What and how does the teacher’s communication affect the children?
नुकतीच एक बातमी वाचली की एका महिलेने तिच्या शिक्षिकेला असे ट्विट केले होते की मी दहावीत असताना ” तू कधी काहीच करू शकणार नाहीस ” हे तुमचे वाक्य मी चुकीचे ठरवले आहे. तिने शिक्षिकेला सांगितले की तिने तिची 12वी बोर्ड परीक्षा चांगल्या गुणांसह उत्तीर्ण केली आहे तिला तिच्या माझ्या आवडत्या कॉलेज मध्ये ऍडमिशन पण मिळाले आहे. ज्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची गरज आहे त्यांच्याशी दयाळूपणे वागण्याची त्या शिक्षिकेला आठवण करून दिली. हा प्रसंग अतिशय भयानक आहे. मुलांना घडवणारे शिक्षक या प्रमाणेही वागू शकतात का? शिक्षकांनी मुलांशी या प्रकारे संवाद साधने अत्यंत चुकीचे आहे.
एक दुर्दैवी बाब आवर्जून मांडावीशी वाटते. मुलांच्या घडणीइतकाच मुलांच्या खच्चीकरणातही शिक्षकांचा मोठाच वाटा असतो! आपल्या शालेय जीवनातील काही घटनांचे स्वतः जरी स्मरण केले तरी जाणवेल की, नकोशा वाटणाऱ्या अनेक प्रसंगांचे ओरखडे आजही कायम आहेत. शिक्षकांनी वर्मी घातलेले घाव विदयार्थ्यांच्या जीवनाला वेगळे वळण लावणारे ठरतात. हे शिक्षक जो विषय शिकवितात, त्या विषयांबद्दल नावड उत्पन्न होणे, अनेकदा शाळेतही जाऊ नये असे वाटण्याइतका मनःस्ताप मुलांना होतो.
संपूर्ण वर्गासमोर झालेल्या अपमानामुळे मूल खूप खचते. शाळेच्या कुठल्याच कार्यक्रमामध्ये भाग न घेण्याइतके निराश होते. वर्गातल्या मुलांकडून त्याची थट्टा उडविली जाते. शिक्षकांकडून अगदी सहज म्हणून केलेल्या कॉमेंट्स किंवा भर वर्गासमोर केलेल्या टीकेचे परिणाम मुलांच्या मनावर चांगलेच कोरले जातात. ते प्रसंग पुन:पुन्हा आठवले जातात. कधी शिक्षकांच्या ती बाब स्मरणातही नसते. कधी त्या विद्यार्थ्यांने तसा अर्थ करून घेतलेला असतो. परंतु, अनेकदा मुले सुधारावीत, जिद्दीने त्यांनी वर येण्याचे आव्हान स्वीकारावे, म्हणून मी मुद्दामच तसे बोललो, असे म्हणणारेही शिक्षक असतात. त्यामुळे क्वचित अपेक्षित परिणाम साध्य होतही असतील; परंतु विद्यार्थ्यांच्या आत्मसन्मानाच्या म्हणजेच मुलांनी स्वत:चा आदर करण्याच्या अत्यंत आवश्यक अशा प्रक्रियेत पालकांनंतर शिक्षकांचे योगदान मोठे असते, याची अधिक जाणीव शिक्षकांना होणे गरजेचे आहे. आपल्या साध्या बोलण्याकडे, आपल्या स्वत:च्याही वर्तणुकीकडे शिक्षकांनी अधिक डोळसपणे बघणे निश्चितपणे आवश्यक असते.
विद्यार्थ्यांना इतर जण कसे वागवतात, यापेक्षा त्याला स्वतःला, स्वतःबद्दल कसे वाटते, ते जाणणे आणि त्यावर काम करणे, हे शिक्षकांनी महत्त्वाचे मानायला हवे. आपण कोणीतरी वेगळे आहोत, सर्वांपेक्षा माझ्यात काही विशेष गुण आहेत, हे मुलांना जाणवून देण्यामुळे मुलांच्या इतर क्षेत्रातल्या कामगिरीवर मोठाच परिणाम होतो. याच बरोबरीने मुले अहंकारी होत नाहीत ना, वागणे बोलणे, उद्दामपणाचे होत नाही ना, या सीमारेषा सांभाळणेही तितकेच आवश्यक असते.
