S R Dalvi (I) Foundation

बाप लेकाचा अनोखा खटला !!

The unique case of father and Son!!

आपल्या मुलाबद्दल तक्रार करता यावी म्हणून एक वृद्ध माणूस न्यायालयात दाखल झाला. न्यायाधीशांनी विचारले की तुमची काय तक्रार आहे.
वृद्ध वडील म्हणाले, मला माझ्या मुलाकडून त्याच्या परिस्थितीनुसार महिन्याचा खर्च हवा आहे. न्यायाधीश म्हणाले की, हा तुमचा अधिकार आहे. यामध्ये सुनावणीची गरज नाही. तुमचा सांभाळ तुमच्या मुलाने केलाच पाहिजे. ते त्यांचं कर्तव्यच आहे. वडील म्हणाले की मी खूप श्रीमंत आहे. माझ्याकडे पैशांची कमतरता नाही. पण तरीही मला माझ्या मुलाकडून दर महिन्याचा खर्च घ्यायचा आहे.

न्यायाधीश आश्चर्यचकित झाले,ते त्या वृद्ध वडीलांना म्हणाले “जर तुम्ही इतके श्रीमंत आहात तर तुम्हाला तुमच्या मुलाच्या पैशांची काय गरज आहे ?”
यावर त्या वृद्ध वडीलांनी आपल्या मुलाचे नाव आणि पत्ता सांगितला. वडील न्यायाधीशांना म्हणाले, माझ्या मुलाला कोर्टात बोलावलं तर तुम्हाला सगळं नीट कळेल.

न्यायाधीश त्या मुलाला कोर्टात बोलावून घेतात आणि सांगतात की, तुमच्या वडीलांना दर महिन्याला तुमच्याकडून खर्च हवा आहे,मग तो कितीही असो, तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला तो द्यावा लागेल.
न्यायाधीशांचं बोलणे ऐकून मुलगा गोंधळून जातो आणि म्हणतो, माझे वडील तर खूप श्रीमंत आहेत, त्यांच्याकडे पैशांची कमतरता नाही मग त्यांना माझ्या पैशांची काय गरज आहे ?

न्यायाधीश म्हणतात, ही तुमच्या वडीलांची मागणी आहे आणि त्यांचा हक्क पण आहे.
मग वडील म्हणतात, न्यायाधीश महोदय, तुम्ही माझ्या मुलाला सांगा की, त्याने मला दरमहा फक्त १०० रुपये द्यावे, परंतु अट अशी आहे की त्याने स्वतःच्या हाताने मला पैसे आणून द्यावेत आणि ते पैसे देण्यास कोणताही विलंब होता कामा नये.
न्यायाधीश म्हणतात, ठीक आहे, तुमच्या मनासारखं होईल. मग न्यायाधीश त्या मुलाला सांगतात की, तुम्ही दर महिन्याला १०० रुपये तुमच्या वडिलांना विलंब न करता हातात आणून देत जावे आणि हा कोर्टाचा आदेश आहे, त्याचे तुम्ही पालन कराल ही अपेक्षा !
खटला संपल्यावर न्यायाधीश त्या वृद्ध वडिलांना आपल्याकडे बोलवतात. तुमची काही हरकत नसेल तर मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे. तुम्ही इतके श्रीमंत असताना तुमच्या मुलावर हा खटला का दाखल केला आणि मुलाकडून फारच तुटपुंजी किंमत का मागितली ? असे का ??
आता मात्र त्या वृद्ध वडीलांचे डोळे पाणावले. न्यायाधीश साहेब,मला माझ्या मुलाचा चेहरा पाहण्याची खूप इच्छा होती, तो त्याच्या कामात इतका व्यस्त आहे की, मला त्याला भेटून बरेच दिवस झाले आणि समोर बसून तर सोडाच पण मोबाईलवर ही कधी आम्ही बोललो मला खरच् काही आठवत नाही.
माझे माझ्या मुलावर खूप प्रेम आहे.म्हणूनच मी त्याच्यावर हा खटला दाखल केला, जेणेकरुन दर महिन्याला तो माझ्यासमोर येईल, त्याला पाहून माझ्या मनाला आनंद होईल.

वृद्ध वडीलांचे म्हणणे ऐकून न्यायाधीशांच्या डोळ्यात अश्रू आले. न्यायाधीश म्हणाले, तुम्ही जर हे मला आधी सांगितले असते तर वडीलांना दुर्लक्षित केल्याचा आणि सांभाळ न केल्याच्या गुन्ह्याची शिक्षा मी तुमच्या मुलाला सुनावली असती.
यावर ते वृद्ध वडील हसतमुखाने न्यायाधीशांकडे बघतात आणि म्हणतात, माझ्या मुलाला शिक्षा झाली आणि ते ही माझ्यामुळे या सारखे वाईट काय ! कारण माझा त्याच्यावर खूप जीव आहे आणि माझ्यामुळे त्याला शिक्षा किंवा त्रास झालेलं मला कधीच सहन होणार नाही.
हे सर्व तो मुलगा लांबून ऐकत असतो. आता मात्र त्याच्याही डोळ्यातील अश्रूंचा बांध फुटतो. तो धावत येतो आणि वडीलांना मिठी मारतो. बस्स ! अजून काय हवं असतं म्हातारपणी आईवडीलांना….

Scroll to Top