S R Dalvi (I) Foundation

शिल्पकला आणि स्थापत्य ह्या दोन्ही गोष्टींनी विनटलेले कोणार्कचे हे सूर्यमंदिर

This Sun Temple of Konark is enthralled by both sculpture and architecture

२४ महाकाय रथचक्रे, दगडात कोरलेली, पण अश्या कौशल्याने की वाटावे लाकडातून कोरलेली ही खरीखुरी रथचक्रे आहेत. या चाकांना जोडणारी आख आणि त्यावर बसवलेली कानखीळही तशीच, अगदी खऱ्या रथाच्या चाकांसारखी. तो २४ चाकांचा महाकाय रथ बघताना आपण स्थळकाळाचे भान हरपून जातो. वाटतं, आता कोणत्याही क्षणी सारथी चाबूक उगारेल आणि रथाला जुंपलेले सात विराट अश्व क्षणात विजेच्या वेगाने दौडू लागतील. त्या घोड्यांची नावे तरी कशी सुंदर आणि अर्थपूर्ण, गायत्री, वृहति, उष्णिक, जगती, त्रिष्टुप, अनुष्टुप आणि पंक्ति, संस्कृत काव्यछंदांची नावे. त्या सात घोड्यांचे लगाम हाती धरलेला सारथी तो अरुण आणि त्या अलौकिक रथाचा स्वामी म्हणजे साक्षात सूर्यदेव!

सहस्ररश्मी भगवान सूर्यदेव आपल्या सात अश्वांच्या रथात बसून उदयास्ताच्या दिवसभराच्या प्रवासाला निघाले आहेत ह्या पौराणिक कथेला दिलेले सुरेख मूर्तस्वरूप म्हणजे ओडिशा मधले कोणार्क येथिल प्रसिद्ध सूर्यमंदिर. हे मंदिर मी जेव्हा प्रथम बघितले तेव्हा मी कितितरी वेळ अक्षरशः अवाक् होऊन उभी होते. कोणार्कच्या सूर्यमंदिराचे कितीही फोटो बघितलेले असले तरी जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात ती विराट रथचक्रे आणि त्यावर विसावलेला तो महाकाय रथरुपी सभामंडप पाहता तेव्हा कितीही अरसिक असलात तरी तुमच्या अंगावर रोमांच उभे राहिल्याशिवाय राहात नाहीत. कोणार्कचे हे मंदिर म्हणजे दगडात रचलेली एक पवित्र सूर्यऋचा आहे.

कोणार्कच्या ह्या सूर्यमंदिराच्या स्थळमहात्म्याविषयी अनेक कथा प्रसिद्ध आहेत. श्रीकृष्णपुत्र सांब कुष्ठरोगाने ग्रस्त झाला होता. श्रीकृष्णाने त्याला सूर्यदेवाची उपासना करायला सांगितली. कुष्ठरोगातून मुक्त होण्यासाठी सांबाने ओडिशा राज्यात येऊन चंद्रभागा नदीच्या तीरावर सूर्योपासना केली. सांबाला नदीपात्रात सूर्यमूर्ती सापडली आणि त्याने चंद्रभागा नदी समुद्राला मिळते त्या पवित्र ठिकाणी प्रथम सूर्यमंदिर उभारले अशी इथल्या भाविकांची धारणा आहे. आज चंद्रभागा नदी सुकून गेली आहे. समुद्रही मंदिरापासून तीन किमी मागे गेलेला आहे. आज कोणार्कमध्ये जे मंदिर उभे आहे ती वास्तू तेराव्या शतकात बांधली गेली आहे. गंगवंशीय राजा पहिला नरसिंहदेव आणि त्याची पत्नी सीतादेवी ह्यांनी हे सूर्यमंदिर उभारले.

