Educational thinkers in Maharashtra and their work
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे एक प्रभावी साधन आहे. समाजाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक विचार प्रवाहांना सुयोग्य वळण मिळवून देण्याचे काम शिक्षणाचे आहे. शिक्षणातील विचार प्रवाह आपल्या आचार, विचार आणि लेखणीद्वारे सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याचे काम शैक्षणिक विचारवंत करत असतात. महाराष्ट्रातील काही थोर शैक्षणिक विचारवंतांच्या कार्याचा परिचय पुढीलप्रमाणे आहे.
महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे महात्मा जोतीराव फुले, स्त्री शिक्षण कार्यासाठी व स्त्रियांच्या पुनरुद्धारासाठी आपले संपूर्णआयुष्य समर्पित करणारे महर्षी धोंडो केशव कर्वे, महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर शाळा, महाविद्यालये स्थापन करत वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून देणारे कर्मवीर भाऊराव पाटील, मोफत व सक्तीचे शिक्षण पुरवण्यासाठी अमरावती जिल्ह्यात १०० शिक्षण केंद्रे उभारणारे डॉ. पंजाबराव देशमुख आणि कोसबाडसारख्या दुर्गम भागात बाल शिक्षणाची सुरुवात करत आदिवासी बालकांना विविध खेळांच्या माध्यमातून शिक्षण उपलब्ध करून देणाऱ्या अनुताई वाघ, या सर्वांच्या शैक्षणिक कार्याचा परिचय आपण आज करून घेणार आहोत.
महात्मा जोतीराव फुले :
महात्मा जोतीराव फुले यांनी महाराष्ट्रामध्ये स्त्री शिक्षणाचा पाया रचला. स्त्री शिक्षणासोबतच मागासवर्गीयांच्या शिक्षणासाठी देखील भरीव कामगिरी केलेली आहे. समाजामधील स्त्री-पुरुष समानतेसाठी व शिक्षण प्रसारासाठी १८७३ मध्ये महात्मा जोतीराव फुले यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. भारतातील श्रीमंतापासून ते गोरगरिबांपर्यंत प्रत्येकाला शिक्षण मिळावे यासाठी १८८२ मध्ये हंटर आयोगासमोर भारतातील लोकांना सक्तीचे, विनाशुल्क व सार्वत्रिक स्वरूपाचे शिक्षण शासनामार्फत द्यावे अशी मागणी केली. असेच एक निवेदन १८८८ मध्ये व्हिक्टोरिया राणीचे प्रतिनिधी ड्युक ऑफ कॅनॉट यांना देखील दिले होते.
महर्षी धोंडो केशव कर्वे :
स्त्री शिक्षण ही परमेश्वराची आराधना मानून आपले संपूर्ण आयुष्य स्त्री शिक्षणासाठी समर्पित करणारे थोर शैक्षणिक विचारवंत म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे होत. महर्षी कर्वे यांनी लहान बालिका, अनाथ बालिकांपासून तर प्रौढ महिलांपर्यंत सर्वांसाठी शिक्षणाचे कार्य करत असताना अनाथ बालिकाश्रमापासून ते महिला विद्यापीठापर्यंत अनेक शिक्षण संस्थांची स्थापना केली. महर्षी कर्वे स्त्री शिक्षणासच देशकार्य समजत असत. महर्षी कर्वे यांनी शिक्षणाचे माध्यम म्हणून मातृभाषेस महत्त्वाचे स्थान दिले. परंतु याच वेळी इंग्रजी भाषेचे महत्त्वही अधोरेखित केले. शिक्षणामध्ये केवळ तात्त्विक अभ्यासक्रमाचाच समावेश न करता विविध खेळ, नृत्य, संगीत, चित्रकला, बांधकाम, कार्यानुभव अशा उपक्रमासही महत्त्वाचे स्थान दिले. महिला विद्यापीठाच्या माध्यमांमधून समाज परिवर्तन घडवून आणले.
कर्मवीर भाऊराव पाटील :
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रेरणेमधून आणि महात्मा जोतीराव फुले यांच्यातून स्फूर्ती घेऊन रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिक्षणाची गंगा नेऊन पोहचवण्याचे महान व पवित्र कार्यकर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपल्या संस्थेचे बोधचिन्ह म्हणून ‘वटवृक्षाचे’ चित्र ठरवले. प्राथमिक शिक्षणापासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंतचे शिक्षण उपलब्ध करून देणाऱ्या शैक्षणिक संस्था असाव्यात याच संकल्पनेमधून कला, वाणिज्य, विज्ञान, शिक्षणशास्त्र, विधी, अभियांत्रिकी या विद्याशाखांसह अनेक प्राथमिक, माध्यमिक विद्यालयांची स्थापना केली. भाऊराव पाटील हे खऱ्या अर्थाने कार्यवादी होते. त्यामुळेच त्यांनी श्रमजीवी व बुद्धिवंताचा मेळ आपल्या संस्थांमधून घातला. याचा फायदा ग्रामीण भागांमधून अनेक डॉक्टर्स, वकील, प्राध्यापक, शिक्षक, समाजसेवक, आधुनिक शेतीनिष्ठ पदवीधर तयार करण्यासाठी झाला.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी १९२१ साली वाळवा तालुक्यातील नेरले येथे वसतिगृहाची स्थापना केली. या वसतिगृहात अस्पृश्यांसहित सर्व जाती-धर्मांचे विद्यार्थी राहत असत. कुणाही एकावर भोजनाचा खर्च पडू नये म्हणून ‘मुष्टीफंड’ ही अभिनव येाजना सुरू केली. (मुष्टीफंड ही अभिनव योजना घरातील बाई जेव्हा जात्यावर दळण्यासाठी बसायची तेव्हा फक्त एक मूठ धान्य टांगलेल्या त्या पिशवीत टाकायची नंतर वसतिगृहातील मुले किंवा शिक्षक ती पिशवी घेऊन जात. यास एक झोळी योजना असेही म्हणतात).
