Saikhom Meerabai Chanu
मीराबाई चानूने यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकले. देश तिचे अभिनंदन करत होता तेव्हा कदाचित मीराबाईला 2016 हे वर्ष आठवत असेल. तेव्हा ती रियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे नेतृत्व करत होती. पण ती स्पर्धा पूर्ण करू शकली नाही. तिच्या नावापुढे ‘डिड नॉट फिनिश’ असे लिहिले गेले. असा शेरा मारली गेलेली ती दुसरी खेळाडू होती. जी सराव करताना वजन सहज उचलायची तेच वजन तिला स्पर्धेत उचलणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे तिच्यावर भयंकर टीका झाली. त्यामुळे मीराबाईला निराशेने ग्रासले. पण तिने हार मानली नाही.
संपूर्ण तोल जाण्याआधी तिने स्वतःला सावरले. यात तिचे कोच, भाऊ, कुटुंबीय यांचे मोठे योगदान होते. मानसिक स्वास्थ्य सुदृढ करण्यासाठी तिने प्रोफेशनल कोचची मदत घेतली. आपला दर्जा उंचावत नेला. माळरानावर लाकडे गोळा करून डोक्यावर मोळी बांधणारी मीरा ते पदक विजेती मीराबाई चानू हा तिचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. आज त्याची प्रचिती पुन्हा एकदा सर्वांना आली आहे.
मीराबाई चानूचा प्रवास संघर्षाने भरलेला आहे. ती मणिपूरची राजधानी इम्फाळमधील नॉन्गपोक काकचिंग गावातून आली आहे. तिला वेटलिफ्टर व्हायचे होते. पण तिचे गाव अकादमीपासून 25 किलोमीटर अंतरावर होते. त्यामुळे स्वतंत्र वाहन घेऊन हा प्रवास करणे तिला शक्य नव्हते. त्यावेळी राष्ट्रीय महामार्गावरील अनेक ट्रक ड्रायव्हर्सनी तिला मदत केली. ते मीराबाईला इम्फाळपर्यंत नेत असत. त्याचे पैसे घेत नसत.
त्यांनी केलेल्या मदतीमुळेच मीराबाईला वेटलिफ्टिंगचे ट्रेनिंग घेणे शक्य झाले आणि पुढे तिने इतिहास घडवला. ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर घरी परतलेल्या मीराबाईने सुमारे 150 ट्रक ड्रायव्हर्स आणि हेल्परना घरी बोलावले. त्यांचा टी-शर्ट, मणिपुरी शाल देऊन सत्कार केला. तसेच त्यांना आग्रहाने जेवायला दिले होते. मीराबाई मणिपूरसारख्या भारताच्या अतिपूर्वेकडील राज्याचे प्रतिनिधित्व करते. दोन वेळची चूल पेटवण्यासाठी मीराबाईला जंगलातून लाकडे आणून द्यावी लागायची. जंगलात भटकताना लाकडाचे वजन उचलून तिने प्राथमिक धडे गिरवले.
2014 च्या ग्लासगोव्ह येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये मीराबाई चानूने 48 किलो वजनीगटात रौप्यपदक जिंकले होते. 2018 च्या कॉमनवेल्थ गेम्समधून चानूने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले होते. मीराबाई चानूची सर्वात मोठी कामगिरी 2017 मध्ये झाली होती. जेव्हा तिने अमेरिकेतील अनाहेम येथे झालेल्या जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.
चानूने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली पहिली चमक ग्लासगोव्ह येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये दाखवली. 2017 मध्ये चानूने अमेरिकेत झालेल्या जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये 48 किलो वजनीगटात एकूण 194 किलो (85 किलो स्नॅच आणि 109 किलो क्लिन आणि जर्क) वजन उचलून सुवर्णपदक आपल्या नावावर करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.
चानूची यशोगाथा
2014 मध्ये ग्लासगोव्ह येथील राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक
2016 मध्ये राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक
2017 मध्ये अमेरिकेतील जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक
2018 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित
2018 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित
2018 मध्ये मंगलोर येथे झालेल्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक
2018 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत पदकविजेती
एप्रिल 2021 मध्ये ताश्कंद येथे झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये जागतिक विक्रम
2020-21 टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मीराबाई चानूच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे तिची 2015 मध्ये भारतीय रेल्वेमध्ये ईशान्य भारतातील लुमडिंग डिव्हिजनमध्ये सीनियर तिकीट कलेक्टरपदी नियुक्ती करण्यात आली होती. एप्रिल 2018 पासून मीराबाई चानू पीसीपीओच्या अंतर्गत ओएसडी (खेळ) आहे.