S R Dalvi (I) Foundation

तात्या टोपेंची कहाणी – ब्रिटिश राजवटीविरुद्ध क्रांतिकारी प्रवास

The Story of Tatya Tope – Revolutionary’s Journey Against British Rule

आपल्या भारतीय इतिहासात असे असंख्य क्रांतिकारक होऊन गेले आहेत ज्यांनी भारत मातेला इंग्रजांच्या गुलामगिरीतून सोडवण्याकरता मोठ्या प्रमाणात संघर्ष केला. प्रसंगी प्राणांची आहुती दिली, हसत हसत फासावर गेले, पण प्रयत्नांमध्ये कसूर केली नाही. त्यांच्या शूर पराक्रमी धाडसी कथांनी आपल्याला आजही स्फुरण चढत असतं.

तात्या टोपे हे त्यातलेच एक महान भारतीय स्वातंत्र्य सैनीक होऊन गेलेत ज्यांनी भारताला ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून सोडवण्यासाठी स्वातंत्र्य समराच्या पहिल्या लढाईत आपली महत्वपूर्ण भूमिका बजावली.

१८५७ च्या क्रांतीत तात्या टोपेंनी केवळ आपले महत्वपूर्ण योगदान दिले असे नव्हे तर आपल्या चातुर्यपूर्ण आणि कुशल रणनितीनी ब्रिटीशांच्या नाकी नऊ आणले होते. त्या काळात स्वातंत्र्यप्राप्तीसाठी फासावर जाणे सर्वसामान्य बाब होती परंतु काही हुतात्मे असे झालेत कि त्यांच्या वीर मरणानंतर क्रांतीच्या ज्वाला अधिक भडकल्या आणि त्यातीलच एक हुतात्मा म्हणजे तात्या टोपे. या लेखात १८५७ ची क्रांती आणि तात्या टोपेंची वीरगाथा मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

पूर्ण नाव (Name) : रामचंद्र पांडुरंग येवलकर (तात्या टोपे – Tatya Tope)
जन्म (Birthday):इसविसन १८१४, येवला, जिल्हा नाशिक. महाराष्ट्र
वडील (Father Name) :पांडुरंग राव
आई  (Mother Name):रुख्माबाई
मृत्यू (Death) :१८ एप्रिल १८५९ शिवपुरी मध्यप्रदेश

भारतातील या महान पुत्राचा जन्म १८१४ साली महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील येवला या छोट्याश्या गावी रामचंद्र पांडुरंग राव यांच्या रुपात एका ब्राम्हण कुटुंबात झाला. प्रेमाने सगळे त्यांना तात्या म्हणत असत. त्यांच्या आईचं नाव रुख्मिणीबाई असे होते. त्या अत्यंत धार्मिक गृहिणी होत्या.

तात्या टोपेंचे वडील पांडुरंग त्र्यंबक भट्ट हे महान राजा पेशवा बाजीराव द्वितीय यांच्या खास लोकांमधील एक होते, पेशव्यांच्या राज्यातील सगळीच कामं ते अत्यंत जवाबदारीने पार पाडत असत.

तात्या टोपे ज्यावेळी २-३ वर्षांचे होते त्या सुमारास पेशवा बाजीराव द्वितीय यांना इंग्रजांसोबत झालेल्या युद्धात पराजयाचा सामना करावा लागला आणि आपली सत्ता आणि राज्य सोडून उत्तरप्रदेशातील कानपूर नजीक बिठूर येथे वास्तव्याला जावे लागले, त्या वेळी त्यांच्यासोबत तात्या टोपेंचे वडील देखील संपूर्ण परिवारासह बिठूर येथे जाऊन स्थायिक झाले.

सुरुवातीपासून युद्ध आणि सैन्य यात आवड असल्याने तात्या टोपे यांनी त्याचा सराव आणि अभ्यास केला. शिवाय तेथेच ते बाजीराव पेशव्यांचे  दत्तक पुत्र नानासाहेबांच्या संपर्कात आले आणि ते दोघे चांगले मित्र झाले. दोघांनीही सोबत राहून शिक्षण घेतले, पुढे तर तात्या टोपेंना नानासाहेबांचा उजवा हात म्हंटल्या जाऊ लागले.

तात्या टोपेंचे शिक्षण

भारताच्या या थोर सुपुत्राने देशातील वीरांगना राणी लक्ष्मीबाई आणि बाजीरावांचे दत्तक पुत्र नानासाहेब पेशवे यांच्यासह शिक्षा ग्रहण केली होती. तात्या टोपे सुरुवातीपासूनच फार साहसी आणि पराक्रमी होते, व युद्ध-सैन्य संबंधी कार्यांमध्ये रुची असल्याने त्यात ते पुढाकार घेत असत.

