S R Dalvi (I) Foundation

पोस्ट ऑफिसच्या या 8 बचत योजना बँकेपेक्षा जास्त व्याज देतात..

These 8 post office savings schemes offer higher interest rates than banks…

169 वर्षांचा इतिहास असलेली भारतीय टपाल सेवा फक्त पत्र पाठवण्यापुरती मर्यादीत नाही. पोस्ट ऑफिसतर्फे अनेक बचत योजना देखील राबवल्या जातात. पोस्टातल्या बहुतांश बचत योजना बँकांद्वारे दिल्या जाणाऱ्या व्याजापेक्षा जास्त व्याज देतात.

पोस्ट ऑफिसच्या बचत योजना तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात, विशेषतः जर तुम्ही महिला किंवा ज्येष्ठ नागरिक असाल.

राष्ट्रीय बचत मुदत ठेव योजना

राष्ट्रीय बचत मुदत ठेव योजना ही बँकांमधील मुदत ठेव योजनेसारखीच आहे. ही योजना बँकांमध्ये ‘फिक्स डिपॉझिट’ आणि पोस्ट ऑफिसमध्ये ‘टाईम डिपॉझिट’ म्हणून ओळखली जाते.

तुम्ही या योजनेत किमान एक वर्ष ते पाच वर्षांच्या कालावधीसाठी पैसे गुंतवू शकता. किमान एक वर्षासाठी 6.9% व्याज आणि 5 वर्षांच्या कमाल मुदत ठेवीसाठी 7.5% व्याज मिळतं. व्याजदर मोजणी दर तीन महिन्यांनी होते आणि वर्षाच्या शेवटी पोस्टाच्या बचत खात्यात ते जमा केले जाते.

जर तुम्ही राष्ट्रीय बचत मुदत ठेव योजनेत 5 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतची कर सवलत देखील मिळू शकते. तुम्ही या योजनेत 1 लाख रुपये गुंतवले तर 5 वर्षांनंतर तुमच्या हातात 1,37,500 रुपये असतील.

ज्या लोकांना त्यांचे पैसे मुदत ठेवींमध्ये गुंतवायचे आहेत त्यांच्यासाठी राष्ट्रीय बचत मुदत ठेव योजना अतिशय उपयुक्त आहे, कारण बँका या योजनेच्या तुलनेत कमी व्याज देतात.

राष्ट्रीय बचत मासिक उत्पन्न योजना

राष्ट्रीय बचत मासिक उत्पन्न खाते ही बचत योजना मासिक व्याज देते.

एखाद्या व्यक्तीला या योजनेत जास्तीत जास्त 9 लाखांची गुंतवणूक करता येते ज्यावर 7.4% व्याज देण्यात येते. संयुक्त खाते असल्यास तुम्ही 15 लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकता. या योजनेचा कालावधी 5 वर्षांचा आहे.

तुम्हाला या योजनेतून लवकर बाहेर पडायचे असेल तर तुम्हाला पहिल्या वर्षामध्ये पैसे काढता येत नाहीत. तुम्ही एक वर्षानंतर किंवा तीन वर्षापूर्वी खाते बंद केल्यास, तुमच्या गुंतवणुकीतील 2% कपात केली जाईल.

जर तुम्ही तीन वर्षांनी बाहेर पडण्याचा विचार करत असाल तर 1% कपात केली जाईल. शेवटी, या योजनेत तुम्हाला मिळालेल्या व्याजाच्या तुलनेत गुंतवणुकीतून वजा केलेली रक्कम कमी असेल.

जर तुम्ही या योजनेत 1 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 5 वर्षांत एकूण 37,000 रुपये व्याज मिळेल.

म्हणजेच, या योजनेची जास्तीत जास्त गुंतवणूक 15 लाख रुपये असल्यास, तुम्हाला व्याज म्हणून शेवटी 5,55,000 रुपये मिळतील. ही योजना करमुक्त नाही.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना

60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ही बचत योजना आहे. निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना 55 वर्षांनंतर आणि निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांना 50 वर्षांनंतर या योजनेचा लाभ घेता येतो.पोस्टाच्या बचत योजनांमध्ये या योजनेवर सर्वाधिक व्याजदर आहे. या योजनेचा व्याजदर 8.2% आहे. या योजनेत कमीत कमी 1000 रूपये आणि जास्तीत जास्त 30 लाख रूपये गुंतवता येतात. बचत खात्यात दर तीन महिन्यांनी एकदा व्याज जमा केले जाते.

