S R Dalvi (I) Foundation

‘डिजिटल’ पेरेंटिंग

Parenting in a ‘Digital’ World

आजच्या डिजिटल युगात मुलांचे योग्य संगोपन करणे ही पालकांची सर्वात मोठी जबाबदारी आहे. गेल्या 20 वर्षांत बदलत्या तंत्रज्ञानामुळे लोकांचे काम सोपे झाले आहे, पण त्याचा नकारात्मक परिणाम मानवी जीवनावरही मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. डिजिटल गॅजेट्स आणि डिजिटल उपकरणांचे व्यसन अगदी कमी वयात लहान मुलांमध्येही सुरू होते.

सध्याचे जग हे झपाट्याने बदलत असताना वाढता स्मार्ट फोन चा वापर,नवीन नवीन गॅजेट्स,सोशल मीडिया,कृत्रिम बुद्धिमत्ता इ गोष्टी लक्षात घेताना पालकांसमोर पालकत्व निभावणे हे एक आव्हान होऊन बसलेले आहे असे म्हणायला काही हरकत नाही. प्रत्यक्षात मुलांना धारेवर धरताना पालकांनीही ‘डिजिटल पालकत्त्वाविषयि सजग होण्याची गरज आहे. परदेशात सध्या पालकमंडळी ‘फोन फ्री किड्स’ पद्धतीने मुलांचे संगोपन करण्यासाठी खास प्रशिक्षकांची नेमणूक करत आहेत.

डिजिटल युग ही संकल्पना आपल्या कानांवर सतत पडत असते. गॅजेट्स आणि तंत्रज्ञानाच्या या युगात मोबाइल फोनने घरोघरी वादाचे प्रसंग उभे केल्याचे आपण पाहतो आणि ऐकतोही. विविध वयोगटातील मुलांचे पालक त्याबाबत तक्रार करताना दिसतात. ‘डिजिटल पालकत्व’ ही संकल्पना आणि त्याबाबत आपण कितपत सजग आहोत, त्यातील काही आत्मसात करण्याची, नवे शिकण्याची, मुलांसोबत बसून ते समजून घेण्याची आणि संवादातून त्यांना समजावण्याची आपली तयारी आहे का, असा विचार आपण कधी करून पाहिला आहे काय? या प्रश्नाचे उत्तर बहुतांश पालक ‘नाही’ असे देतील. म्हणूनच या डिजिटल युगात आपणही थोडे बदलण्याची गरज आहे. जरी नव्या पिढीला नवीन तंत्रज्ञान आणि प्रगती करणे आवश्यक असले तरी आपण त्याचा वापर कसा करतो यावर प्रतिकूल आणि अनुकूल या गोष्टी अवलंबून आहेत. आपले मूल नवीन तंत्रज्ञान शिकत आहे, त्यामागचे फायदे आणि तोटे काय असू शकतात हे सुध्दा लक्षात घेणे आता पालकांना गरजेचे आहे. 

मुलांच्या संगोपनात ‘फोन फ्री किड्स’ ही संकल्पना राबविण्याची वेळ खरेतर येणारच होती. याची काही कारणे आहेत. ‘टेक्नॉलॉजी कोशंट’ हा त्यातील महत्त्वाचा मुद्दा आहे. हल्ली मुले तंत्रज्ञानाबाबत कमालीची हुशार आहेत. त्याचे आकलन त्यांना पटकन होते. मोबाइल असो, त्यातील गेम्स असो किंवा डिजिटल माध्यमातील काहीही असो, त्यांना ते वापरण्याची उपजत हुशारी असते किंवा त्याच्याशी ते स्वतःला पटकन जोडतात. 

गॅजेट्स चा वापर मुलांसाठी का आवश्यक झाला आहे?

ऑनलाईन पद्धतीने कामे करण्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेले असून त्यामुळे ऑनलाईन कामे करताना मुलांपासून पालक,शिक्षक यांना वेगवेगळ्या गॅजेट्स चा वापर वाढत चालला आहे.मुलांना सुद्धा शिकण्यासाठी वेगवेगळ्या गॅजेट्स चा वापर करावा लागतो,परंतु त्याचा वापर ते योग्य पद्धतीने करतात किंवा नाही याकडे पालकांनी वेळोवेळी लक्ष देणे गरजेचे आहे. काही मुलांना वेगवेगळ्या स्मार्टफोन वरील ऑनलाईन गेम खेळण्याची सवय लागते अशा वेळी पालकांनी त्याबाबत आपल्या मुलांना योग्य तो वेळीच सल्ला दिला तर मुलांचा वेळ वाया जाणार नाही,मुलांना या गॅजेट्स चा वापर हा योग्य त्या वेळी करून द्यायला काही हरकत नाही परंतु अभ्यासात व्यत्यय येईल अशा वेळी मुलांना समजून सांगण्याची पालकांची जबाबदारी असली पाहिजे.

स्क्रीन टाइम ठरवा: 

संगोपन करताना मुलांना चुकीच्या सवयी लागू नयेत म्हणून काही गोष्टी सुरूवातीलाच ठरवल्या पाहिजेत. यामुळे पालकांनी सुरूवातीलाच मुलांची स्क्रीन टाइम ठरवणे गरजेचे आहे. कारण यावेळीच खूप कमी वयात मुलं गॅजेट्स आणि इतर डिजिटल गोष्टी वापरण्यास सुरूवात करतात. सध्या शिक्षणासाठी नवीन गॅझेट चा वापर अपरिहार्य झाल्यामुळे मुलांना ते द्यावे लागते. पण त्याचा स्क्रीन टाईम मर्यादित असणे पालकांच्या हातात आहे.त्यासाठी गॅजेट्स वापरायची वेळ निश्चित करणे आवश्यक आहे. मुलांचा अभ्यास झाल्यानंतर झोपण्यापूर्वी एक तास आधी असे काही उपाय करता येतील अभ्यासासाठी वापर झाल्यानंतर मुले पुन्हा गॅजेट वापरणार नाहीत हे पाहायला हवे.तसेच त्यांच्यावर लक्ष देणे आवश्यक असते.