रामचंद्र पांडुरंग राव वरून असे पडले तात्या टोपे हे नाव

सुरुवातीला तात्या टोपेंनी अनेक ठिकाणी नौकरी देखील केली, परंतु पुढे जेंव्हा कोणत्याही नौकरीत त्यांचे मन रमले नाही तेंव्हा त्यांच्या वडिलांचे अत्यंत  निकटवर्तीय बाजीराव पेशवा यांनी त्यांना आपल्या येथे मुनीम म्हणून नेमले. येथे तात्यांनी आपले कार्य अत्यंत प्रामाणिक आणि कौशल्यपूर्ण पद्धतीने केले शिवाय भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या.

तात्या टोपेंची प्रतिभा आणि कर्तव्य परायणता पाहून प्रभावित झालेल्या बाजीराव पेशव्यांनी राज दरबारात तात्यांना मौल्यवान रत्नजडीत टोपी घालून त्यांचा गौरव केला. असं म्हणतात की तेंव्हापासून त्यांचे उपनाम ‘टोपे’ असे पडले.  आणि सगळे त्यांना ‘तात्या टोपे’ या नावाने ओळखू लागले.

१८५७ साली झालेल्या स्वातंत्र्य समरातील पहिल्या लढाईत तात्या टोपेंची महत्वपूर्ण भूमिका

तात्या टोपेंनी अगदी सुरुवातीपासून आपले मित्र नानासाहेब पेशव्यांच्या वडिलांसमवेत ( बाजीराव पेशवे ) इंग्रजांनी केलेला दुर्व्यवहार जवळून पाहीला अन अनुभवला होता. आपल्या मित्राचे नानासाहेबांचे हक्क इंग्रजांनी हिरावून घेतल्याने आपल्या मित्राचे दुखः देखील त्यांना माहित होते आणि त्यामुळे इंग्रजांविरुद्ध त्यांच्या मनात राग आणि संताप खदखदत होता.

१८५७ मध्ये ज्यावेळी इंग्रजांच्या जनरल लॉर्ड डलहौजी यांनी आपल्या क्रूर नीती लागू करत देशातील वेगवेगळ्या प्रांतांवर कब्जा करणे सुरु केले आणि या नितींच्या आधारे भारतीय राजांनी दत्तक घेतलेल्या उत्तराधीकाऱ्यांना मानण्यास विरोध दर्शविला आणि त्या राज्यांवर इंग्रजांनी आपले अधिकार जमविण्यास सुरुवात केली.

या दरम्यान इंग्रजांनी बाजीराव पेशव्यांच्या राज्यावर देखील हेच नियम लागू केले आणि बाजीराव पेशव्यांच्या मृत्युनंतर इंग्रजान्द्वारे पेन्शन च्या रुपात दिल्या जाणारे ८ लक्ष रुपये देणे देखील बंद केले आणि बाजीरावांनी घेतलेल्या दत्तक पुत्र नानासाहेबांना उत्तराधिकारी मानण्यास देखील विरोध केला. आणि बिठूर वर आपली सत्ता जमविण्याचा प्रयत्न केला हे पाहून नाना साहेब आणि तात्या टोपेंच्या मनात संतापाचा उद्रेक झाला आणि प्रतीशोधाच्या ज्वालेने ते दोघे पेटून उठले.

इंग्रजांना अद्दल घडवण्यासाठी त्यांनी रणनीती आखणे सुरु केले. दुसरीकडे १८५७ मध्ये ब्रिटीशांच्या क्रूर नीती विरोधात सैनिकांमध्ये सुद्धा आक्रोश पसरला होता, तात्या टोपे आणि नानासाहेबांनी या संधीचा फायदा उचलला आणि इंग्रजांविरुद्ध आपली सेना तयार केली. त्यांच्या या सैन्यात विद्रोही सेना देखील सहभागी होती, त्याचे नेतृत्व तात्या टोपेंनी केले होते. या युद्धात इंग्रजांना धूळ चारत कानपूर वर कब्जा केला. त्यानंतर नानासाहेब पेशव्यांना कानपूर चा पेशवा आणि तात्या टोपेंना सेनापती पदावर नियुक्त करण्यात आले. त्यानंतर पुन्हा एकदा इंग्रजांनी कानपुरवर सत्ता मिळविण्याकरता हल्ला केला  या युद्धात नाना साहेब पेशवे यांना पराजयाचा सामना करावा लागला व ते कानपूर सोडून आपल्या कुटुंबासमवेत नेपाळ येथे स्थायिक झाले. मात्र तात्या टोपे हे आपल्या ध्येयाप्रती एकनिष्ठ राहणारे साहसी योद्धा होते.

