Why do children lie to their parents?
मुलं खोटं बोलत असतील, पालकांपासून काही लपवून ठेवत असतील तर दोष हा फक्त मुलांचाच नसतो. त्यात आई-बाबांचीही काही चूक असते असं तज्ज्ञ म्हणतात. त्यामुळे मुले जेव्हा अशी विचित्र वागतात तेव्हा काही गोष्टींचा विचार पालकांनी केला तर मुले अशी का वागतात याचं उत्तर त्यांना मिळेल आणि मुलांशी जवळीक निर्माण करण्याचा मार्गही सापडेल.
मुलांच्या सर्वांत जवळचे असतात ते आई बाबा. आई, बाबांकडून आपले सर्व हट्ट पुरवून घेणारी मुलं जेव्हा मोठी व्हायला लागतात तेव्हा त्यांच्या वर्तनात बदल होऊ लागतो. ही मुलं आई बाबांपासून काही गोष्टी लपवतात, खोटं बोलतात. मुलं आपल्याशी असं का वागतात? असा प्रश्न पालकांना पडतो. यात मुलंच दोषी, मुलांचीच चूक आहे यापद्धतीनं पालक इतरांकडे मुलांच्या तक्रारी करतात किंवा मुलांकडे त्याच नजरेतून बघतात. मुलं खोटं बोलत असतील, पालकांपासून काही लपवून ठेवत असतील तर दोष हा फक्त मुलांचाच नसतो. त्यात आई-बाबांचीही काही चूक असते असं तज्ज्ञ म्हणतात. त्यामुळे मुलं जेव्हा अशी विचित्र वागतात तेव्हा काही गोष्टींचा विचार पालकांनी केला तर मुलं अशी का वागतात याचं उत्तर त्यांना मिळेल आणि मुलांशी जवळीक निर्माण करण्याचा मार्गही सापडेल.
मुलं पालकांशी खोटं का बोलतात?
● आई, वडिलांशी नातं घनिष्ठ नसेल तर एका टप्यात मुलांचा आई, वडिलांवरील विश्वास उडून जातो. आई, वडील आपल्याला समजून घेणारच नाहीत, आपल्याला परवानगी देणारच नाहीत किंवा अमूक, तमूक आई, बाबांना कळलं तर ते चिडतील असा समज मुलामध्ये निर्माण होतो आणि ते पालकांना काही गोष्टी कळू देत नाहीत किंवा काही गोष्टींच्या बाबतीत त्यांच्याशी खोट बोलतात.
● प्रत्येक गोष्टीत मुलांना रागवलं जात असेल. त्यांना जाब विचारला जात असेल तर त्याचा परिणाम मुलांच्या मनावर होतो. मुल आपल्यापासून मनाने दुरावू नये यासाठी आधी मुल काय म्हणताय, त्यांनी काय केलं शांतपणे समजून घेऊन त्यांच्याशी शांतपणे संवाद साधावा तरच मुलांमध्ये पालकांबद्दल विश्वास निर्माण होतो असं बालमानसशास्त्रज्ञ सांगतात.
● मुलांसमोर आई, वडिलांची सतत भांडण होत असतील तर मुल आधी घाबरतात. हे रोजचं असेल तर वैतागतात. त्यांना सतत भांडणाऱ्या आई, वडिलांबद्दल मनात राग निर्माण होतो. याचा परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होऊन ती घरात असली की उदास राहातात. त्यांना पालकांशी काही बोलावंसं वाटत नाही. या सर्वांचा परिणाम म्हणजे मुलं अनेक गोष्टी आई, बाबांना सांगत नाही. ते चिडतील, ओरडतील, मारतील या भीतीने त्यांच्यापासून गोष्टी लपवून ठेवतात.
● मुलं जेव्हा उदास असतात, नाराज असतात, त्यांचा मूड नसतो तेव्हा मुलांना काय झालं याकडे पालकांचं दुर्लक्ष होतं. या परिस्थितीत मुलांना आई, बाबांचा सहवास हवा असतो, त्यांनी आपल्याशी बोलावं, आपल्यासाठी वेळ काढावा अशी मुलांची इच्छा असते. पण मुलांच्या या परिस्थितीकडे आई, बाबा सरळ दुर्लक्ष करतात किंवा उलट त्यांना ओरडतात. रागावतात, फटकारतात. त्याचा परिणाम मुलांच्या मनावर होतो. मुलं घाबरतात. त्यांना मनातून आई बाबांचा राग येतो. त्यांच्याशी काही शेअर करू नये, त्यांन काही सांगू नये असं त्यांना वाटतं. आपल्याकडे आई, बाबांच लक्षच नसतं ही भावना त्यांच्या मनात दृढ होऊन मुल आई, बाबांशी खोट बोलतात.
मुलं खोटे बोलत आहे हे कसं ओळखाल?
● खोटे झाकण्यासाठी मुले अनेकदा मजेदार कथा पालकांना सांगतात.
● खोट्याशी संबंधित प्रश्न विचारल्यावर मुलांना राग येतो.
● कधीकधी, खोटं बोलत असताना, मुलं नेहमीपेक्षा मोठ्या आवाजात बोलू लागतात जेणेकरून पालक शांत बसतील.
● जर मुलं खोटं बोलत असतील तर ते बोलताना तुमच्यासोबत नजर मिळवू शकत नाहीत.
● मूल उत्तर द्यायला वेळ घेत असेल, तर पालकांनी लक्षात घ्यावे की ते आता त्यांच्या मनात एक गोष्ट तयार करून तुमच्याशी खोट बोलत आहेत.
मुलांची खोटं बोलायची सवय कशी सोडवायची?
● खोटे बोलण्याचे काय वाईट परिणाम होतात आणि त्यामुळे मुलांचे काय नुकसान होऊ शकते ते तुम्ही मुलाला सांगा.
● मुलांशी तुमच्या मनातले विचार शेअर करा आणि त्याला समजावून घ्या, जेणेकरून तोही मन मोकळेपणाने तुमच्याशी बोलू शकेल.
● एखाद्या सत्य घटनेच्या किंवा गोष्टीच्या आधारे खोटे बोलण्याचा काय परिणाम होतो हे तुम्ही मुलाला शिकवू शकता.
● मुलं तुमची वागणूक कुठेतरी कॉपी करतात, त्यामुळे त्यांच्यासमोर कधीही खोटं बोलू नका.
● तुम्ही मुलाला खात्री पटवून द्या की जेव्हा तो तुम्हाला सत्य सांगेल तेव्हा तुम्ही त्याला साथ द्याल आणि त्याला चूक सुधारण्याची संधी द्याल.
● जर मुलाने तुम्हाला चूक सांगितली तर त्याला ओरडण्याऐवजी मुलाचे कौतुक करा आणि भविष्यात काळजी घ्यायला सांगा.