पहिला नरसिंहदेव हा अत्यंत शूर आणि कर्तबगार राजा होता. त्याने पार पूर्व बंगालपर्यंत मुसंडी मारून मामलुक सुलतान तुघरील तुघन खान ह्याचा पराभव केला, व इतर अनेक शत्रूंवर विजय मिळवून कलिंगाचे राज्य संघटित केले. ह्या विजयाचे प्रतीक म्हणून त्याने कोणार्कचे सूर्यमंदिर बांधायला घेतले व आपला आपला कीर्तिस्तंभ तिथे उभा केला. तो अरुणस्तंभ सध्या जवळच्याच जगन्नाथ पुरी येथे श्री जगन्नाथ मंदिरासमोर आहे. यवनांवर निर्णायक विजय मिळवला म्हणून राजा नरसिंह देवाने यवनवाणीबल्लव आणि अमीरमानमर्दन अश्या दोन उपाधी धारण केल्या. थेट शत्रूच्या प्रदेशात सैन्यासह मुसंडी मारून कटासीनच्या किल्ल्यात झालेल्या युद्धात राजा नरसिंह देवाने इस्लामी मामलुक सल्तनतीवर निर्णायक विजय मिळविला. त्या विजयाचे प्रतीक म्हणजे कोणार्कचे हे भव्य सूर्यमंदिर. दुर्दैवाने एका हिंदू राजाने आपल्यापेक्षा कितीतरी बलाढ्य अश्या इस्लामी राज्यावर हल्ला करून, शत्रूच्या प्रदेशात घुसून मिळवलेल्या ह्या देदीप्यमान विजयाची गोष्ट आपल्या इतिहासाच्या पुस्तकात मात्र कधीही आपल्याला कुणीही सांगितलेली नाही. आपण घोकल्या त्या केवळ मुघल वंशावळ्या!

कोणार्कच्या ह्या सूर्यमंदिराच्या निर्मितीसाठी १२,००० स्थपती आणि शिल्पी बारा वर्षे खपत होते आणि ह्या मंदिराच्या उभारणीसाठी राजा नरसिंहदेवाने आपले बारा वर्षांचे उत्पन्न खर्च केले असे अकबर कालीन इतिहास ग्रंथ ऐन-ए-अकबरीमध्ये नमूद केलेले आहे.
कोणार्कच्या सूर्यमंदिरासाठी वालुकाश्म व क्लोराइट शिस्ट अश्या दोन प्रकारचा दगड वापरला आहे. मला ओडिशा मधल्या एका शिल्पकाराने त्या दगडांची फूल खाडिया आणि मुग्नी अशी स्थानिक नावे सांगितली होती. वालुकाश्म हा दगड खडबडीत पण टणक असतो तर क्लोराइट शिस्ट खाणीतून काढल्यावर मऊ असतो पण पुढे ऊन वारा पाऊस पिऊन टणक होत जातो. नवीन दगड मऊ असल्यामुळे स्थपती आणि शिल्पकारांना अतिशय बारीक, नाजूक कोरीव काम करणे सोपे होते. कोणार्कची रथचक्रे बघताना त्यावरचे शिल्पांकन अगदी दागिन्यांच्या तोडीचे वाटते ते ह्या दगडामुळे. कोणार्कच्या मंदिराच्या बांधणीत वास्तुकला व शिल्पकला ह्यांचा इतका सुंदर संगम झालेला आहे की वास्तूचे सौष्ठव आणि प्रमाणबद्धता बघणाऱ्याला जास्त भुरळ घालते की मंदिरावरचे कोरीव काम हे सांगता येत नाही.

सध्या अस्तित्वात असलेला सूर्यरथाच्या स्वरूपातला सभामंडप, ज्याला कलिंग स्थापत्याच्या भाषेत ’जगमोहन’ हे नाव आहे, त्याचीच उंची जवळजवळ ४० मीटर आहे. त्याच्या पाठीमागे असलेल्या गर्भगृह आणि मुख्य शिखर ह्यांनी मिळून बनलेल्या रेखादेवळाची उंची त्याच्या जवळजवळ दुपट्ट असली पाहिजे असे पुरातत्व शास्त्रज्ञांचे मत आहे. जगमोहनाच्या पुढे त्याच्या अर्ध्या उंचीचा नटमंडप आहे. चढत्या भाजणीने वाढत जाणारी मंदिराच्या विविध भागांची उंची भाविकांची नजर आपसूकच रेखा मंदिराच्या कळसाकडे नेते. ही ऊर्ध्वगामी दृष्टिरेषा हे नागर मंदिरांच्या स्थापत्यशैलीचे खास वैशिष्ट्य आहे.