त्यांनी इंग्रजा विरोधात कधीही हार मानली नाही आणि त्यांच्याशी सतत संघर्ष करीत राहीले. कानपूर ला इंग्रजांच्या तावडीतून सोडवण्यासाठी तात्यांनी इंग्रजांविरोधात आपली सेना तयार केली, परंतु त्या पूर्वीच क्रूर इंग्रजांनी आपली विशाल सेना घेऊन बिठूरवरच हल्ला केला, त्यामुळे तात्या टोपेंना इंग्रजांविरोधात अपयशाचा सामना करावा लागला. परंतु तेंव्हाही ते इंग्रजांच्या हाती लागले नाहीत आणि बिठूर सोडून पळून जाण्यात यशस्वी झाले.

तात्या टोपेंनी ज्यावेळी दिली वीर योद्धा लक्ष्मीबाईना साथ

ज्या तऱ्हेने इंग्रजांनी आपल्या कुटनीतीने बाजीरावांच्या दत्तक घेतलेल्या नानासाहेबांना त्यांचा उत्तराधिकारी मानण्यास विरोध केला अगदी त्याच पद्धतीने झाशीची राणी लक्ष्मीबाईने आपले पती महाराज गंगाधरराव नेवाळकर  यांच्या मृत्युपश्चात दत्तक घेतलेल्या दामोदर राव उर्फ आनंदराव यांना देखील त्यांचा उत्तराधिकारी मानण्यास इंग्रजांनी विरोध केला व झाशीवर कब्जा करण्याचे प्रयत्न सुरु केले.

तात्या टोपेंना जेंव्हा हे समजले तेंव्हा इंग्रजांविरोधात त्यांचा प्रतिशोध अधिक तीव्र झाला आणि इंग्रजांविरुद्ध या युद्धात पूर्णतः झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना साहाय्य करण्याचे ठरविले. झाशी ला ब्रिटीशांच्या ताब्यात जाण्यापासून वाचविण्यात आपली महत्वपूर्ण भूमिका बजावली. तात्या टोपे आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई हे बालपणापासून एकमेकांना ओळखत होते.

१८५७ ला जेंव्हा इंग्रजांनी झाशी वर हल्ला केला तेंव्हा तात्या टोपे आणि झाशी ची राणी लक्ष्मीबाई या दोघांनी मिळून मोठ्या शौर्याने इंग्रजांशी युद्ध केले. त्यानंतर इंग्रजांच्या तावडीतून लक्ष्मीबाईंना वाचवण्यासाठी तात्या टोपे त्यांना कालपी येथे घेऊन आले. याठिकाणी दोघांनीही इंग्रजांविरुद्ध रणनीती आखली, त्यात यशस्वी होण्यासाठी तात्यांनी लक्ष्मीबाईंना ग्वालियर येथील किल्ल्यावर आपला अधिकार स्थापित करण्यास सांगितले.

याकरता तात्या टोपेंनी अगोदरच ग्वालियर च्या सैन्याला आपल्या बाजूने केले होते आणि ग्वालियर चे महाराज जयाजी राव सिंधिया यांच्याशी हातमिळवणी  केली व आपल्या मजबूत सैन्या सोबत पुन्हा एकदा इंग्रजांविरोधात युद्ध पुकारले आणि ग्वालियर किल्ल्यावर कब्जा मिळविला.

त्यानंतर ग्वालियर चे राज्य त्यांनी पेशव्यांच्या सुपूर्द केले. तात्या टोपेंच्या या धाडसी निर्णयामुळे इंग्रज सरकार स्वतःला अपमानित समजू लागले व तात्या टोपेंना बंदिस्त करण्यासाठी आपला विद्रोह अधिक तीव्र केला.

काही दिवसांनंतर इंग्रजांनी आपले मनसुबे पूर्ण करण्याकरता जून १८५८ मध्ये ग्वालियर वर पुन्हा आक्रमण केले. या हल्ल्यात राणी लक्ष्मीबाई खूप जखमी झाल्या आणि वीरगतीला प्राप्त झाल्या. अजूनही तात्या टोपेना पकडण्यात इंग्रजांना यश आले नव्हते.

