Nelson Mandela was a great leader
स्वातंत्र्य पूर्वीचा काळ आपल्या भारतासाठी फारच कठीण राहिला आहे. भारतातील प्रत्येक क्रांतिवीरांनी आपल्या रक्ताचे पाणी केलं आणि वेळ आलीच तर आपला जीवही भारतमातेसाठी अर्पण केला. ब्रिटिशांनी आपल्या जनतेवर बरेच अत्याचार केले अतिशय हीन अशी वागणूक दिली भारताला ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी आपल्या भारतातील शूरविरांनी बऱ्याच खस्ता खाल्ल्यात. परंतु फक्त आपला भारतच असा देश नव्हता जो ब्रिटिशांच्या कचाट्यात अडकला होता.
दक्षिण आफ्रिकेमध्ये देखील अशीच काही परिस्थिती सुरू होती आणि दक्षिण आफ्रिकेला ब्रिटिशांच्या तावडीतून सोडवण्यासाठी एक नवीन आशेचा किरण होता तो म्हणजे नेल्सन मंडेला. नेल्सन मंडेला हे दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष ठरले ज्यांनी आपल्या देशासाठी बऱ्याच खस्ता खाल्ल्या. आजच्या ब्लॉग मध्ये आपण नेल्सन मंडेला यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वा विषयी माहिती जाणून घेणार आहोत.
१८ जुलै १९१८ ला जन्मलेल्या मंडेलांनी साम्राज्यवाद, गरिबी आणि वंशभेदाचं उच्चाटन करण्यासाठी जो अतुलनीय लढा दिला त्याचं खरंतर शब्दांत वर्णन करणे शक्य नाही. ‘प्रदीर्घ वाटचाल-स्वाधीनतेकडे’ हे त्यांचं आत्मचरित्र म्हणजे त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याबरोबरच दक्षिण आफ्रिकेचा आणि जागतिक पातळीवरील अनेक लढ्यांचा पट आहे.
नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष तसेच वर्णद्वेष आणि वर्णभेद विरोधीमोहिमेतील आदर्श व्यक्तिमत्व. वयाच्या ९५व्या वर्षी नेल्सन मंडेला यांचे निधन झाले. नेल्सन मंडेला यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासातून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. नेल्सन मंडेला यांनी कायम देशाला उच्च विचारसरणी राखण्याची शिकवण दिली. त्यांच्या या वर्णद्वेष आणि वर्णभेद विरोधी मोहिमेमुळे त्यांच्या विरोधातील नेत्यांनी त्यांना तुरुंगात डांबले होते. नेल्सन मंडेला यांना तब्बल २७ वर्षे तुरुंगवास सहन करावा लागला. नेल्सन मंडेला हे खऱ्या अर्थाने एक आदर्श नेतृत्व होते.
मंडेला १९९४ ते १९९९ या काळात दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष होते. वर्षानुवर्षे ‘काळे’ म्हणून हिणवल्या गेलेल्या समूहातील ते पहिले राष्ट्राध्यक्ष. शांततेचं नोबेलही त्यांना १९९३मध्ये प्रदान करण्यात आलं. त्याआधी २५० पेक्षाही अधिक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आलं होतं. मात्र, जागतिक पातळीवर एक आयकॉन बनलेल्या मंडेला यांचा बालपणापासूनचा काळ, शिक्षण, वकिलीतील संघर्ष, रोबेन बेटावरील कोठडी आणि स्वातंत्र्य मिळण्यापर्यंतचा कालखंड त्यांच्यासाठी अत्यंत प्रतिकूल होता.
नेल्सन मंडेला यांनी १९४३ साली आफ्रिकन नॅशनल कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यावेळेस ते कायद्याचे शिक्षण घेत होते. वर्णद्वेषासंबंधातील त्यांच्या मोहिमेमुळे त्यांना १९६२ साली अटक करण्यात आली. त्यावेळेस त्यांना पाच वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र नंतर तिचे रुपांतर जन्मठेपेत करण्यात आले. तुरुंगातील एकांतवासात जवळपास त्यांना मरणासन्न वाटत होते. तरीही त्यांनी आपल्या मोहिमेचे कार्य़ सुरू ठेवले. २५ एप्रिल १९९८ साली दक्षिण आफ्रिकेतील क्वाडुकुझा क्वाझुलू नाटाल या शहरात मुख्य अधिकारी अल्बर्ट लुथुलीच्या शताब्दी समारंभात मंडेला यांनी ʻखरे नेते सर्वाचा त्याग करण्यास तयार असतातʼ, असे वक्तव्य केले होते.