डॉ. पंजाबराव देशमुख:
डॉ. पंजाबराव देशमुख यांनी अविकसित समाज अधिकाधिक शिक्षणाच्या प्रवाहात कसा येईल यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. अविकसित समाज शिक्षणाच्या प्रवाहात आला पाहिजे याकरिता वसतिगृहयुक्त शिक्षण, शाळा महाविद्यालयाची स्थापना रूरल इन्स्टिट्यूट यांसारख्या माध्यमा मधून प्रयत्न केले. ‘शेतीला जसे पाणी तसे समाजाला शिक्षण’ हा मूलमंत्र बाळगणारे एक पुरोगामी विचाराचे शैक्षणिक विचारवंत म्हणजे डॉ.पंजाबराव देशमुख.
डॉ. पंजाबराव देशमुखांच्या कार्यामुळे सक्तीचे, विनाशुल्क व सार्वत्रिक शिक्षण सुरू करण्यात अमरावती जिल्ह्याने संपूर्ण भारतामधून दुसरा क्रमांक पटकावला होता.विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी वसतिगृहाची सुविधा उपलब्ध झाली पाहिजे या विचारामधून डॉ. पंजाबराव देशमुख यांनी श्री शिवाजी शिक्षणसंस्था अमरावतीच्या माध्यमिक शाळांना लागून वसतिगृहाची स्थापना केली. मुला-मुलींच्या उच्च शिक्षणाची सोय झाली पाहिजे व ग्रामीण भागामधील मुलांना पदवी मिळवता आली पाहिजे याकरिता विदर्भामध्ये अनेक महाविद्यालये सुरू केली.
अनुताई वाघ :
अनुताई वाघ यांनी ताराबाई मोडक यांच्या मदतीने व मार्गदर्शनातून बालशिक्षणाच्या इतिहासात अनेक प्रयोग केलेले आहेत. अनुताईंनी कोसबाड ता. डहाणू, जि. पालघर या आदिवासी वस्तीच्या भागात आदिवासी बालकांना विविध खेळांच्या माध्यमांमधून शिक्षण दिले. अनुताईंनी १९४९ ते १९५६ या कालावधीत एकूण १५ अंगणवाड्या चालवल्या. व्यावसायिक शिक्षणातून आदिवासींना रोजगार मिळवून दिला. यासाठी अनुताईंनी विकासवाडी ही योजना सुरू केली. ग्रामसेविका, बालसेविका, अंगणवाडी यांसाठी डॉ. चित्रा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारचे प्रशिक्षण वर्ग घेतले. आदरणीय ताराबाई मोडक यांचे शैक्षणिक कार्य एक निष्ठावान अनुयायी म्हणून अनुताई वाघ यांनी चालू ठेवले.
अनुताई वाघ यांनी निरपेक्ष वृत्तीनेबाल शिक्षणाचे कार्य संपूर्ण आयुष्यभर केले. माँटेसरीला पर्याय म्हणून बालवाडी या संकल्पनेची सुरुवात केली. आदिवासी शिक्षणाचेव्यवस्थापन प्रत्यक्ष त्यांच्यामध्ये राहून केले. अंगणवाडी, बालवाडी, अध्यापकांसाठी विविध प्रयोग व प्रशिक्षण वर्गांचेआयोजन केले. अनुताई वाघ यांनी बोर्डी, कोसबाडच्या आदिवासी परिसरामध्ये १० पाळणा घरे, ११ बालवाड्या, ४ पूर्व प्राथमिक शाळा, ३० प्रौढ शिक्षण संस्था, बाल सेविका प्रशिक्षण वर्ग, अंगणवाडी प्रशिक्षण वर्ग, अध्यापक प्रशिक्षण विद्यालय, रात्र शाळा, कुरण, मूकबधीर संस्था डहाणू, स्त्रीशक्ती जागृती संस्था, ठाणेअशा अनेक संस्था स्थापन केल्या. त्या काळात बोर्डी, कोसबाड हेआदिवासी परिसर बालशिक्षणाच्या प्रयोग शाळाच बनल्या. आदिवासींच्या कल्याणासाठी त्यांनी आपलेसंपूर्ण आयुष्य वेचले.
अनुताईंनी आपल्या शैक्षणिक संकल्पना, पद्धती आणि प्रयोग यांची चर्चा स्फूटलेख व पुस्तकांद्वारेकेली. त्यांनी बालवाडी कशी चालवावी, कुरणशाळा, विकासाच्या मार्गावर शिक्षण मित्र माला, कोसबाडच्या टेकडीवरून, सकस आहार गीते, सहज शिक्षण, बालवाडीतील गोष्टी, बडबडगीते, कृतिगीते, प्रबोधिका इ. पुस्तकांचेलेखन केले.