S R Dalvi (I) Foundation

एक आशावाद आपल्याला ढासळू देत नाही….

Optimism never lets us down…

“आपण अनेक वेळा अपेक्षाभंगाचं परखड वास्तव स्वीकारायलाच हवं, पण आपण प्रखर, अमर्याद आशावाद सोडता कामा नये.” किती मार्मिक वाक्य आहे!

प्रत्येक व्यक्तीला या जीवनात नेहमीच त्याच्या मनासारखे, सुखासीन आयुष्य मिळत नाही. आणि आयुष्यात येणाऱ्या अनेक अडचणी तुम्ही एकाच वेळी चुटकीसरशी सोडवूही शकत नाही. पण यामुळे स्वतःला कमी लेखण्याचा वेडेपणा कोणीही करू नये. स्वतःकडे जे दृश्य अदृश्य आहे त्याचे मूल्य जाणायला हवे. धैर्य आणि आशावाद हा माणसाला कोणत्याही कठीण अशक्यप्राय प्रसंगातूनही तारून नेतो.

अचानक आकस्मिकपणे आलेल्या संकटांवर मात करावीच लागते. कधी प्रेमाचं माणूस कायमचं गमावलं म्हणून, कधी पैशाची फसवणूक झाली म्हणून, कधी प्रेमभंग, कधी घटस्फोट, कधी अचानक नोकरी-व्यवसायातलं अपयश, नैसर्गिक, मानवनिर्मित आपत्ती काहीही घडू शकतं. अशावेळी आपण खचतो. निराश, हताश होतो. विचार करण्याची प्रक्रिया खुंटते. मार्ग शोधण्याचा प्रयत्नही करावासा वाटत नाही. पण अशाच संपूर्ण हरल्याच्या त्या एका क्षणी कुठेतरी असाच क्षीण का होईना एक आशेचा किरण असतोच असतो. तो मार्ग दाखवतोच. फक्त आपली तयारी हवी..

उदाहरणार्थ एखाद्या तरुण स्त्रीचा नवरा अचानक मृत्यू पावला तर तिच्या अपरिमित दुःखातही तिची मुलं हा तिचा केवळ एक आशावाद असतात.. मग त्यांच्यासाठी ती कंबर कसून उभी राहते. अशी अनेक उदाहरणं आपल्याला दिसतात. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही केवळ जिद्दीने आणि एका आशावादावर सर्वोच्च पदावर पोहोचलेल्या अत्यंत यशस्वी अशा व्यक्ती आपल्याला माहित आहेत. उदाहरणार्थ पूर्व राष्ट्रपती आदरणीय ए.पी.जे. अब्दुल कलाम.

मान्य आहे जेव्हा आपण अडचणीत असतो, एखाद्या संकटाशी सामना करत असतो, तेव्हा पुस्तकी ज्ञान उपयोगी नाही पडत. रोज क्षणाक्षणाला दुःखाला तोंड द्यावं लागतं. कोणतीही व्यक्ती २४ तास सकारात्मक राहू शकत नाही. त्या त्या वेळेचा त्रास, मनस्ताप, चिंता, भीती, नैराश्य, अतीव दुःख हे खरंच असतं. पण विचारी व्यक्ती या दुःखांच्या क्षणांत, त्या घटनेत अडकून पडत नाही. तर “घटना घडून गेली. हा आता भूतकाळ आहे. यापेक्षा अधिक वाईट काहीच घडू शकत नाही.”, असा विचार करून पुढे चालण्याचा निर्णय घेते. हा निर्णय ती केवळ एका आशावादावरच तर घेते. हा आशावाद तिला मनाने ढासळू देत नाही.

आशावाद तुम्हांला पुन्हा नवीन ऊर्जा देतो. तुमच्याकडे काय आहे हे ओळखायला शिकवतो. तुम्हांला माणसांची खरी ओळख होते. तुम्ही या दुःखी भूतकाळाकडे एक अनुभव म्हणून पाहता. तुम्ही काय शिकलात हे तुम्हाला कळतं. आताची ही कठीण परिस्थिती तात्पुरती आहे, कायमस्वरूपी नाही. हे तुम्हांला कळून चुकतं. “रात्री नंतर दिवस उगवतोच.” अशावेळी एका दुर्दम्य आशेवर माणूस पुन्हा उभा राहतो. भविष्यकाळ नेहमीच अनोळखी असतो. मग आहे त्या कठीण परिस्थितीला शरण जाण्यापेक्षा ती परिस्थिती लवकरात लवकर स्वीकार केल्याने तुम्ही लवकर सावरता. तुम्हांला नवीन मार्ग मिळतो. फक्त नुसता आशावाद नाही तर त्याच्या जोडीला धैर्य आणि प्रयत्नांची साथ हवी..

हा आशावाद कसा कायम ठेवायचा ते पाहू.

१) आधार शोधा. अशा कठीण प्रसंगात तुमचे आप्तस्वकीय, प्रेमाचे माणूस यांचा मानसिक आधार घ्या. मनमोकळेपणाने बोला. एक चांगला सल्ला तुमच्या उपयोगी पडू शकतो..

२) भूतकाळ मागे सोडा. घडलेली घटना सतत उगाळत बसू नका. त्याच घटनेपाशी मनाने, शरीराने रेंगाळू नका.

३) पुढे चला. उद्याचा दिवस नक्की चांगलाच असणार, असा विश्वास स्वतःला द्या.

४) आत्मविश्वास ढळू देऊ नका.

५) या अनुभवातून काय शिकलात ते महत्त्वाचे आहे..

६) मी नेहमी आवर्जून सांगते ” ध्यानधारणा” अत्यंत गरजेची आहे…

७) अति चिंता, नकारात्मक विचार टाळा.

८) सकारात्मक विचारसरणीचा अंगीकार करा.

९) योग्य व्यक्तींचा सहवास खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. तुमच्या आजूबाजूला सकारात्मक मित्र-मैत्रिणी सुहृद असू द्या. नकारात्मक, निंदा करणाऱ्या, गॉसिप करणाऱ्या व्यक्तींपासून लांब रहा.

१०) जीवनाची चांगली बाजू बघायला शिका. नकारात्मकता टाळा.

११) सगळ्यात महत्त्वाचं, “लोक काय म्हणतील?” असं काही अस्तित्वातच नसतं हे लक्षात ठेवा..

तुम्हीं अत्यंत कठीण प्रसंगातून जात असलात आणि नंतरही फक्त तुम्हींच स्वतःच्या मानसिकतेला जबाबदार असता. स्वतःचे सुंदर आयुष्य एका संकटाने उध्वस्त होऊ देऊ नका. “जिंदगी इम्तिहान लेती है” आणि या परीक्षेत तुम्हांला पासच व्हायचं आहे. पुन्हा नव्याने उभारी घ्यायची आहे. पंखात बळ आणून पंख पसरून उंच भरारी घ्यायची आहे, एका दुर्दम्य आशेवर… हो ना !!….

Scroll to Top