जेव्हा इतर पक्षांचे नेते मंडेला यांना पापी आणि देशद्रोही संबोधत होते, तेव्हादेखील त्यांनी आपला शांततेचा आणि समानतेचा लढा सुरू ठेवला होता. १९६४ साली सुनावणीदरम्यान मंडेला म्हणाले की, ʻमी गौरवर्णीयांच्या वर्चस्वाविरोधातदेखील लढा दिला आहे. त्याच प्रमाणे मी कृष्णवर्णीयांच्या वर्चस्वाविरोधातदेखील लढा दिला आहे.ʼ अशाप्रकारे मंडेला यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली होती. ११ फेब्रुवारी १९९४ रोजी रॉबेन आयलॅंड, केपटाऊन येथे मंडेला म्हणाले की, ʻआमच्या मुद्द्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर माझा विश्वास नाही. माझा स्वतःवर विश्वास आहे आणि त्यामुळे मला अधिकाधिक लोकांचे समर्थन मिळत आहे.ʼ
केपटाऊन शहरातील रोबेन आयलॅंड येथे तुरुंगवास भोगत असताना, त्यांना चुन्याच्या खाणीत कंबर मोडीस्तोवर काम करावे लागत असे. त्यांनी केलेल्या दृढनिश्चयापासून त्यांना परावृत्त करण्यासाठी त्यांना याप्रकारची शिक्षा सुनावण्यात आली होती. या शिक्षेमुळे त्यांच्या आसपासच्या सहकाऱ्यांनी हात टेकले. रखरखत्या उन्हात खाणीत काम केल्यामुळे मंडेला यांच्या डोळ्याला दुखापत होण्याची दाट शक्यता होती. मात्र त्यांनी अखेरपर्य़ंत हार मानली नाही. केपटाऊनच्या बाहेरील पॉल्समूर तुरुंगात मंडेला यांना क्षयरोगाने ग्रासले. तुरुंगवासादरम्यान मंडेला यांचा निर्धार मोडण्याचा बराच प्रयत्न करण्यात आला. मात्र मंडेला यांनी आपला लढा सुरूच ठेवला.
मंडेला हे नेहमीच सत्य बोलण्याचा आग्रह करीत असत. भलेही त्या सत्यामुळे त्यांच्या स्वतःच्या समर्थकांना त्रास होत असला तरीही. एएनसी समर्थक आणि झुलू लोकांमध्ये झालेल्या इनकाथा चळवळीदरम्यान मोठ्या प्रमाणात रक्तपात झाला होता. त्यावेळेस या चळवळीदरम्यान झालेल्या रक्तपाताचा आरोप त्यांनी एकट्या विरोधकांवर ठेवला नाही. या रक्तपातासाठी एएनसी समर्थकदेखील तेवढ्याच प्रमाणात जबाबदार आहेत, आपण सत्याचा सामना करायला हवा, अशी भूमिका मंडेला यांनी घेतली होती. विरोधी पक्षातील लोक ज्याप्रमाणे या हिंसाचारामध्ये सक्रिय सहभागी होते, आमचे लोकदेखील तेवढ्याच प्रमाणात जबाबदार आहेत. निष्पाप नागरिकांच्या रक्तपाताच्या बदल्यात मिळालेले स्वातंत्र्य आपल्याला नकोय. मंडेला यांच्या मुलाचे निधन एचआयव्हीमुळे झाले होते. त्यामुळे त्यांनी एड्सविरोधात मोहिम सुरू केली. एड्स रोगाला त्यांनी ʻदक्षिण आफ्रिकेचा अभिशापʼ, असे संबोधले. परिणामी त्यांनी अनेकांचा रोष आपल्याकडे ओढवून घेतला होता.
स्वतःच्या प्रतिष्ठेबाबतची मंडेला यांची भूमिका उल्लेखनीय होती. ʻएका आदर्श लोकशाहीत आणि मुक्त समाजात प्रत्येक नागरिक एकत्रितरित्या शांततेत राहील आणि प्रत्येकाला समान संधी मिळत असेल, अशा समाजाला मी समर्थन देतो. अशा आदर्श लोकशाहीत मला राहायची इच्छा आहे आणि अशा प्रकारच्या लोकशाहीची स्थिती मला गाठायची आहे. असा समाज गाठण्यासाठी मी जीवाचाही त्याग करण्यास तयार आहेʼ, असे त्यांनी शिक्षा भोगत असताना म्हटले. मंडेला हे ʻबोले तैसा चालेʼ, या वचनाप्रमाणे वागत.
नेतृत्वाबाबतचे अनेक धडे मंडेला यांनी जगाला दिले. ʻटाईमʼचे व्यवस्थापकिय संपादक रिचर्ड स्टेंगल यांनी २००८ साली घेतलेल्या मुलाखतीत मंडेला यांनी काही परिस्थितीत आपल्याला भीती वाटल्याचे मान्य केले. स्टेंगल यांना मंडेला यांनी सांगितले की, एक नेता म्हणून जेव्हा तुम्ही घाबरत असाल, तरी तुम्हाला तुमची भीती दाखवता येत नाही. तुम्हाला आघाडीवर येऊनच नेतृत्व करावे लागते. ʻद सिक्रेट्स ऑफ लीडरशीपʼ, ही मंडेला यांच्या आयुष्यावरील स्टेंगल यांची कथा जगातील एका आदर्श नेत्याच्या आय़ुष्याचे प्रतिबिंब आहे आणि उर्वरित लोकांनी त्यावरुन बरेच काही शिकण्यासारखे आहे.