कलिंग स्थापत्याप्रमाणे मंदिराच्या वास्तूचे तीन भाग असतात, गर्भगृह म्हणजे रेखा देऊळ, ज्याचे शिखर उंच आणि निमुळते असते व वर गोलाकार आमलक असतो. रेखा देवळाच्या पुढे असतो तो मुख्य सभामंडप, ज्याला त्याच्या पिरॅमिड सारख्या शिखरामुळे पिढा देऊळ असे नाव आहे. यालाच भद्र देऊळ किंवा जगमोहन असेही म्हणतात. रेखादेऊळ उंच आणि निमुळते असते तर पिढा देऊळ बुटके आणि पसरट असते. दोन्ही वास्तूंची उंची आणि आकार ह्यामध्ये एक सुंदर समन्वय असतो ज्यामुळे दर्शनाला आलेल्या भाविकांना भव्यतेची, दिव्यतेची अनुभूती येते. जगमोहनाच्याही पुढे नटमंडप किंवा नृत्यमंडप असतो, जो आकाराने सगळ्यात लहान असतो. ह्या तिन्ही वास्तूंची प्रमाणबद्धता कोणार्क मध्ये इतकी सुरेख जमून आलेली आहे की आजच्या भग्नावस्थेत देखील मंदिर पाहून आपण पूर्णपणे भारावून जातो, आणि मनात विचार येतोच की पूर्णावस्थेतले रेखा देऊळ, त्यातली सूर्यनारायणाची मूर्ती, त्याला जोडून असणारे त्याच्या रथाच्या स्वरूपातले भव्य भद्रदेऊळ व त्यापुढील नृत्यमंडप या सर्व वास्तू त्यांच्या वैभवाच्या परमशिखरावर असताना किती देखण्या दिसत असतील!

कोणार्कच्या ह्या सूर्यमंदिराची खासियत म्हणजे इथले भद्र देऊळ किंवा जगमोहन. कोणार्कच्या रथचक्रांचे फोटो आपण सर्वांनीच पाहिले असतील. पण एकेकट्या रथचक्राचे फोटो बघणे आणि प्रत्यक्ष अतिभव्य आकाराच्या रथाप्रमाणे रचलेले ते संपूर्ण वास्तूस्थापत्य अनुभवणे ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट असे म्हणतात खरे पण कोणार्कचा हा भव्य सूर्यरथ प्रत्यक्षात इतका भव्य आहे की कुठलीही प्रतिमा त्यापुढे फिकीच वाटेल. मुळात दगडाचे विशाल सूर्यमंदिर रथाच्या आकारात कल्पून ते प्रत्यक्षात आणणे ही कल्पनाच किती उदात्त आहे!

