S R Dalvi (I) Foundation

जाणून घेऊयात ‘प्रवर्तक बाबू हरदास एल. एन.’ यांच्या बद्दल…

Let's know about 'Promoter Babu Hardas L. N.'.... 

“किशोरवयापासूनच त्यांना सामाजिक कार्याची आवड होती. त्यांचा जन्म 6 जानेवारी, 1904 ला झाला होता आणि 1920 मध्ये ते सामाजिक चळवळींशी जोडले गेले. नागपूर येथील पटवर्धन हायस्कूलमधून ते मॅट्रिक पर्यंत शिकले, त्यांना ‘जय भीम प्रवर्तक’ याच विशेषणाने ओळखले जाते,” असे माजी न्यायाधीश सुरेश घोरपडे सांगतात.

“आंबेडकरांच्या प्रेरणेनी त्यांनी कामठी येथे 1924 साली संत चोखामेळा वसतिगृहाची स्थापना केली. यामुळे खेडोपाड्यातून आलेल्या विद्यार्थ्यांची निवासाची सोय झाली. त्यांनी कष्टकरी वर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी रात्रशाळा देखील सुरू केल्या होत्या. त्यांचे इंग्रजी उत्तम होते आणि बहुजन समाजातल्या मुलांना इंग्रजी यावे असं त्यांना वाटत असे त्यातूनच त्यांनी अशा विद्यार्थ्यांना इंग्रजीचे शिक्षण देण्यास सुरुवात केली,” असे न्या. घोरपडे सांगतात.

“1925 साली त्यांनी बिडी मजुरांची संघटना स्थापन केली. विदर्भातील दलित आणि आदिवासी समाजातील लोक तेंदू पत्ते गोळा करत, बिडी कारखान्यांमध्ये काम करत तसेच घरोघरी बिडी वळण्याचे काम देखील चाले. बिडी कारखानदार आणि कंत्राटदार अशा लोकांची पिळवणूक करत असत. बाबू हरदास यांनी त्यांची संघटना उभी करून त्यांना त्यांच्या हक्काचा पैसा मिळवून दिला,” असे न्या. घोरपडे सांगतात.

बिडी मजुरांच्या संघटनेचे काम केवळ विदर्भापुरतेच मर्यादित राहिले नाही. 1930 साली त्यांनी मध्यप्रदेश बिडी मजूर संघाची स्थापना केल्याची नोंद रामचंद्र क्षीरसागर यांच्या ‘दलित मूव्हमेंट इन इंडिया अँड इट्स लीडर्स, 1857-1956’ या पुस्तकात आहे.

“1932 साली डिप्रेस्ड क्लास मिशनचं दुसरं अधिवेशन कामठी येथे झालं होतं. बाबू हरदास हे स्वागत समितीचे अध्यक्ष होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्वागत त्यांनी केले होते. डॉ. आंबेडकरांच्या कामठी येथील भेटीनंतर त्यांचा या चळवळीतील उत्साह कैकपटींनी वाढला,” असं न्या. घोरपडे सांगतात.

1927 साली त्यांनी ‘महारठ्ठा’ नावाचे पत्रक सुरू केले होते अशी नोंद वसंत मून यांनी लिहिलेल्या ‘वस्ती’ या पुस्तकात आहे. या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद देखील उपलब्ध आहे. गेल ऑम्वेट यांनी वस्तीचा अनुवाद ‘ग्रोइंग अप अनटचेबल’ असा केला आहे.

‘बाबू हरदास हे कवी आणि लेखक होते,’ असे वसंत मून लिहितात.

1937 साली विधानसभा निवडणुकीसाठी डॉ. आंबेडकरांच्या स्वतंत्र मजूर पक्षातर्फे त्यांनी उमेदवारी देण्यात आली. त्यांच्याविरोधात एक धनाढ्य व्यक्ती उभी होती. या व्यक्तीचा उल्लेख वसंत मून यांनी ‘लाला’ असा केला आहे.

या लालांचा एक कार्यकर्ता हरदास यांच्याकडे आला आणि त्याने हरदास यांना आपला अर्ज परत घेण्यास सांगितले. पाहिजे ती किंमत लाला देण्यासाठी तयार आहे असे तो म्हणाला. पण हरदास यांनी यास नकार दिला.

“मी आंबेडकरांच्या पक्षातर्फे उभा आहे असं ते म्हणाले. आम्ही भीक मागणे केव्हाच सोडून दिले आहे. आता आमच्या हक्काचं आम्ही मिळवून राहू,” असं त्यांनी त्या व्यक्तीस ठणकावून सांगितल्याचं वसंत मून लिहितात.

ही गोष्ट तिथेच संपत नाही. त्यानंतर या लालांनी बब्बू उस्ताद नावाच्या एका महाकाय पैलवानाला बाबू हरदास यांच्याकडे पाठवले. बाबू हरदास यांना तो म्हणाला, ‘तुमची उमेदवारी परत घेण्यासाठी शेटजींनी 10 हजार रुपये पाठवले आहे जर तुम्ही हे घेतले नाही तर ते तुमचा खून देखील करतील.’

यावर हरदास म्हणाले, ‘मला माहीत आहे जर मला काही बरं वाईट झालं तर ते देखील जिवंत राहणार नाहीत. यावर बब्बू उस्ताद म्हणाला ती तर नंतरची गोष्ट राहील पण तुमचा जीव गेल्यावर त्याचा काय फायदा.’ यावर देखील हरदास मागे हटले नाहीत. ते म्हणाले ‘आपण बघू पुढे काय होतं,’ ते असं म्हटल्यावर बब्बू उस्ताद तिथून निघून गेला.

विरोधकाकडे पैसा आणि ताकद असून देखील बाबू हरदास ही निवडणूक जिंकले आणि सेंट्रल प्रोव्हिन्स-बेरारच्या काउन्सिलवर ते गेले.

1939 साली त्यांचा क्षयरोगाने मृत्यू झाला. त्यांच्या अंत्ययात्राला दलित, मजुरांचा जनसागर लोटला होता. कामठी आणि नागपूर परिसरातील दलित तर आलेच होते पण त्याचबरोबर भंडारा, चंद्रपूर या भागातील बिडी मजूर देखील त्यांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी कामठी येथे आले होते.

“त्यांच्या निधनांतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते माझा उजवा हात गेला,” असं न्या. घोरपडे सांगतात.

कामठी येथील कऱ्हाण नदीच्या काठावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. कामठी येथे त्यांचे स्मारक उभरण्यात आले आहे.

“एखादा धुमकेतू आकाशात तळपावा, अन् त्याच्या लख्ख उजेडाने डोळे दिपून जावे पण क्षणार्धातच तो नाहीसा व्हावा असं हरदासच्या बाबतीत आम्हाला झालं,” असं मून लिहितात.

बाबू हरदास यांच्या जीवनावर ‘बोले इंडिया जय भीम’ हा सुबोध नागदेवे यांचा मराठी चित्रपट देखील आला आहे.

Scroll to Top