Lahanpana Dega Deva…
माणसं शहाणी झाली आणि प्रश्नांच्या गोतावळ्यात गुंतू लागली! शहाण्यांनी शहाण्यासारखं वागाव इथपर्यंत ठीक आहे. मात्र बालकांनीही शहाण्यासारखं वागावं हे जरा अतीच नाही का? मुलं मुलांसारखी वागली…. खरं तर याच कौतुक असावं! मात्र मुलांचा आरडा ओरडा, धिंगा-मस्ती एकमेकांच्या खोड्या काढणं शिस्तीच्या नावाखाली मुलांचं निरागस बालपण झाकळल जात असेल तर पालकांना आता शहाण नाही तर लहान होण्याची गरज आहे, असं वाटल्याशिवाय राहत नाही.
रोज नोकरीवर जाणाऱ्या आईला पाळणा घरात राहणारी छकुली म्हणते की, ‘आई ज्या दिवशी तू घरी असते त्यादिवशी खूप मऊ मऊ वाटतं गं!’ बहुदा मुलांना कुठल्याही भौतिक सुविधांपेक्षा आई-वडिलांच्या मायेची उब, त्यांचा सहवास त्यांना अधिक प्रिय असतो. परीक्षेत, खेळात प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर पेढे वाटणाऱ्या बापापेक्षा मुलगा पराभूत झाल्यानंतर त्याची मान खांद्यावर ठेवत पाठीवर विश्वासाचा हात ठेवणारा आणि ‘काळजी करू नको मी सदैव तुझ्या पाठीशी आहे’ असा विश्वास देणारा बाप मुलांना अधिक आवडतो. तू हुशार आहेस म्हणून आम्हाला आवडतो किंवा तू हुशार असशील तरच आम्हाला आवडतील या ऐवजी तुझी हुशारी किंवा तुझा वेडेपणा हा फार फार तर तुझ्या व्यक्तिमत्त्वातला एखादा गुण किंवा दुर्गुण असेल या ऐवजी तू आमच मुल आहे म्हणून सदैव आम्हाला प्रिय आहे.
आदर्श पालकात्वाचा दृष्टिकोन मुलांच बालपण अधिक आनंददायी करू शकतो. मुलं रडली, पडली, ओरडली की त्यांच्यातल्या दबलेल्या भावनाची वाट मोकळी होते. या उलट करड्या शिस्तीत मुलांच्या भावनांची घुसमट होते. शिस्त आणि बेशिस्त पणाची सीमारेषा पालकांना विवेकी पणाने ठरवता आली पाहिजे. या दृष्टिकोनात विवेकीपणा असेल तर कळीच फुल व्हायला वेळ लागणार नाही. मात्र अविवेकी पणा असेल तर कळी कुस्करली जाण्याचीच जास्त शक्यता असते.
माळी बागेतल्या फुलांची जशी काळजी घेतो, चला… तेच प्रेम मुलांना देऊया! मुलांचे लहानपण जपुयात…….