5 वर्षांच्या कार्यकाळासह, तुम्ही पहिल्या वर्षात योजनेतून बाहेर पडल्यास कोणतेही व्याज दिले जाणार नाही. मागील तिमाहीचे व्याज जर बचत खात्यात जमा केले गेले असेल तर गुंतवणुकीच्या रकमेतून ते वजा केले जाईल.

जर तुम्हाला एक वर्षानंतर किंवा 2 वर्षापूर्वी पैसे काढायचे असतील तर गुंतवणुकीच्या रकमेपैकी 1.5% कपात केली जाईल. त्यानंतर खाते बंद केल्यावर 1% वजावट आकारली जाईल.

महिला सन्मान बचत योजना (महिला सन्मान पत्र)

महिलांना बचत करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी पोस्ट ऑफिसची ही एक विशेष योजना आहे. या योजनेचा कालावधी दोन वर्षांचा आहे आणि दर वर्षी 7.5% व्याज देण्यात येते.

पोस्ट ऑफिस आणि बँकांद्वारे उपलब्ध इतर योजनांच्या तुलनेत, ही योजना अल्प-मुदतीच्या बचतीसाठी जास्त व्याज देते. तुम्ही किमान रूपये 1000 ते 2,00,000 लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्ही 1 लाख रुपये गुंतवले तर दोन वर्षांच्या शेवटी तुमच्या हातात 1,16,022 रुपये असतील.
म्हणजेच, जर तुम्ही जास्तीत जास्त 2 लाख रूपये गुंतवले तर दोन वर्षांच्या शेवटी 2,32,000 रूपये हाती येतील. ही योजना करमुक्त नाही.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते

समृद्ध भविष्य सुनिश्चित करण्यासाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही सर्वोत्तम बचत योजना आहे.

सध्या ही योजना वार्षिक 7.1% दराने व्याज देते. इतर योजनांमध्ये तुम्हाला संपूर्ण मुदतीच्या कालावधीसाठी एकसमान व्याज दिले जाते, तर या योजनेच्या संदर्भात वित्त मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयानुसार व्याज दर प्रत्येक तिमाहीत बदलू शकतो. या योजनेचा कालावधी 15 वर्षांचा आहे आणि प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 500 रूपये ते जास्तीत जास्त 1,50,000 रूपयांपर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते. ही गुंतवणूक तुमच्या सोयीनुसार एकत्रितपणे किंवा हफ्त्याहफ्त्याने केली जाऊ शकते.

तुम्ही कोणत्याही आर्थिक वर्षात 500 रुपयांची किमान गुंतवणूक न केल्यास तुमचे खाते निलंबित केले जाईल. नंतर, गुंतवणूकीची रक्कम आणि एका वर्षासाठी 50 रुपये दंड भरून खाते पुन्हा सक्रिय केले जाऊ शकते. ही योजना आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत सूट मिळण्यासही पात्र आहे. त्याचप्रमाणे मिळणाऱ्या व्याजावर कोणताही कर भरावा लागत नाही.

ही योजना देखील एक चक्रवाढ योजना असल्याने, जर तुम्ही दरवर्षी एक लाखाची गुंतवणूक केली तर 21 वर्षांनंतर तुमच्या हातात 44,89,690 रुपये असतील. यामध्ये, तुमची गुंतवणूक रक्कम फक्त 15 लाख आहे कारण तुम्ही फक्त 15 वर्षांसाठी रक्कम भरत आहात. शेवटी, तुम्हाला 29,89,690 रुपये व्याज मिळेल. म्हणजे तुम्हाला गुंतवणुकीच्या जवळपास दुप्पट रक्कम व्याज म्हणून मिळते. तुम्हाला जर मुलगी असेल तर तिच्या भविष्यातील कल्याणासाठी या योजनेत गुंतवणूक करता येऊ शकते.

जर तुम्ही ही योजना 15 वर्षे चालू ठेवू शकत नसाल तर 5 वर्षानंतर तुम्ही आतापर्यंत केलेल्या गुंतवणुकीच्या 50% रक्कम घेऊ शकता. एक जास्तीचा फायदा म्हणजे एक वर्ष उलटून गेल्यानंतरही तुम्हाला गुंतवणुकीतून कर्ज मिळू शकते. आर्थिक वर्षातून एकदाच कर्ज दिले जात असल्याने कर्जाची परतफेड केल्याशिवाय पुढील कर्ज दिले जाणार नाही.

