S R Dalvi (I) Foundation

व्हॉएजर : गूढ उकलणाऱ्या मोहिमेचा थक्क करणारा 40 वर्षांचा प्रवास

Voyager: The astonishing 40-year journey of a mystery-solving mission

सूर्यमालेच्या आपल्या ज्ञानात भर घालणाऱ्या व्हॉएजर मिशनला 40 वर्षं पूर्ण होत आहेत. कॅलिफोर्नियातील ‘नासा’च्या लॅबमध्ये जाऊन बीबीसीच्या पत्रकारानं घेतलेला हा भविष्यवेध.

कॅलिफॉर्नियातील पॅसेडिनामध्ये जेट प्रपोल्शन लॅबोरॅटरीत ‘नासा’च्या व्होएजर मिशनसाठी नियंत्रण कक्ष आहे. या इथे रोजच इतिहास घडतो आहे.

मानवी इतिहासातील सर्वांत महत्त्वाकांक्षी आणि धाडसी मोहीम म्हणून व्होएजरचे नाव घेतलं जातं.

गेल्या 40 वर्षांत दोन व्होएजर अवकाश यानांनी गुरू, शनी, युरेनस आणि नेपच्युन या ग्रहांचा वेध घेतला आहे. या यानानं विश्वाचे विविध फोटो घेतले आहेत.

व्होएजर मोहिमेची वैशिष्ट्यं

या मोहिमेने पृथ्वीबद्दलचा आपला दृष्टिकोन तर बदललाच शिवाय आता मानवी संस्कृती पृथ्वीपल्याड नेली आहे.

वैशिष्ट्य म्हणजे व्होएजर अजून ही कार्यरत आहे. जेव्हा व्होएजर 1 त्याच्या नियंत्रण कक्षात सिग्नल पाठवतो, तेव्हा तो पृथ्वीपासून सर्वात दूरवर गेलेल्या मानवनिर्मित यंत्रापासून आलेला असतो.

व्होएजर -1 हे अवकाश यान 2013 साली सूर्यमालेतून बाहेर पडले. 18 ऑगस्ट 2017 हे यान पृथ्वीपासून 20 अब्ज किलोमीटर अंतरावर होते. तर व्होएजर-2 पृथ्वीपासून 17 अब्ज किमोमीटर अंतरावर होते.

नासाचं जगभरात स्पेस नेटवर्क आहे. हे नेटवर्क म्हणजे जगभरात पसरलेली सॅटेलाईट डिश आहेत. अवकाशातील दूर अंतरावरील यानांतून मिळणारे सिग्नल घेण्यासाठी, त्यांची रचना करण्यात आली आहे.

स्टोन यांचं वय 80 आहे. अवकाश संशोधनातील दिग्गज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. व्होएजरच्या उभारणीपासून ते कार्यरत आहेत. ‘मी जे काही करू शकलो त्याच्या पायाशी व्होएजर आहे. विश्वात जे काही आहे, त्याबद्दल नवा दृष्टिकोन या मोहिमेनं दिला.

व्होएजर मिशनमधील अजून एक दिग्गज संशोधक म्हणजे दिवंगत कार्ल सॅगन होय. 1970 च्या दशकात सॅगन नामवंत अॅस्ट्रोफिजिस्ट आणि खगोलशास्त्रज्ञ होते. मंगळावर यशस्वीरित्या पोहचलेली पहिली मोहीम विकिंगवरही त्यांनी काम केलं आहे. व्होएजरच्या दोन्ही यानांवर सोनेरी प्लेट बसवण्यात आल्या आहेत. त्यावर त्यांनी काम केले होतं.

‘व्होएजर’वर आहे सोनेरी संगीत!

या सोनेरी प्लेटमुळे हे मिशन कलात्मक बनले. या सोनेरी प्लेट तांब्यापासून बनल्या असून त्यांचं आयूष्य 1 अब्ज वर्षांचे आहे. पृथ्वीवरून परग्रहवासीयांसाठीचा संदेश या सोनेरी रेकॉर्डवर आहे. यात भाषण, संगीत, आवाज आणि फोटो आहेत.