एका उंच, प्रशस्त जगतीवर म्हणजे जोत्यावर हा विराट मंदिररूपी रथ उभा आहे. जगतीच्या चारी भिंतींवर मिळून बारा चक्रांच्या जोड्या कोरलेल्या आहेत ज्या वर्षांच्या बारा महिन्यांचे प्रतीक आहेत. १२ फूट व्यासाच्या प्रत्येक चक्राला आठ बारीक व आठ जाड आऱ्या कोरलेल्या आहेत. ह्या आठ आठ आरी म्हणजे दिवसाचे आणि रात्रीचे प्रत्येकी आठ प्रहर आहेत. सूर्यदेवाच्या रथाला जोडलेले सात अश्व म्हणजे सप्ताहाच्या सात दिवसांचे प्रतीक आहे. बरे शिल्पकाराचे आणि स्थपतीचे कौशल्य केवळ इथेच संपत नाही, मंदिराच्या काही चक्रे म्हणजे वेळ दाखवणारी सौरघड्याळे आहेत. सूर्याचे किरण आऱ्याच्या मध्यावर पडून त्याची सावली वेळेनुसार प्रत्येक आऱ्यावर येते. प्रत्येक आरीवर बारीक पट्टी आहे, त्यावर वेळेनुसार त्या काळची आदर्श दिनचर्या कशी होती ते दाखवले आहे. म्हणजे दुपारपर्यंत कामे, मग थोडी वामकुक्षी, त्यानंतर मनोरंजन, सायंकाळची कामे, आणि रात्री झोप इत्यादीचे बारकाईने शिल्पांकन केले आहे. हे सर्व समजून घ्यायचे असेल तर आपल्याला कोणार्कमध्ये चांगला प्रशिक्षित गाईड घेणे फार आवश्यक आहे, कारण ह्या मंदिरात शिल्पांची इतकी लयलूट आहे आणि त्यामागचा कार्यकारणभाव इतका गहन आहे की गाईड नसला तर नव्वद टक्के बारकावे आपल्यला उमजणारच नाहीत.

असे म्हणतात की राजा नरसिंहदेवाच्या काळात जेव्हा सूर्य मंदिर बनवले तेव्हा त्यावर २० टन वजनाचा प्रचंड लोहचुंबक होता. पण जवळच समुद्र असल्यामुळे खलाशांच्या सागरी मार्गक्रमणात होकायंत्राला अडथळा होऊ लागल्याने तो चुंबकच काढून टाकला गेला. त्यावेळी मंदिराला झालेली इजा व पुढे सोळाव्या शतकात काला पहाड नावाच्या क्रूरकर्मा इस्लामी सरदाराने ओडिशा स्वारीत ह्या मंदिराचा केलेला विध्वंस ह्यामुळे मंदिराचा बराच भाग कोसळला होता. मंदिर भग्न झाल्यावर लोकांनी तिथे जाणे बंद केले व कोणार्कचे मंदिर हळूहळू वाळूने भरू लागले. रेती अर्धवट गाडले गेलेले हे मंदिर नंतर १८९३ मध्ये ब्रिटिश पुरातत्व शास्त्रज्ञांनी उकरून काढले. पुढे भारतीय पुरात त्वविभागाने ह्या प्राचीन वास्तूवरील वाळूचे प्रचंड आवरण दूर करण्याचे काम १९०१ पासून हाती घेतले. आज जे मंदिर आपल्याला दिसते ते भग्नावस्थेत आहेत. मंदिराचा गाभारा उध्वस्त झालेला आहे. बाहेरच्या देवकोष्ठातील काही सूर्यमूर्ती जागोजागी

वास्तूसंग्रहालयात गेलेल्या आहेत तर काही गायब झालेल्या आहेत. मुख्य गाभाऱ्यातली सूर्यमूर्ती कोठे आहे ते कोणालाच माहिती नाही. जगमोहनाची नाजूक परिस्थिती पाहता तसेच इतर लहानमोठे भाग उद्ध्वस्त झालेले आहेत ब्रिटिशांनी आत वाळू भरून वास्तू पूर्णपणे सील केली आणि बाहेर टेकूसाठी लोखंडी पिंजरा उभारलेला आहे. एकूण वास्तूच्या सौंदर्याशी तो पिंजरा अत्यंत विसंगत आणि कुरूप दिसतो, पण करणार काय?
शिल्पकला आणि स्थापत्य ह्या दोन्ही गोष्टींनी विनटलेले कोणार्कचे हे सूर्यमंदिर एकाच वेळी अभिमान आणि विषाद अश्या परस्परविरोधी भावना दाटून येतात. प्रत्येक भारतीयाने पाहिलेच पाहिजे असे हे मंदिर आहे.

Scroll to Top