S R Dalvi (I) Foundation

केवळ खरा शिष्यच गुरुच्या ज्ञानाचा लाभार्थी

Only the true disciple is the beneficiary of the Guru's knowledge

घेणारा उत्सुक असेल तर देणाऱ्यालाही स्फुर्ती येते. यासाठी दोघांचे ऐक्य हे गरजेचे आहे. तरच हा ज्ञानसोहळा समृद्ध होतो. ज्याच्या त्याच्या पात्रतेनुसार, ज्ञान ग्रहण करण्याच्या क्षमतेनुसार ही प्रक्रिया सुरू असते. येथे आरक्षण नाही. येथे वशीला नाही. श्रीमंती पाहिली जात नाही. येथे फक्त गुणाला महत्त्व आहे.

डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, क्रिकेटरचा मुलगा क्रिकेटर, शिक्षकाचा मुलगा शिक्षक, संपादकाचा मुलगा संपादक होतोच असे नाही. याचा अर्थ हाताची पाच बोटे जशी सारखी नसतात. तशा व्यक्तीही सारख्या नसतात. दोन व्यक्ती दिसायला एकसारख्या असतील पण त्यांची कर्मे, ज्ञान ग्रहणाची क्षमता वेगवेगळी असते. प्रत्येकाची आवडनिवडही वेगळी असते. यामुळेच हा फरक दिसून येतो. वारसा हक्काने ज्ञान संपादन होत नाही. यामुळे शिक्षकाचा मुलगा त्याचा शिक्षकीपेशा पुढे चालवेलच असे नाही. पूजापाठ करणारे भटजी मात्र त्यांच्या मुलालाच त्याचा हा हक्क देतात. तो हक्क ते सोडत नाहीत. पण आज ती परिस्थितीही बदलताना पाहायला मिळत आहे.

ज्ञानदान, ज्ञान ग्रहणाचा हक्क सर्वांना आहे. कोणीही कोणत्याही प्रकारचे शिक्षण घेऊ शकतो. कोणी कशातही पारंगत होऊ शकतो. तसे भटजीसुद्धा सर्वांना होता येते. पण काही कर्मठ ज्ञानीपंडितांनी हा हक्क केवळ आमचाच आहे असा हेका धरला. यासाठी ही परंपरा राजर्षी शाहू महाराजांनी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. यातून वादही झाले. गुरू-शिष्य ही परंपरा जातीपाती, वारस, नातीगोती यावर अवलंबून नसते. गुरू-शिष्याचे नाते हे ज्ञान दानाचे, ज्ञान ग्रहनाचे नाते असते. यामध्ये या गोष्टी आड येत नाहीत.

कृष्ण आणि अर्जुन यांचेही नाते असेच दृढ होते. कृष्णाचे राधेवर खूप प्रेम होते. पण ज्ञानाचे गुह्य त्यांनी त्यांच्या पत्नीला न सांगता केवळ त्यांनी त्यांचा खरा भक्त अर्जुनालाच सांगितले. गुरू-शिष्यातील नात्याचा हा महत्त्वाचा भाग आहे. प्रेमामुळे, स्नेहामुळे, नातलगांमुळे हे ज्ञान आदानप्रदानाचे कार्य चालत नाही. या ज्ञानावर सर्वांचा हक्क आहे. आत्मज्ञान हे सर्वांना मिळवता येते. यासाठी खरा भक्त होण्याची गरज आहे. खरी सेवा करण्याची गरज आहे.

गुरूकृपेने हे ज्ञान प्राप्त होते. यामध्ये भेदभाव नाही. उच्चनीच हा भेद नाही. यामुळे सर्वजातीधर्मातील व्यक्ती वारकरी परंपरेमध्ये पाहायला मिळतात. संत गोरा कुंभार, संत सावता माळी, संत चोखामेळा, संत तुकाराम, संत एकनाथ, संत बहिणाबाई अशा विविध जाती धर्मातील व्यक्ती आत्मज्ञानी झाल्या. ही गुरू-शिष्य परंपरा आहे. गुरू ज्ञानदान करताना. त्याची जात, वारसा हे पाहत नाहीत. तर त्यांची भक्ती पाहतात.

घेणारा उत्सुक असेल तर देणाऱ्यालाही स्फुर्ती येते. यासाठी दोघांचे ऐक्य हे गरजेचे आहे. तरच हा ज्ञानसोहळा समृद्ध होतो. ज्याच्या त्याच्या पात्रतेनुसार, ज्ञान ग्रहण करण्याच्या क्षमतेनुसार ही प्रक्रिया सुरू असते. येथे आरक्षण नाही. येथे वशीला नाही. श्रीमंती पाहिली जात नाही. येथे फक्त गुणाला महत्त्व आहे. गुणानुसार पात्रता ठरते. ही पात्रता गुरू ठरवितात. तो हक्क गुरूंना आहे. आत्मज्ञानी गुरू योग्य शिष्याची निवड करतात. त्यालाच हा आत्मज्ञानाचा लाभ होतो.

Scroll to Top