आपल्याकडे कोणी पाहुणे आलेले असताना जेवण करताना ही मुले स्मार्टफोन हातात घेऊन एकीकडे जेवण आणि एकीकडे मोबाईल पाण्याची सवय मुलांना लागलेली दिसून येते.याची दक्षता घ्यायची आहे. त्यामुळे त्यांच्या अतिवापराचे संभाव्य दुष्परिणाम होऊ शकतात. मानव समाजप्रिय असल्यामुळे तो नेहमी इतर व्यक्तींच्या समाजात संपर्कात राहतो. सामाजिक दृष्ट्या सक्रिय झालेले लोक निरोगी आणि दीर्घायुषी असल्याचे अनेक संशोधनात सिद्ध झाले असले तरी, समाजात वावरताना काही जीवनमूल्य शिकवणे आवश्यक आहे. तुमच्या मुलांना ती शिकवणे आवश्यक आहे,एकमेकांसोबत संभाषण,आदर,प्रेम,प्राण्यांविषयी तसेच सभोवताली असणारा नसर्ग याची जाणीव आणि अभ्यास तसेच ओळख करून द्यावी.आपल्या काय जबाबदाऱ्या आहेत त्यासाठी आपण कसे वागले पाहिजे.योग्य आणि अयोग्य याविषयी समजावून सांगणे आवश्यक आहे.

मुलांचे वय विचारात घेऊन गॅजेट्स चा वापर व्हायला हवा :

इलेक्ट्रॉनिक गॅजेट चा वापर फायद्याचा असतो तसेच त्याचे तोटे सुद्धा असतात त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यासाठी मुलांची वय हा महत्त्वाचा घटक ठरतो मुलांचे वयानुसार त्यांना डिजिटल डिवाइस ची ओळख करून देणे आवश्यक असतो मूल शाळेत जाण्यापूर्वी त्याला ती डिवाइस देऊ नका मुलं शाळेत जाऊ लागल्यावर आणि त्याला थोडा समज आल्यावर हळू त्याला डिवाइस ची ओळख करून देणे सुद्धा सुरू करा. वेगवेगळे गॅजेट्स,डिवाइस वापराबाबत मुलांशी चर्चा करा.आपली मुले कोणत्या डिवाइस वापर करत आहेत. यावर वेळोवेळी लक्ष ठेवा आणि त्यांच्याबरोबर वेळोवेळी बोला. मुले आणि पालक संयुक्तपणे वापरता येणारे अनेक अँड्रॉइड अँप्लिकेशन आता उपलब्ध बसून मुलांबरोबर ती वापरल्यास एकमेकांमधील नाते दृढ होईल आणि मुली अशा दोघांमध्ये आवडणारे गेम्स डाऊनलोड करून ती खेळण्याचा आनंद घेता येतो.

तुमच्या मुलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी त्यांना स्वातंत्र्य द्या ठराविक काही गोष्टीमध्ये मुलांना स्वातंत्र्य दिल्यास त्यांच्या मनावर दडपण येत नाही .परंतु स्वातंत्र्य कोणल्या गोष्टी मध्ये द्यायचे हे आपण त्यांच्या वयानुसार ठरवली पाहिजे. डिजिटल जगातील धोके आणि त्यापासून सावधगिरी कशी वाढवावी यासाठी त्यांना वेळोवेळी माहिती दिली पाहिजे आणि त्यांना जागृत ठेवले पाहिजे.आपल्या मुलांशी संवाद आवश्यक आई-वडील आणि मुलं यांच्यामध्ये वेळोवेळी संवाद होणे आवश्यक आहे सध्या आपण अनेक मुले हे वेगवेगळ्या प्रकारच्या गेम्स खेळताना तासनतास मोबाईल मध्ये हरवून गेलेले दिसतात,त्यामुळे मुले आणि आई वडील यांच्यातील संवाद होत नाही. कधीकधी पालक हे नोकरीनिमित्त बाहेर जातात अशावेळी आपल्या मुलांची सोबत साधने सुद्धा आवश्यक आहे ही गोष्ट विसरू नये. तसेच आई वडील आणि मुल मुले यांच्यामध्ये खुल्या पद्धतीने संवाद होणे आणि मुलांना येणाऱ्या अडचणी सोडवणे आवश्यक आहेत.

डिजिटल जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांची लहान मुलांना किंवा मोठ्यांना माहितीही नसते. त्यामुळे ते वापरताना चूक होण्याची शक्यता तशीच राहते. मुलांना त्यांच्या चुकांबद्दल शिक्षा करण्याऐवजी किंवा त्यांना कठोरपणे फटकारण्याऐवजी, त्यांना परिस्थिती योग्यरित्या समजावून सांगा. त्यांच्याशी संवाद साधा. हाच एक मुलांचा डिजिटल टाइम सांभाळण्याचा योग्य पर्याय असू शकतो.

बदलत्या युगात ‘डिजिटल पेरेंटिंग’ ही संकल्पना समजून उमजून पालकांनी त्यानुसार स्वतः मध्ये बदल केला, मुलांना समजून घेतले, मुलांसोबत उत्तम संवाद साधला तर संभाव्य धोके टाळणे सुजाण पालकांसाठी नक्कीच शक्य होईल. 

Scroll to Top