गोल्डन रेकॉर्ड प्रोजेक्टवर काम करणारे कलाकार जोन लोर्बंग म्हणाले, पृथ्वी कशी आहे, त्यावर जीव कसे कसे आहेत, ही रेकॉर्ड बनवणारे कोण आहेत, यांची छोटी माहिती यात आहे. ही प्लेट बनवताना एक अट होती. ती म्हणजे हा संदेश नासा किंवा अमेरिकेबद्दल न ठेवता तो पृथ्वीचा हवा.

रेकॉर्डमधील कंटेट बनवण्यासाठी नासाने फक्त 6 आठवड्यांचा वेळ दिला होता.

या रेकॉर्डवर बाक, बेथोव्हन, मोझार्ट यांचं संगीत आहे. जागतिक संगीताचं प्रतिनिधित्व करण्याचा प्रामाणिक प्रयत्न यात झाला होता. झैरे येथील मुलींचं गाणं, अझरबैझान येथील बॅगपाईप्स यांचाही यात समावेश आहे. बहुतेक जागतिक संगीतांचं पहिलं संकलन हेच असावं.

‘व्हॉएजरच्या पूर्वी ज्ञात ज्वालामुखी फक्त पृथ्वीवरच होते. गुरूच्या चंद्रावर पृथ्वीपेक्षा 10 पट जास्त ज्वालामुखी हालचाली आहेत. हे व्होएजरमुळे समजलं.’

व्होएजरने लावलेले शोध

व्होएजरने शनी भोवतालची नवी कडी, शनीचा आणखी एका उपग्रह शोधला. शनीचा उपग्रह टायटनवरील पेट्रोकेमिकलचे वातावरण आणि मिथेनचा पाऊस व्होएजरने शोधला. व्होएजरने ईन्सेलॅडस या उपग्रहाचे क्लोजप फोटोही पाठवले. युनायटेड किंगडमच्या आकाराचा हा उपग्रह बर्फात लपेटलेला आहे. सूर्यमालेतील सर्वात चमकदार वस्तू म्हणून या उपग्रहाची ओळख आहे.

प्लॅनेटरी सोसायटीच्या संपादक इमली लुकडवॉल म्हणतात, ‘यातील प्रत्येक उपग्रह महत्त्वाचा आहे. शनीच्या उपग्रहांचा अभ्यास करण्यासाठी शनीवर काय पाठवायला हवं, हे आपल्याला व्होएजरने शिकवलं.’

1980 ला व्होएजर-1 ने शनीला मागे सोडत सूर्यमालेचा प्रवास सुरू केला. 9 महिन्यानंतर व्होएजर-2 ने आऊटर प्लॅनेटसचा प्रवास सुरू केला. व्होएजर-2 1986 ला युरेनसनजीक पोहचला. युरेनसच्या कड्याचा आणि युरेनसचा फोटो पाठवलाच, शिवाय नवे उपग्रहही शोधले.

1989 ला हे यान सूर्यमालेतील शेवटच्या मुक्कामी म्हणजे नेपच्युनच्यानजीक पोहचले. तेथून व्होएजरने तेथून नेपच्युनच्या उपग्रहांचे फोटो पाठवले.

स्टोन म्हणाले, ‘आमच्यासाठी धक्कादायक होतं ते म्हणजे नेपच्युनचा उपग्रह ट्रिटॉनवरील नायट्रोजनचे उद्रेक होणारे झरे.’

व्हॉएजरच्या वारश्यावर नंतरच्या अनेक अवकाश मोहीम आखल्या गेल्या.

मानवी इतिहासातील काहीच मोहीम अशा आहेत, की ज्यांनी इतके शास्त्रीय यश मिळवलं आहे. व्होएजरच्या तंत्रज्ञानाच्या वारशाबद्दलही कृतज्ञता मानावी लागेल.

