S R Dalvi (I) Foundation

मैत्री संस्कार 

Rites for friendship

आयुष्य घडवण्यासाठी, तसेच मनाची बैठक निर्माण होण्यासाठी चांगल्या मित्रांची, संगतीची आवश्यकता असते. इतर संस्कार प्रमाणे मैत्री संस्कार हा जीवनाला दिशा देणारा आणि पाया भक्कम करणारा संस्कार असतो. वर्गात अनेक सहअध्यायी असतात; परंतु त्यात एक-दोन जणांशी घट्ट मैत्री होते. प्राथमिक शाळेत मैत्रीची भावना पुसट, धूसर असते. पण माध्यमिक शाळेत गेल्यानंतर मात्र आपल्या सोबत्यांमध्ये वावरताना इतर विविध गोष्टींबरोबरच मैत्रीची भावना हळूहळू वाढीस लागते. आई-वडिलांनंतर महत्त्वाचा वाटायला लागतो तर तो म्हणजे मित्र. शाळेच्या काळात अनेकांबरोबर मैत्री होते; परंतु त्यातही एक-दोनच खास मित्र बनतात. मित्रांच्या व आपल्या आवडीनिवडी सारख्या बनतात. त्याची प्रत्येक गोष्ट आपल्याला पटते. अभ्यास करताना, खेळताना मित्राची सोबत आवडते. मैत्रीचा आधार हवाहवासा वाटतो.

मैत्रीचे एक वेगळेच भावविश्व तयार होते. शाळेबरोबरच घराशेजारचे समवयस्क किंवा लहान-मोठ्या सोबत्यांबरोबरही मैत्री वाढीस लागते. मित्राबरोबर गप्पा मारणे, अभ्यास करणे, फिरणे प्रत्येकालाच आवडते. मित्रांमध्ये अनेक कारणांमुळे बऱ्याचदा भांडण होते. पण कमलपत्रावरून पाण्याचा थेंब जसा पटकन ओघळून जातो, तसेच मित्रांमधील राग, भांडण क्षणात ओघळून जाऊन सगळे पूर्ववत होऊन मैत्रीचा रंग अधिक दाट बनतो. मुलांच्या मनाची ती एक गरज असते. मैत्रीची भावना एक सुरक्षिततेचे वलय निर्माण करते. “आपलं कुणी आहे हा विश्वास फार मोठा असतो. मग मुला-मुलांच्या ग्रुपमध्ये आपल्या खास मित्रांमुळे आपले वजन तर वाढतेच, शिवाय समूहात वेगळे स्थान निर्माण होते.

शालेय वयात मित्राचा आपल्या वागण्या-बोलण्यावर खूप परिणाम होतो. त्यामुळे जर चांगले मित्र असतील तर चांगल्या सवयी लागतात. एकमेकांचे जे जे चांगले ते ते प्रत्येकाने घेतले तर हा संस्कार बालवयात चांगला रुजतो. त्याचा परिणाम पुढे आयुष्यभर चांगलाच दिसतो. 

पालकांनी, शिक्षकांनी लक्षात घ्यायला हवे, की आपल्या मुलांचे मित्रमंडळ कसे आहे? ते काय खेळतात, काय बोलतात, यावरून आपल्या पाल्याच्या प्रवासाची दिशा आपल्याला समजते. वेळीच योग्य मार्गदर्शन करता येते. पण पालक-शिक्षकांनी हेही लक्षात घ्यायला हवे, की या बालसुलभ मैत्रीच्या फुलण्यात जास्त हस्तक्षेप करणे विकासाला बाधा आणणारे ठरते.

गल्लीत, शाळेत मुलांना आताशा मित्रांबरोबर मनसोक्त खेळण्यास, गप्पा मारण्यास पुरेसा वेळ मिळत नाही ; परंतु सुटी किंवा वीकेंडला एकमेकांकडे पालकांच्या संमतीने राहायला गेले, तर ही उणीव भरून काढता येईल. मुलांच्या भावनिक वाढीसाठी जसे आई-वडिलांचे प्रेम महत्त्वाचे असते, तशीच मैत्री भावना ही अतिशय मौल्यवान असते.

Scroll to Top