S R Dalvi (I) Foundation

नवरात्री…

Navratri …

आज नवरात्रीचा पहिला दिवस आज तिच्या घरात घटस्थापना करायची होती. दोन दिवस झाले सासूबाईंनी रजा घे रजा घे म्हणून तिचे कान खाल्ले होते. तरी तिने कामवाल्याबाईकडून सगळी स्वच्छता करून घेतली होती. ऑफिसमध्ये खूप कामं असल्याने तिला सुट्टी मिळणे केवळ अशक्य होते.
म्हणून ती पहाटे चार वाजता उठली.स्वतःच सगळं आवरून ती पूजेला बसली. अगदी अभिषेक, फुले-पाने वाहून तिने साग्रसंगीत पूजा केली. त्यानंतर एका मोठ्या परातीत पत्रावळी ठेऊन माती आणि सात धान्ये घालून त्यावर नारळ आणि घट ठेऊन भक्तिभावाने पूजा नमस्कार केला. इतके सगळे करेपर्यंत तिला सात वाजले. मग सुरू झाली नाष्टा आणि डब्याची गडबड मुलीला उठवून तिचे आवरले. तिने सगळे उरकले. त्यात नऊ वाजून गेले. आज तिचा उपवास होता साबुदाणा रात्रीच भिजत घातला होता तिने पण थोड्याच वेळात ऑफिसला निघावे लागणार होते त्यामुळे खिचडी करायला वेळ कुठे होता. जाऊ दे आज कडक उपवास करू म्हणून ती तिचे आवरायला बेडरूममध्ये निघून गेली. हॉलमध्ये पर्स घेऊन आली तर सगळीकडे खिचडीचा खमंग वास दरवळत होता. तिला आश्चर्य वाटले कोण केली खिचडी? सासूबाई तर करणार नाहीत कारण त्यांना हल्ली किचनमध्ये काही सुधरत नाही. तोपर्यंत तिचा नवरा हातात पांढऱ्या शुभ्र मोत्यांच्या दाण्यासारखी खिचडीची डिश घेऊन तिच्यासमोर हजर झाला.
“ मॅडम कुठे निघालात उपाशीच? मान्य आज तुमचा उपवास आहे पण खिचडी उपवासाला चालते म्हणले.घे खिचडी खा आणि हा डबा लंच ब्रेकसाठी यात कापलेले फ्रुट्स आणि खिचडी आहे आठवणीने खा!” तो तिच्या हातात डिश देत तिच्या पर्समध्ये डबा ठेवत बोलत होता आणि ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती.
“ तुम्ही इतके सगळे कधी केले? आणि आता खिचडी खात बसले तर मला ऑफिसला जायला उशीर होईल कारण बस चुकेल माझी!” ती म्हणाली.
“ तू पाहाटे उठू शकतेस. माझ्या आईच्या म्हणण्यानुसार तिच्या समाधानसाठी सगळं करू शकतेस. माझे सगळे कुलाचार पार पाडू शकतेस मग मी तुझ्यासाठी इतकं ही करू शकत नाही का? माझ्यासाठी तर खरी देवी तूच आहेस आणि आज नवरात्रीचा पहिला दिवस मग माझी देवी उपाशी राहणार का दिवसभर? खा खिचडी निवांत बसून मी तुला ऑफिसला सोडेन आज आणि मग ऑफिसला जाईन आणि हो संध्याकाळी तुला स्वयंपाकाला सुट्टी मी करेन आमच्यसाठी भाताची खिचडी आणि तुझ्यासाठी साबुदाणा खिचडी पण ती मात्र त्यांच्याकडे भरल्या डोळ्यांनी पाहत होती. अगं पाहतेस काय अशी खा की खिचडी कशी झाली आहे? ते तरी सांग.” तो हसून म्हणाला आणि ती ही मनापासून हसली.

आपण देवीची पूजा करतो पण घरातल्या स्त्रीची देखील किंमत करायला शिकले पाहिजे. त्यासाठी घरातल्या स्त्रीला मखरात बसवायची गरज नाही थोडा तिच्या मनाचा विचार करून वागले आणि तिची काळजी घेतली तरी ती प्रसन्न होते बरं का!

Scroll to Top