36 महिन्यांत कर्जाची परतफेड केल्यास केवळ 1% वार्षिक व्याज आकारले जाते. डिफॉल्टच्या बाबतीत वार्षिक 6% व्याज आकारले जाईल. ही योजना दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी अतिशय फायदेशीर आहे कारण व्याज चक्रवाढ पद्धतीने मोजले जाते.

उदाहरणार्थ, जर तुम्ही वर्षाला 1 लाख रुपये गुंतवले तर 15 वर्षांनंतर तुमच्या हातात 27,12,139 रूपये असतील. म्हणजे तुम्हाला 12,12,139 रुपये फक्त व्याज म्हणून मिळतील. गुंतवणूक आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत करमुक्तीसाठी पात्र आहे आणि तुम्ही कमावलेल्या व्याजावर तुम्हाला कर भरण्याची गरज नाही, हे या योजनेचे अतिरिक्त फायदे आहेत.

सुकन्या समृद्धी योजना

मुलींसाठी ही विशेष योजना आहे.या योजनेत सामील होण्यासाठी तुमच्या मुलीचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असायला हवे. दरवर्षी किमान 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1,50,000 रूपये या योजनेत गुंतवता येतात.

ही योजना सध्या 8% व्याज देते. केंद्रीय वित्त मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयानुसार प्रत्येक तिमाहीत त्यात बदल होऊ शकतो. 21 वर्षांच्या कार्यकाळासह, तुम्हाला या योजनेत फक्त 15 वर्षे गुंतवणूक करावी लागेल. योजनेची मुदत पूर्ण झाल्यानंतर 21 वर्षांसाठीचे व्याज दिले जाईल. खातेधारकाचा मृत्यू झाल्यास किंवा जीवघेण्या आजाराने ग्रस्त असल्यास हे खाते अकाली बंद करण्याची परवानगी आहे.

किसान विकास पत्र

लोकांमध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. तुमची गुंतवणूक दुप्पट करण्याच्या दृष्टीने ही सर्वोत्तम योजना आहे. या योजनेचा कालावधी 115 महिन्यांचा म्हणजेच 9 वर्षे 7 महिने आहे. किमान गुंतवणूक रूपये 1000 असून याला कमाल मर्यादा नाही. 7.5% चक्रवाढ व्याज देणार्‍या या योजनेत एकापेक्षा जास्त खाती उघडता येतात. जर तुम्ही या योजनेत 1 लाख रूपये गुंतवलेत तर स्कीम मॅच्युरिटीच्या वेळी तुमच्या हातात 2 लाख रूपये असतील. जर तुम्ही 10 लाखांची गुंतवणूक केली तर तुमच्या हातात 20 लाख रूपये असतील.

ज्यांना दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी ही एक अतिशय योग्य योजना आहे कारण ही एक अशी योजना आहे जी सुरक्षित पद्धतीने गुंतवणूक दुप्पट करू शकते. परंतु, केलेल्या गुंतवणुकीवर किंवा शेवटी मिळालेल्या व्याजावर कर सवलत मिळत नाही. तुम्हाला जर 115 महिन्यांपूर्वी पैसे काढायचे असतील तर तुम्ही अडीच वर्षांनी खाते बंद करू शकता. त्यापूर्वी, खातेधारकाच्या मृत्यूशिवाय खाते बंद करण्याची परवानगी नाही.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र

हा 5 वर्षांच्या कालावधीचा सर्वसमावेशक कार्यक्रम आहे. या योजनेत कमीत कमी 1000 रूपये गुंतवणे आवश्यक असून गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा नाही.

ही योजना 7.7% चक्रवाढ व्याज देते आणि पाच वर्षांच्या शेवटी एकरकमी व्याज दिले जाते. या योजनेतील व्याजदरात कोणताही बदल होत नाही. खातेदाराचा मृत्यू झाला किंवा संयुक्त खाते असलेल्या जोडप्याचा घटस्फोट झाला तरच या योजनेतून मुदतपूर्व बाहेर पडता येते.

उदाहरणार्थ, जर तुम्ही या योजनेत 1 लाख रुपये गुंतवले तर पाच वर्षांच्या शेवटी तुमच्या हातात 1,44,903 रुपये असतील. याचा अर्थ, तुमची गुंतवणूक रक्कम 40% पेक्षा जास्त वाढलेली असेल. या योजनेत केलेल्या गुंतवणुकीला आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत सवलत आहे.

Scroll to Top