दुसरीकडे कधीही हार न मानणाऱ्या आणि आपल्या दृढसंकल्पावर ठाम राहणाऱ्या तात्या टोपेंनी ग्वालियर येथे मिळालेल्या अपयशानंतर अनेक लहान मोठ्या शासकांना सोबत घेऊन इंग्रजांविरुद्ध आपला संघर्ष सुरूच ठेवला. एकूण त्यांनी इंग्रजांच्या नाकी नऊ आणले होते. एका ठिकाणी अपयश आल्यास तात्या टोपे ठिकाण बदलून पुन्हा रणनीती आखून नव्या पराक्रमाने नव्या सैन्यासमवेत इंग्रजांविरुद्ध युद्ध करीत राहिले. अखेरपर्यंत ते इंग्रजांच्या हाती लागले नाही.

तात्या टोपेंचा मृत्यू

अश्या पद्धतीने तात्या टोपेंनी आपल्या प्रखर बुद्धीच्या आणि चतुर नीतीच्या जोरावर इंग्रजांपासून स्वतःला वाचवले व इंग्रजांना स्वतःतल्या पराक्रमाची चांगलीच जाणीव करून दिली होती. अश्यात तात्या टोपेंना पकडणे हे इंग्रजांपुढे  चांगलेच आव्हान होऊन बसले होते.

तात्या टोपेंच्या मृत्यूसंबंधी इतिहासकारांची वेगवेगळी मते आहेत. काहींच्या मते तात्या टोपेंना ब्रिटीश सरकारने फाशी दिली तर काही इतिहासकारांच्या मते त्यांना फाशी देण्यात आली नाही.

असं म्हणतात ज्या सुमारास तात्या पाडौन च्या जंगलांमध्ये आराम करीत होते त्यावेळी नरवर चे शासक मानसिंह  यांनी त्यांच्यासमवेत दगा केला आणि त्यांना इंग्रजांच्या ताब्यात दिले. त्यानंतर ब्रिटिश शासनाने तात्या टोपे विरुद्ध खटला चालविला आणि १८ एप्रिल १८५९ ला त्यांना फाशी दिली.

तात्या टोपेंच्या मृत्यू संबंधी अन्य मत :

इंग्रजांच्या नाकी नऊ आणणाऱ्या तात्या टोपेंच्या मृत्यूसंबंधी इतिहासकारांचे आणखीन एक मत असे आहे कि तात्या टोपे आयुष्याच्या अखेर पर्यंत इंग्रजांच्या हाती लागले नाही आणि अखेरचा श्वास त्यांनी १९०९ ला गुजरात येथे घेतला.

तात्या टोपेंविषयी काही विशेष तथ्य – Facts About Tatya Tope

भारताच्या या पराक्रमी शुरविराने आपल्या संपूर्ण जीवनात इंग्रजांविरुद्ध जवळजवळ १५० युद्ध संपूर्ण साहसाने आणि पराक्रमाने लढलीत ज्यात त्यांनी जवळपास १० हजार सैनिकांना संपविले.

इंग्रजांना अक्षरशः हैराण करून सोडणाऱ्या तात्या टोपेंनी इंग्रजांशी अनेक युद्ध केलीत, १८५७ मध्ये त्यांनी इंग्रजांच्या तावडीत असलेल्या कानपूरला जिंकले. परंतु त्यानंतर इंग्रजांनी पुन्हा कानपुरवर ताबा मिळविला होता.

 तात्या टोपेंना प्राप्त सन्मान

तात्या टोपेंच्या सन्मानार्थ भारत सरकारने त्यांच्या नावाने टपाल तिकीट प्रकाशित केले होते. कानपूर आणि शिवपुरी येथे तात्या टोपेंचे स्मारक बनविण्यात आले आहे. स्वातंत्र्य समरातील पहिल्या लढाईत त्यांच्या त्याग आणि बलिदानाला स्मरणात ठेवत मध्यप्रदेशात तात्या टोपे मेमोरियल पार्क बनविण्यात आलाय. येथे तात्या टोपेंची मूर्ती बनविण्यात आली आहे.

तात्या टोपे संपूर्ण आयुष्य मातृभूमीच्या रक्षणार्थ लढत राहिले. आणि आपल्या बालीदानाकरता सदैव तत्पर होते. कित्येकदा आलेल्या अपयशानंतर सुद्धा इंग्रजांच्या हाती लागले नाही, आणि त्यांच्याशी पराक्रमाने युद्ध करत राहिले.

तात्या टोपेंनी इंग्रजांना हैराण करून सोडले होते आणि त्यांच्यासमवेत तब्बल १५० युद्ध केलीत. भारत सरकारने त्यांच्या स्मृतीत एक टपाल तिकीट सुद्धा काढले. भारताच्या स्वातंत्र्या करता १८५७ ला करण्यात आलेल्या युद्धाचा जेंव्हाही उल्लेख होईल तात्या टोपेंच्या पराक्रमाचे स्मरण होईल.

Scroll to Top