Best practices for self-study
पूर्वी, विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या पारंपारिक पद्धतींवर अवलंबून राहावे लागत होते, जसे की वर्गात जाणे, पाठ्यपुस्तके वाचणे आणि नोट्स घेणे. तथापि, तंत्रज्ञानाच्या आगमनाने, आता प्रभावीपणे शिकण्याचे आणि अभ्यास करण्याचे पूर्वीपेक्षा अधिक मार्ग आहेत. स्व अभ्यास किंवा स्वत: चा अभ्यास (Self Study) ज्यामध्ये थेट शिक्षकांच्या पर्यवेक्षणाशिवाय अभ्यास करणे किंवा वर्गात उपस्थित नसणे. शिक्षण हा एक मौल्यवान अलंकार आहे. ऑनलाईन शिक्षणाची पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रियता वाढत आहे. गृह अभ्यासासह औपचारिक शिक्षणाची पूर्तता करुन, विद्यार्थी स्वत:चा अभ्यास स्वत: करु शकतात.
नवीन तंत्रज्ञान, जागतिक वाढती लोकसंख्या, कौटुंबिक किंवा आर्थिक अडचणी यामुळे सर्वांनाच शाळा किंवा महाविद्यालयात जाऊन शिक्षण घेणे शक्य होत नाही. आता शिक्षण फक्त वर्गापुरते मर्यादीत राहिलेले नाही आणि काहीजण असा दावा करतात की आता वर्गातील शिक्षण कालबाह्य झाले आहे. समाजातील सर्वच व्यक्तींच्या बौद्धिक गरजा ते पूर्ण करीत नाही.
अलिकडे अनेक मुक्त विद्यापीठे, इंटरनेट ज्ञानकोश, शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे ऑनलाईन अभ्यासक्रम उपलब्ध करुन देत असल्यामुळे स्वयं-शिक्षण घेणे अधिकच सोपे आणि सोयीचे झाले आहे. एखादी नवीन भाषा शिकणे किंवा करिअरच्या प्रगतीसाठी प्रमाणपत्र मिळविणे सहज शक्य झाले आहे. आपण आपल्या घरी आरामात, आपल्या स्वत: च्या वेळेनुसार आणि आपल्या स्वत: च्या गतीने शिक्षण येऊ शकता. कमी खर्चात, या शिक्षण पद्धती पारंपारिक शैक्षणिक संस्थांवर अतिक्रमण करीत आहेत.
स्वयंअध्ययन सुरुवातीस कठीण वाटते, परंतु प्रयत्न केल्यास, त्यात आवड निर्माण झाल्यानंतर सोपे वाटते. स्वयंअध्ययन योग्य रीतीने केले तर ते शिक्षणाचे एक प्रभावी साधन आहे, जेणेकरुन परीक्षेची तयारी करण्यासाठी किंवा स्वतःच संपूर्णपणे नवीन विषय शिकण्यासाठी हे उपयुक्त ठरेल. यशस्वी लोकांच्या चांगल्या सवयींपैकी एक म्हणजे त्यांनी आपल्या दिवसाची सुरुवात लवकर केलेली आहे. नियमितपणे सकाळी लवकर उठा, व्यायाम करा, ताजेतवाने व्हा आणि नियोजनाप्रमाणे अभ्यासासाठी सज्ज व्हा.
एकाग्रतेने प्रभावी अभ्यासासाठी अभ्यासाचे ठिकाण अत्यंत महत्त्वाचे आहे. याचा अर्थ आपले घर, कार्यालय किंवा विद्यार्थ्यांच्या शयनकक्षातील एक डेस्क असू शकेल. ते कुठेही असले तरीही, त्यात व्यवस्थित अभ्यास करण्याची जागा असावी. तेथे गोंधळ आणि लक्ष विचलित होणार नाही याची काळजी घ्यावी, तसेच त्या जागेमध्ये चांगला प्रकाश असावा. जेणेकरुन डोळे ताणण्याची वेळ येणार नाही. त्यामध्ये कॅलेंडर, वेळापत्रक, काही प्रेरक विचार आणि कोणतीही गोष्ट जी आपल्याला आपल्या सभोवताली ठेवल्यामुळे नेहमी प्रेरणा मिळते. चांगली स्टडी खुर्ची घ्या. पलंगावर बसून किंवा झापून अभ्यास करु नका.
दररोज किमान एक विषयाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करा आणि सराव करा. आपल्या समोर टाइम टेबल पेस्ट करा जेणेकरुन आपण ट्रॅकवर आहात की नाही याची आपल्याला जाणीव असेल. वाचनाबरोबर अधिकाधिक लिहिण्याचा सराव करा. शिकण्याचे बरेच वेगवेगळे मार्ग आहेत, उदा. लिखीत पुस्तकांचा वापर करणे किंवा तंत्रज्ञानाचा वापर करणे. काही विद्यार्थ्यांना मोठ्याने वाचणे उपयुक्त वाटते, तर काहींना हस्तलिखित नोट्स घेणे आवडते. आपल्यासाठी जे चांगले वाटते ते शोधा आणि त्यासह नियमित अभ्यास करा.
ज्या दिवशी आपण जो भाग शिकलात त्या भागाचे पुनरावलोकन करा. ऑनलाईन अभ्यासामध्ये नोटस घेणे महत्वाचे आहे. नोट्स घेतल्यानंतर किंवा आपल्या पाठ्यपुस्तकातील धडा वाचल्यानंतर, शांतपणे वाचलेला भाग आठवण्याचा प्रयत्न करा. चांगले स्मरणात राहण्यासाठी पुन्हा वाचून, तो भाग लिहून काढा. ही कृती थोडी कंटाळवाणी वाटत असली तरी, अभ्यासाचा आढावा घेतल्यास ते दीर्घकाळापर्यंत स्मरणात राहण्यास मदत होते.
थोडक्यात, वारंवार थोडा थोडा अभ्यास करा. आपण एकाच वेळी खूप वाचण्याऐवजी थोडा थोडा अभ्यास करुन, थोड्या विश्रांतींनंतर पुन्हा अभ्यास करा, अशा प्रकारे, आपण आपले लक्ष वेधून घेत अभ्यास केल्यास तो कंटाळवाना वाटत नाही.