S R Dalvi (I) Foundation

डॉ. बाबासाहेब आंबेडकर: ‘जय भीम’ हा नारा कुणी दिला?

Dr. Babasaheb Ambedkar: Who gave the slogan ‘Jai Bhim’?

महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि आंबेडकरांशी भावनिक ऋणानुबंध जपणारे कोट्यवधी लोक एकमेकांना अभिवादन करताना ‘जय भीम’ म्हणतात.

‘जय भीम’ या शब्दावर हजारो नव्हे तर लाखो गाणी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात गायली जातात. तामिळनाडूत पण या एका शब्दाने सध्या वेड लावलं आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर हे होते. त्यांचा गौरव म्हणून त्यांची आठवण म्हणून आंबेडकरी चळवळीशी बांधिलकी असलेले लोक ‘जय भीम’ म्हणतात. ‘जय भीम’ केवळ एक अभिवादनाचा शब्दच न राहता आज तो आंबेडकरी चळवळीचा नारा झाला आहे. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते या शब्दाला तर चळवळीचा प्राण म्हणतात.

हा शब्द अभिवादनापासून क्रांतीचे प्रतीक कसा झाला याचा प्रवास देखील रंजक आहे. ‘जय भीम’ हा शब्द केव्हा रूढ झाला आणि महाराष्ट्रात तयार झालेला हा शब्द भारतभर कसा पसरला हे पाहूया.

‘जय भीम’ नारा कुणी दिला?

‘जय भीम’चा नारा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते बाबू हरदास एल. एन. (लक्ष्मण नगराळे) यांनी 1935 मध्ये दिला अशी नोंद आहे.

बाबू हरदास हे सेंट्रल प्रोव्हिन्स-बेरारच्या काउन्सिलचे आमदार होते आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारे एक प्रखर कार्यकर्ते होते.

नाशिकच्या काळाराम मंदिरातला लढा, चवदार तळ्याचा सत्याग्रह यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घराघरात पोहोचले होते. त्यानंतर डॉ. आंबेडकरांनी महाराष्ट्रातून दलित नेत्यांची जी फळी उभी केली होती त्यापैकी बाबू हरदास एक होते.

बाबू हरदास यांनीच ‘जय भीम’चा नारा दिल्याची नोंद रामचंद्र क्षीरसागर यांच्या ‘दलित मूव्हमेंट इन इंडिया अँड इट्स लीडर्स’ या पुस्तकात आहे.

गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर नियंत्रण यावे तसेच समतेविषयक विचार गावोगावामध्ये पोहोचावेत हा विचार घेऊन डॉ. आंबेडकरांनी समता सैनिक दलाची स्थापना केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाचे ते सचिव होते.

‘जय भीम’चा नारा कसा तयार झाला याबद्दल कसा तयार झाला असं विचारले असता दलित पॅंथरचे सहसंस्थापक ज. वि. पवार सांगतात, “कामठी आणि नागपूर परिसरातील कार्यकर्त्यांचे संघटन बाबू हरदास यांनी उभे केले होते. या दलातील स्वयंसेवकांना त्यांनी सांगितले होते की एकमेकांना अभिवादन करताना नमस्कार, रामराम, किंवा जोहार मायबाप न म्हणता ‘जय भीम’ असे म्हणावे. आणि ‘जय भीम’ला प्रत्युत्तर म्हणून ‘बल भीम’ म्हणावे.”

“ज्या प्रमाणे मुस्लीम लोक ‘सलाम वालेकुम’ या अभिवादनाला उत्तर देताना ‘वालेकुम सलाम’ म्हणतात तसे ‘जय भीम’ला उत्तर म्हणून ‘बल भीम’ म्हणावे असे त्यांनी सुचवले होते. पण पुढे ‘जय भीम’ला उत्तर ‘जय भीम’नेच देण्याची पद्धत रूढ झाली आणि तीच कायम राहिली,” अशी माहिती ज. वि. पवार यांनी दिली.

पवार यांनी राजा ढाले, नामदेव ढसाळ यांच्यासोबत काम केले आहे तसेच त्यांचे दलित पँथरवरील पुस्तकही प्रकाशित आहे.

ते पुढे सांगतात, “1938 साली औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात मकरंदपूर येथे भाऊसाहेब मोरे या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी एक सभा भरवली होती. या सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर देखील उपस्थित होते. त्या सभेत मोरे यांनी जनतेला सांगितले की यापुढे आपण एकमेकांना अभिवादन करताना ‘जय भीम’च म्हणत जाऊ.”

“बाबू हरदास यांनी हा नारा दिला तर भाऊसाहेब मोरेंनी या नाऱ्याला समर्थन दिले,” असं पवार सांगतात.

‘थेट बाबासाहेबांनाच जय भीम म्हटलं तेव्हा’

“डॉ. आंबेडकरांच्या हयातीतच ‘जय भीम’ या अभिवादनाला सुरुवात झाली. चळवळीतील कार्यकर्ते एकमेकांना तर ‘जय भीम’ म्हणतच असत पण एखादा कार्यकर्ता थेट डॉ. आंबेडकरांना सुद्धा ‘जय भीम’ म्हणत असे. त्या वेळी बाबासाहेब त्या व्यक्तीच्या अभिवादनाचे उत्तर केवळ स्मित हास्य करुन देत असत,” असं माजी न्यायाधीश सुरेश घोरपडे सांगतात.

न्या. सुरेश घोरपडे हे सत्र न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आहेत, विदर्भातील दलित चळवळीचे ते अभ्यासक आहेत. बाबू हरदास यांच्या कार्यावर त्यांनी आतापर्यंत अनेक लेख लिहिले आहेत तसेच व्याख्याने दिली आहेत.

ते सांगतात, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रात दलित उद्धारासाठी जे आंदोलन सुरू केले त्यात अनेक तरुण स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले. त्यापैकी एक बाबू हरदास एल. एन. होते.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top