी डंकेल प्रस्तावाचा तिढा, महामंदी येत आहे, महागाई : कारणे व उपाय, नोटाबंदी, कोरोनाबंध यासारखी अनेक पुस्तके, पुस्तिका लिहिल्या. तसेच ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती’ मासिकातही त्यांचे ‘अर्थाअर्थी’ हे सदर सुरू होतेच. अर्थशास्त्राबरोबर, साहित्य, कला, राजकारण, तत्त्वज्ञान, धर्म, शिक्षण असे सगळे विषय त्यांच्या सूक्ष्म वाचनाचा भाग होते.

अर्थशास्त्रविषयक लेखकांची, वक्त्यांची एक फळीच त्यांनी उभी केली. हे महाराष्ट्राच्या अर्थशास्त्रीय प्रबोधनाच्या क्षेत्रातील अनमोल स्वरूपाचे कार्य आहे. अर्थशास्त्रासारखा क्लिष्ट विषय ते लेखनातून व बोलण्यातून कमालीचा सोपा करत असत. समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने गेली ४४ वर्षे ‘केंद्रीय अर्थसंकल्प व्याख्यानमाला’ घेतली जाते. ती सरांनी एक हाती सांभाळली. विषयांची विभागणी व वक्त्यांची निवड ते त्यांच्या अनुभवातून फार नेमकी करत. नवे अभ्यासक, वक्ते घडवत. प्रबोधिनीच्या वतीने विविध शाखांवर आयोजित केली जाणारी अभ्यास शिबिरे, व्याख्याने, चर्चासत्रे, मेळावे यामध्येही त्यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे होते. सरांना व्याख्यानासाठी, मार्गदर्शनासाठी निमंत्रित केले आणि त्यांनी नकार दिला असे कधी झाले नाही. समाजवादी प्रबोधिनीच्या सर्व शाखांवर मार्गदर्शनासाठी सर यायचे. या सगळय़ामागे सरांची प्रबोधनाची चळवळ पुढे गेली पाहिजे ही तळमळ तसेच त्यासाठी वेळ, बुद्धी, श्रम देण्याची व अनेकदा पदरमोड करण्याची ठाम भूमिका महत्त्वाची होती.

जातिवंत शिक्षकाने निवृत्तीनंतरही कसे सक्रिय राहिले पाहिजे याचे उत्तम उदाहरण जे. एफ. सर होते. ते सतत लेखन, वाचन, भाषण करत. त्यांचा वेग सर्वार्थाने अचंबित करणारा होता. प्रेरणादायक होता. समाजवादी प्रबोधिनीची गेली ४५ वर्षे जी वाटचाल सुरू आहे त्यामध्ये प्रा. डॉ. जे. एफ. पाटील यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. त्यांना आदर्श शिक्षकासह अनेक पुरस्कार मिळालेले होते. तसेच मराठी अर्थशास्त्र परिषदेचा डॉ. श्री. आ. देशपांडे जीवन गौरव पुरस्कार, शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेचा कुलपती डॉ. पतंगराव कदम जीवन गौरव पुरस्कार, डी. वाय. पाटील विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला होता. सरांनी शेकडो विद्यार्थी, अभ्यासक, वक्ते, घडवून अर्थविषयक प्रबोधन क्षेत्रात अतिशय मौलिक काम केले. अशा जे. एफ. सरांना विनम्र अभिवादन.!

Scroll to Top