S R Dalvi (I) Foundation

NDRF काय आहे? वाचा, आपत्तींच्या वेळी नेहमी NDRF ला पाचारण का केलं जातं

What is NDRF? Read, Why disasters are always called to NDRF

NDRF अर्थात राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाला हे नाव आपण प्रत्येक मोठ्या आपत्कालीन परिस्थितीच्या वेळी ऐकतो. महाराष्ट्रातील तिवरे धरणफुटी, मुंब्रा इमारत दुर्घटना, सावित्री पूल दुर्घटना, माळीण भूस्खलन यांसारख्या आपत्तींमध्येही NDRFने आपल्या कामाचा प्रत्यय दिला आहे.

दोन वर्षांपूर्वी ऑगस्टमध्ये कोल्हापूर, सांगली, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरात लोकांना वाचवण्यासाठी NDRFला पाचारण करण्यात आलं होतं.

त्यामुळे कुठल्याही नैसर्गिक आपत्तीत सर्वांत आधी NDRFच्या पथकाला पाचारण करण्यात येतं. त्यांनी आतापर्यंत हजारो लोकांचे प्राण वाचवले आहेत.

मात्र अशा अनेक अचानक ओढवणाऱ्या प्रसंगांसाठी NDRF नेहमी कसं तत्पर असतं? ते यासाठी तयारी कशी करतात?

आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005

देशातील आपत्तींना तोंड देण्यासाठी भारत सरकारने 2005 साली आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला. भारतात सर्वच ठिकाणी हा कायदा लागू आहे. एखाद्या नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी होणारी हानी टाळण्यासाठी पथक स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले.

त्याअंतर्गत 2006 मध्ये NDRFची स्थापना करण्यात आली. याचं कामकाज गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येतं. कोणतीही दुर्घटना घडल्यानंतर तातडीने बचावकार्य करण्याची जबाबदारी NDRFकडे असते.

NDRFची संरचना

हे पथक राष्ट्रीय, राज्य, जिल्हा तसेच स्थानिक पातळीवर तयार करण्यात यावेत, असे सरकारचे निर्देश आहेत.

स्थापनेच्या वेळी NDRFचे देशभरात आठ बटालियन होते. सध्या बटालियनची संख्या वाढवून ती 12 करण्यात आली आहे. प्रत्येक बटालियनमध्ये सुमारे 1,149 अधिकारी आणि जवान कार्यरत असतात.

आणि प्रत्येक बटालियनमध्ये काही ठराविक तुकड्या असतात. प्रत्येक तुकडीत 45 जवान असतात, ज्यात अभियंता, इलेक्ट्रिशियन, तंत्रज्ञ, डॉग स्क्वाड आणि आरोग्यसेवेसाठी विशेषरीत्या प्रशिक्षित जवान असतात.

महाराष्ट्रात 18 तुकड्या

महाराष्ट्र आणि गोवा ही राज्यं पाचव्या बटालियनच्या कार्यक्षेत्रात येतात. पाचव्या बटालियनमध्ये एकूण 18 तुकड्या आहेत – तीन तुकड्या मुंबईत कार्यरत आहेत, पुण्यातील मुख्यालयात 14 तुकड्या तैनात असतात तर नागपूरमध्ये एक तुकडी नेहमी सज्ज असते.

सध्या सत्यनारायण प्रधान हे NDRFचे महासंचालक आहेत तर महाराष्ट्र NDRFचे प्रमुख हे अनुपम श्रीवास्तव आहेत.

निवड आणि प्रशिक्षण

आता प्रत्येक आपत्तीत लोकांचे जीव वाचवण्याचं काम किती प्रेरणादायी वाटतं ना? मग NDRFमध्ये कसं जाता येईल, हेही पाहा…

भारतातील केंद्रीय पोलीस सेवेतील विविध उपसंस्थांमध्ये निवड झालेल्या जवानांना प्रतिनियुक्तीच्या माध्यमातून NDRFमध्ये निवडण्यात येतं. प्रतिनियुक्तीचा कालावधी सात ते नऊ वर्षं इतका असू शकतो. BSF, CRPF, CISF, ITBP आणि SSB यांसारख्या पॅरामिलिटरी पथकांतील जवानांची यामध्ये निवड करण्यात येते. नियुक्ती केलेल्या जवानांना 19 आठवड्यांच्या प्रशिक्षणातून जावं लागतं. या प्रशिक्षणादरम्यान त्यांना आंतरराष्ट्रीय स्तराचं प्रशिक्षण दिलं जातं.

