S R Dalvi (I) Foundation

आमचं कोकण आणि कोकणातला चाकरमानी…

Our Konkan and Konkani Chakarmani...

मुंबैक मोठ्यामोठ्या फेस्टिवलंका जाता , पण गावातील जत्रा इसरना नाय तो चाकरमानी ….

चाकरमानी म्हणजे शहरात येऊन कामे करून गावाची काळजी घेणारा. कोकणातील माणसे सुंदर कोकण सोडून शहरात आली नोकरी शोधण्यासाठी, मुलांना खाऊ घालण्यासाठी, शिक्षण घेण्यासाठी. मुंबईतल्या सिमेंटच्या जंगलात हि माणसे मोठी झाली. ‘बाळ जातो दूर देशा, मन गेले वेडावून….’ या कवितेतील ओळी आपण शाळेत शिकलो आहोत पण आईचं प्रेम आणि वडिलांची सावली सोडून गेल्यावर जशी अवस्था लेकराची होते तशीच काहीशी अवस्था कोकणातील माणसाची होत असेल हे नक्की. चाकरमानी राहतो तर मुंबईत पण त्याचा जीव नेहमीच त्याच्या गावात गुंतलेला असतो. कोकणातील अनेक चाकरमान्यांनी आता परदेशही गाठलय. पण आजही गावची ओढ त्यांच्या हृदयात आहे.

चाकरमानी आणि कोकणातली लाल माती हे एकमेकांना जोडले गेलेले आहेत. हेच नातं त्यांना वर्षातून एकदा तरी जवळ आणत. आपल्या घरापासून लांब राहिलेल्या लेकराला तेवढ्याच आपुलकीनं कोंकण आजही आपलस करत आहे. गावातून सुट्टी संपवून परतीचा प्रवास करताना ‘पोहचल्यावर पत्र पाठव, सांभाळून प्रवास कर जीवाला जप बाळा’ आईचे हे मायेचे बोल विसरता येत नाहीत. आजही कित्तेक गावात जिथे नेटवर्क नाही तिथे पोस्टमनची वाट बघितली जाते. कोकणात तांदळाला खूप महत्त्व आहे. गावच्या घरी बनणाऱ्या घावणे, आंबोळ्या, भाकरी- मासे याची चव चाकरमान्याला मुंबईत काही मिळत नाही.

हल्ली मोबाईल मुळे या ऑनलाइन प्लॅटफॉर्ममध्ये गुंतलेल्या तरुणांना गावाची ओढ लागायला हवी, जेणेकरून ते अधिक आपल्या संस्कृती बद्दल जाणून घेऊ शकतील आणि आपल्या मूळ जागेशी कनेक्ट होऊ शकतील. नवीन पिढीला सुना बाळांनाहि तशीच गावची ओढ लागणे खूप महत्वाचे आहे. कोकणातल्या लाल मातीचा दर्प, रानफुलांची, फळांची दरवळ, हम्मा अशी हंबरणारी गोठ्यातली गाय, आमराईत कुहू कुहू कुंजन करणारा कोकीळ, हूप हूप करीत या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारणारे वानर, अंगणात पडणारा फुलांचा सडा, पहाटे कोंबड्याचे आरवणे, सकाळची पाखरांची किलबिल, आंब्याच्या झाडावरून टपटप पडणारे आंबटगोड आंबे, रसभरीत काजू बोंडे, काळीभोर जांभळं, करवंदे, लालभडक रतांबे (कोकम फळे), झाडावर लटकणारे फणस व त्यातील मधुर गरे. खाण्याची जणू चंगळच. रानमेव्यांची गोडी, समुद्र आणि नदीकाठची तर कधी तळी-हौदातली आंघोळ, आठवडे बाजारातल्या गमती आणि गरमागरम भज्यांचा घमघमाट. समुद्र चौपाटीवरची मौजमजा, ‘पॉटभर जेवा, मागून घेवा’ म्हणणारी आपुलकी, ‘पावन्यानूं, उद्या आमच्याकडे जेवक येवा हां’ म्हणणारा शेजारधर्म. गावातून निघताना एसटी स्टॅण्डवर पोहोचवायला येणारी हात उंचावत ‘परत कधी येतालास’ म्हणणारी भावुक हळवी मने, कोकणातला मोहिनी घालणारा निसर्ग, उंच डोंगर, हिरवी राने आणि वनराई, ताजे फडफडीत मासे, लाल तिखट झणझणीत कालवण तोंडाला पाणी सुटते. पाहुण्यांचा पाहुणचार हेच कोकणचे वैभव आहे. भजने, नाटक, गावजत्रा, दशावतार, नाट्य कला, गावजेवण, गणेशोत्सवात गावागावात भक्तिसागर जणू. हास्यवदनी सुगरणी, मायाळू माणसं, झाडाझुडपातून खळखळत वाहणारे पाण्याचे झरे खूप आहे.

शहरात राहणाऱया कोकणी चाकरमान्यांनी मुलाबाळांना कोकणची, मामाच्या गावाची, आजी-आजोबांच्या मायभूमीची ओढ लावायाला हवी . कोकणचे वैभव पाहून तुमच्या मुलांनाही आनंद होईल तेव्हा तीच म्हणतील व मित्रांना सांगतील ‘आमचं कोकण लय भारी…’

Scroll to Top