Who is the happiest person in the world?
” दुसरों का दुख बांट लो, खुद का दुख अपने आप भूल जाओगे। ” सिंधुताई सपकाळ यांचा हा विचार, किती गहन अर्थ आहे ना या वाक्यात. या जगात सर्वात जास्त सुखी कोण असेल? प्रत्येक व्यक्तीला आपल्यापेक्षा समोरची व्यक्ती नेहमी सुखी भासते आणि इतके दुःख त्रास आपल्याच वाट्याला का आले आहे? असाही आपण विचार करत असतो.
ट्रेन मध्ये एक कंपार्टमेंट असते जे फक्त हॅंडीकॅप (अपंग) लोकांसाठी असते त्या डब्यात असणाऱ्या लोकांचे तुम्ही कधी निरीक्षण केले आहे का? किती प्रकारचे अपंगत्व असते माणसांमध्ये. शारीरिक, मानसिक अपंग माणसे आपण पाहतो.
मला बरे वाटत नसल्यामुळे गर्दीतून प्रवास करणे शक्य नव्हते म्हणून त्या दिवशी मी या डब्ब्यातून प्रवास केला. माझे अंग दुखत होते ताप आला होता आणि आजारी पडल्यामुळे माझा मूड खराब होता. अचानक एका कोपऱ्यातून भजनाचा आवाज आला मी जरासे डोकावून पाहिले तर चार अंध मुले आनंदाने भजन गात होती. एका माणसाला तर पायाच नव्हते. कोणाच्या नाकात नळी होती, कोणाला कॅन्सर मुळे प्रचंड यातना होत्या, कुणी मुके होते तर कुणी बहिरे. त्यांना त्रास होत नाही का? त्यांना यातना होत नसतील का? कुठून येते इतकी पॉसिटीव्हिटी? हे सगळे प्रवासी आपापल्या अपंगत्वावर मात करून पोटापाण्यासाठी रोज असे ट्रेन ने प्रवास करतात. हे सगळं पाहून डोळ्यात पाणी आले. इतके दुःख असताना त्यांच्या चेहऱ्यावर हसू होते, मनात बरे होण्याची आशा होती. आयुष्य आनंदाने जगण्याची जिद्द होती.
मी घरी पोहोचलो तरी हे सगळे चित्र माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हते. प्रचंड शारीरिक मानसिक त्रास घेऊन माणसे आनंदी राहू शकतात मग आपले दुखणे, दुःख त्यापुढे शून्य आहे हेच मला जाणवत होते. सुखाची व्याख्या आता आपण बदलने गरजेचे आहे असे मनाशी ठरवले. सुख म्हणजे फक्त समाधान हेच खरे आहे. आपल्याकडे आहे त्या गोष्टीत सुख मानणे आणि सुख शोधणे इतकच. या पलीकडे सुखाची वेगळी व्याख्या असूच शकत नाही. लहान-सहान गोष्टींमध्ये सुख शोधावे व आनंदी रहावे.
ज्या प्रमाणे कावीळ झालेल्या माणसाला सारे जग पिवळे दिसते; त्याच प्रमाणे दु:खी माणसाला सारे जग दु:खी दिसते. म्हणून आनंदी होण्यासाठी एक उत्तम उपाय म्हणजे स्व:ताच्या दुखाचा विचार सोडून दुसर्याच्या दु:खाचा विचार करणे व ते कमी करण्याचा प्रयत्न करणे. म्हणून आनंद मिळण्यासाठी इकडे-तिकडे न भटकता. स्वत:च्या मनाशी त्याचा शोध घेतला पाहिजे.