स्पेलिंगमध्ये चुका करू नका, अशा सूचना शंभर वेळा करण्यापेक्षा प्रत्येक स्पेलिंग नीट लिहा, अक्षर घाणेरडे, गिचमिड नको, असे म्हणण्यापेक्षा सुंदर ओळींमध्ये निबंध लिहा, आकृत्या स्वच्छ काढा, मोत्यासारखे अक्षर काढा या शब्दांचा वापर मुलांच्या मनावर अधिक ठसतो. नेमक्या शब्दांचा वापर केला तर हवी ती प्रगती, कमीत कमी वेळात विद्यार्थ्यांमध्ये घडवून आणणे शक्य आहे. शब्द उच्चारल्याबरोबर ती प्रतिमा ऐकणाऱ्याच्या डोळ्यांसमोर निर्माण होते. म्हणून जो परिणाम हवा त्याचेच केवळ नेमके चित्र उभे राहील, असे शब्द शिक्षकांनी सजगपणे निवडणे अत्यंत गरजेचे असते. नकारात्मक शब्दांमधून नेमके उलटे संकेत मुलांवर ठसतात.परीक्षेत अपयश आले म्हणजे मी जीवनात अपयशी ठरलो, हे समीकरण नव्हे. हा समज त्या नाजूक क्षणी विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविला जाणे अतिशय महत्त्वाचे असते. शिक्षकांनी मुलांना समजून घेणे, उमेद देणे खूप गरजेचे आहे. आयुष्यात चढ-उतार येतात; त्याचाच हा एक भाग असतो. हा संदेश पूर्ण वर्गासमोर दिला गेल्यास इतर मुलांकडून चिडविले जाणे टाळू शकते. तसेच, सर्वच मुलांची स्वतःच्या अपयशाकडे बघण्याची एक वेगळी मानसिकता तयार करता येते. “या परीक्षेची, भाषणाची जबाबदारी तू घे. तुला मदत लागली तर मी आहेच.’ असे सकारात्मक संवाद वापरावेत.
मुलांना त्यांच्या कृतीची, निर्णयांची जबाबदारी स्वतः घेण्यास प्रवृत्त करावे. अगदी पहिल्या इयत्तेपासून, मुलेही या उपायाला उत्तम प्रतिसाद देतात. ‘पालक, शिक्षक मुलांच्या कृतीची जबाबदारी स्वतःवर घेतात. त्यामुळे मुले अधिकाधिक बेफिकीर होतात.
आपल्या शाळेच्या दहावीचा रिझल्ट १०० टक्के लागावा यासाठी अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांना कसे प्रवृत्त करावे/ कसेकरू नये यासाठीचे उदाहरण असे देता येईल, तुमच्यामुळे शाळेच्या रिझल्टचा अगदी निक्काल लागेल म्हणून आतातरी अभ्यास करा, असे सर्व वर्गासमोर कच्च्या मुलांना सांगितले गेल्यास- लागेना का शाळेचा निकाल काहीही- आम्हाला काय त्याचे? ही भावना वाढीला लागू शकेल. यापेक्षा तुम्ही चांगल्या मार्कांनी पास झाल्यास, आम्हाला प्रत्येकाला तुमचा अभिमान वाटेल आणि शाळेचा रिझल्ट १०० टक्के लागण्यामध्ये तुमचा केवढा मोठा वाटा असेल. तुम्ही हरप्रकारे, आता कामाला लागा. वर्गातील हुशार मुलांकडून मार्गदर्शन घ्या. शिवाय आम्ही सर्व शिक्षक तुमच्या मदतीला आहोतच. तुमच्यातला प्रत्येक जण आपल्या स्वतःच्या प्रगतीला जबाबदार आहे. त्यासाठी आत्ता काय करता येईल, यावर लक्ष केंद्रित करूया. अशा प्रकारच्या संवादांनी तसेच रिझल्टनंतरचे सुंदर चित्र आताच प्रभावीपणे उभे करण्यामुळे, मुले स्वतःच अधिक अभ्यास करण्यास प्रेरित होतील. त्यांची ही स्वयंप्रेरणा खूप मोलाची आहे.
अपयशांनी, नैराश्यांनी खचलेल्या विद्यार्थ्यांना त्याच्या आत्तापर्यंतच्या सर्व छोट्या-मोठ्या याची आव्हाने, स्वीकारलेल्या क्षणांची यादी करायला सांगावे. यामध्ये पहिलीत चित्रकलेत मिळालेले बक्षीस, नाटकात काम करण्याची संधी, सोसायटीच्या गणेशोत्सवामध्ये मिळालेले प्रशस्तीपत्रक यासारख्या सर्व यशाची नोंद करायला सांगावी. पूर्वी आपण यश मिळविले आहे, तेव्हा आत्ताही मिळवू शकू, ही उमेद वाढण्यास यामुळे नक्कीच मदत होते. दोष, टीका करणे हे व्यक्तिगत असावे. सर्व वर्गासमोर मुलांच्या उणिवा काढण्यापेक्षा त्या मुलाला वर्गापूर्वी किंवा नंतर वेगळे बोलावून सुधारणा घडवून आणण्याबाबत सांगणे अधिक परिणामकारक ठरते. कोणच्याही वयाच्या मुलाला आदराने वागविल्यास त्या मुलाची आत्म-आदराची भावना जोपासली जाते. अन्यथा सर्वांसमोर केलेला उपहास, निर्भत्र्सना मुलांच्या मनावर विपरीत परिणाम करून जातात, याचे भान शिक्षकांनी ठेवणे अत्यंत मोलाचे आहे. मुलांचे खच्चीकरण करण्यापेक्षा त्याची उमेद वाढविणे हा सकारात्मक उपाय आहे.