कोणकोणत्या आपत्तींशी सामना करावा लागतो?

जगभरातील विविध देशांमध्ये प्रशिक्षण आणि उपकरणं वापरण्याची पद्धत ही एकाच प्रकारची ठेवण्यात आलेली आहे, जेणेकरून जगात कुठेही काही अपघात घडला तर त्याठिकाणी जाऊन या पथकांना काम करता यावं.

प्रशिक्षणादरम्यान जवानांना आरोग्यविषयक, पूरपरिस्थिती किंवा पाण्याशी संबंधित कुठलीही आपत्ती, पर्वतांमधील लोकांच्या बचावार्थ, उंच इमारतींतील बचावकार्य, मानवी तसंच प्राण्याच्या मृतदेहांचं व्यवस्थान आणि गरज भासल्यास विल्हेवाट लावणे, रासायनिक, जैविक आण्विक आणि किरणोत्सारी आपत्तींसाठी विशेष प्रशिक्षण देण्याचं काम केलं जातं.

जनजागृती कार्यक्रम

मात्र NDRFचं काम केवळ दुर्घटनेतून लोकांना वाचवणं इतकंच नाही, तर लोकांना एखाद्या आपत्तीप्रसंगी कोणती दक्षता घ्यावी, याची माहिती देणंही आहे. यासाठी त्यांना राज्य तसंच स्थानिक आपत्ती निवारण संस्थांसोबत समन्वय राखून त्यांना प्रशिक्षण देण्यात येतं.

तसंच राष्ट्रीय सेवा योजना, स्काऊट गाईड, NCC आणि सामान्य नागरिकांनाही प्रशिक्षण दिलं जातं. यासाठी शाळा-महाविद्यालयात 15 दिवसांचे शिबीर घेण्यात येतात.

आपत्तीच्या वेळी NDRFला जाण्यास उशीर झाल्यास नागरिकांना स्वतः त्यातून मार्ग काढता यावा, यासाठी ही जनजागृती मोहीम हाती घेतली जाते. अनेक वेळेला किनारपट्टीच्या भागात जेव्हा एखादं चक्रीवादळ धडकण्याचा इशारा दिला जातो, तेव्हा या तुकड्या गावोगावी जाऊन वस्तीतील लोकांना सतर्क करतात, परिसर रिकामा करण्यात मदत करतात आणि ओढवू शकणारी हानी आधीच टाळतात.

‘आपदा सेवा सदैव’

NDRFने ‘आपदा सेवा सदैव’ हे ब्रीदवाक्य घेऊन काम करतं. देशात तसंच विदेशात आतापर्यंत अनेक बचावकार्यांमध्ये सहभाग घेतला आहे. त्यातून आतापर्यंत सुमारे 4 लाख 70 हजारांहून अधिक नागरिकांचा जीव वाचवल्याची माहिती NDRFच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.

जपान त्सुनामी 2011, नेपाळ भूकंप 2015 या आंतरराष्ट्रीय बचावकार्यामध्ये NDRFने कर्तव्य बजावलं.

देशातील जम्मू-कश्मीर, चेन्नई, केरळ, आसाम याठिकाणचे पूर तसंच महाराष्ट्रात मुंब्रा इमारत दुर्घटना, माळीण भूस्खलन, ठाणे रसायन कारखान्यातील आग, यांसारख्या घटनांमध्ये NDRFने विशेष उल्लेखनीय कार्य केलं होतं.

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बंगालच्या खाडीत आलेल्या अम्फान चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये NDRFची टीम आजही काम करत आहे.

Scroll to Top