स्टोन म्हणाले, व्होएजर पहिलेच कंप्युटर नियंत्रित अवकाश यान होतं. ते अजूनही कार्यरत आहे.’

व्हॉएजरमधील तंत्रज्ञान आपण सध्या दैनंदिन जीवनात ही वापरत आहोत. स्टोन म्हणाले, ‘अवकाशातून येणारे सिग्नल फारच कमकुवत असतात. त्यावर उपाय म्हणून आम्ही कोडिंग पद्धती विकसित केली. मोबाइल, सीडी यांच तंत्रावर चालतात. फक्त फरक इतकाच आहे की हे तंत्रज्ञान अवकाशात पाठवण्यासाठी वापरतो.’ आज फोटोंवर प्रक्रिया करणारे जे तंत्रज्ञान मोबाईलमध्ये वापरले जाते, ते व्होएजरसाठी विकसित करण्यात आले होते.

पण व्हॉएजरसाठी सर्वात मोठी घटना होती, ती म्हणजे 14 फेब्रुरवारी 1990 ची. या दिवशी व्होएजर-2 ने पूर्ण सूर्यमालेचे फोटो टिपले. या फोटोत पृथ्वी एखाद्या बिंदू सारखी दिसते. या विश्वात आपले स्थान काय आहे, हे दाखवणारे हे फोटो होते.’

2013 ला व्हॉएजर-1 ने सूर्याच्या मॅग्नेटिक फिल्डचा प्रभाव असलेली जागा आणि तारे यांच्यातील सीमा ओलांडली.

व्हॉएजर-1 आताही माहिती संकलित करत आहे. येत्या काही वर्षात व्हॉएजर-2 सूर्यमाला ओलांडणार आहे.

ग्रहांच्या भोवती सूर्यामुळे फुगा (सोलर बबल) निर्माण झालेला असतो. व्हॉएजर-2 कडून मिळणारी माहिती सोलर बबलला समजून घेण्यास उपयुक्त ठरणार आहे.

व्होएजरकडे मर्यादित वेळ

पण आता व्होएजरकडे वेळ फारच कमी आहे. ही अवकाश यानं अण्विक बॅटरीवर चालतात. यातील प्लुटोनियमच्या विघटनातून निर्माण होणाऱ्या उष्णतेवर वीज निर्माण केली जाते.

व्होएजरच्या प्रोग्रॅम मॅनेजर सुझी डोड म्हणाल्या, या यानांना जास्ती जास्त काळ उडत ठेवणे हा मुख्य उद्देश आहे.

या यानांतील काही सिस्टम बंद करण्यात आल्या आहेत. सध्या यातील कॅमेरे वापरले जात नाहीत. ही यानं कुठे आहेत, हा डेटा देणारी यंत्रणा फक्त सुरू ठेवण्यात आली आहे. या यानांतील यंत्रणा गोठून जाऊ नये, म्हणून हीटर सुरू ठेवण्यात आले आहेत.

पण येत्या 10 वर्षांत व्होएजर 1 आणि 2 बंद करावे लागणार आहेत. ‘नासा आणि संपूर्ण मानवासाठी तो दुःखाची दिवस असेल. एक दिवस असा असेल की आपण व्होएजरकडून सिग्नल पाहत असू आणि ते यायचे बंद होतील,’ अशी प्रतिक्रिया डोड यांनी दिली.

एक प्रकारे व्हॉएजर मिशन न संपणारं आहे.

‘मला वाटतं भविष्यात कोणाला तरी हे यान सापडेल, तो यावरील रेकॉर्ड वाजवून पाहतील,’ असे डोड म्हणाल्या.

व्होएजर अवकाश गंगेतील आपला दूत असतील, अशी प्रतिक्रिया स्टोन यांनी दिली.

खरंच व्होएजरने मानवतेला अमर केले आहे.

Scroll to Top