Dubai vs. Mumbai: Comparing the Two Cities' Tourism Offerings
मुंबई आणि दुबई ही दोन्ही शहरे नैसर्गिक बेटे आहेत. पहिले अक्षर व अनुस्वांरा व्यतिरिक्त नंतरची दोन अक्षरे अगदी सारखीच आहेत. दुबई नैसर्गिक वाळवंट आहे तर मुंबई आल्हाददायक सुंदर बेट आहे म्हणूनच ब्रिटीश लोक मुंबईला बॅाम्बे म्हणायचे. मुंबईला डोंगर, नद्या, नाले तसेच आल्हाददायक सुंदर मनमोहक समुद्र किनारा लाभला आहे. दुबईला फक्त आणि फक्त नैसर्गिक समुद्र किनारा लाभला आहे पण आज दुबईमध्ये असंख्य पर्यटक मानवनिर्मित कदाचित निसर्गाला पण भुरळ पडेल असे नंदनवन आणि दुबईतील जगप्रसिध्द पर्यटन स्थळे पहायला जातात आणि हेच खरे नाविण्यपूर्ण वैशिष्ठ्य आहे दुबईचे.
दुबईतील रस्ते अगदी चकचकीत म्हणजे तेल सुद्धा पुसून घेऊ शकतो इतके तुळतुळीत आणि सुंदर आहेत. दोन जरी काठाच्या नऊ वारी साड्या पूर्ण उघडून लांबीच्या साईडला जोडल्यानंतर जे लॅंडस्केप चित्र तयार होईल अगदी तश्याच प्रकारे रस्ते आपणास दुबई शहरात नजरेस पडतील. दोन साड्यांच्या लॅंडस्केप चित्राचे दोन सलंग्न जरीकाठ म्हणजे रस्त्याचा दुभाजक आणि त्यावरील डोळे दिपवून टाकणारी हिरवळ तसेच विविध रंगाच्या फुलांचे पट्टे आणि दोन्ही साईडचे दोन जरीकाठ म्हणजे दोन्ही बाजूंचे प्रशस्त फुटपाथ आणि फुटपाथाच्या बाजूला हिरवळीची तसेच रंगीबेरंगी फुलांच्या किनारी अगदी रस्त्यासोबत धावत असतात. प्रशस्त रस्त्यांचा मनमोहक सौंदर्यशील नजारा सर्व पर्यटकांना भुरळ पाडल्याशिवाय राहू शकत नाही.
दुबई नैसर्गिक दृष्ठ्या वाळवंट असल्यामुळे तेथील सर्व साधारण हवामान उष्ण व अतिउष्ण आहे त्यामुळे तेथे पुर्ण वातानुकूलित वहानेच वहातुकीस वापरली जातात. दुबईमध्ये अंतर्गत शहरी वाहतूकीच्या सर्व सुविधा पर्यटकांच्या सोईसाठी नियोजित केलेल्या आहे त्यामध्ये उन्नत मेट्रो, ट्राम तसेच भुगर्भिय मेट्रो यांचा समावेश आहे. तेथील अतिउष्ण हवामानामुळे आपसुखच सर्व सामाण्य मोटर सायकल व आँटो रिक्षा दैनंदिन वहातूकीच्या साधनातून बाहेर पडल्यामुळे शहरी वहातूक निट व सुरळीत होण्यास मदत होते म्हणजेच काय नैसर्गिक परिस्थिती सुद्धा अत्याधुनीक सेवेला सुरळीत करण्यास हातभार लावते.
दुबई नैसर्गिक वाळवंट असल्यामुळे त्याठिकाणी फुलझाडांना आवश्यक व पुरक असणारी सेंद्रीय माती व शुद्ध नैसर्गिक पाणी या दोन उपयुक्त बाबींची वाणवा असतानासुद्धा दुबई सरकारने फुलझाडांना व मनमोहक हिरवळीला उपयुक्त असणारी सेंद्रीय माती आयात करून मिरँकल गार्डन सारखे जगप्रसिद्ध सर्वश्रेष्ठ उद्यान पर्यटकांसाठी उभे केलेले आहे. दुबईमध्ये नद्या, नाले, डोंगर तसेच नैसर्गिक पाऊस ह्या सारख्या नैसर्गिक साधण संपत्ती उपलब्द नसतानासुद्धा समुद्राचे खारे पाणी अनेक शास्त्रीय प्रकिया प्रकल्पा अंतर्गत पिण्यास व इतर वापरास उपयुक्त करून ते पाणी मुबलक प्रमाणात दुबई रहिवाश्यांना व बाग बगिच्यांना उपलब्ध केलेले आहे आणि हीच दुबई सरकारची अभिमानास्पद बाब आपल्या निदर्शनास आल्याशिवाय रहात नाही.
दुबईमध्ये पावसाळा हा ऋतूच नाही त्यामुळे दुबई शहर नैसर्गिक दृष्ठ्या सुरक्षित आहे, पण त्यांनासुद्धा उष्माघाताचा जोरदार तडाखा सहन करावा लागतोच. याउलट मुंबईमध्ये अगदी तिनही ऋतूच मस्त मजेत अनुभवता येतात पण बहुतांशी वेळा पावसाळ्यात मुंबई शहर शत प्रतिशत सुरक्षित वाटत नाही, ही एकमेव कमतरता सरकारने शास्त्रीय पद्धतीने निरसण केली तर मुंबईकर खूपच सुखावेल. दुबई सरकारने अनेक नैसर्गिक विषमतेला शास्त्रीय दृष्ठीने आणि जिद्दीने पध्दतशीर तोंड देत शहराला मानवनिर्मित नैसर्गिक नंदनवन व जगप्रसिध्द पर्यटन स्थळ बनविले असल्यामुळे देशा विदेशातील पर्यटक आपल्या कुटुंबासहीत सुट्टयांचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी दुबईवारी करतात आणि अत्यूच्य पातळीची मनमुराद मौजमाजा करूण दुबईवारी कायमची स्मरणात कोरूण ठेवतात.
दुबई शहरामध्ये रस्त्यावरील कोणतेही वाहन हॅार्न वाजवत नाही. वाहतुक अगदी सुरळीत व शांततामय पद्धतीने चालू असते. रस्त्यावरील कोणत्याही चौकात वाहतूक पोलीस तसेच इतर पोलीस नजरेस पडत नाही त्याचप्रमाणे रस्त्यावर वाहन कोणीही थांबवत नाही. अनाधिकृत वाहन तळ कोठेही नजरेस पडत नाही. वाहक फक्त अधिकृत वाहन तळावरच आपले वाहन पार्क करतात. झ्रेब्रा क्रॉसिंग व्यवस्थित नियोजित केलेले असल्यामुळे पायपिट करणाऱ्या पर्यटकांना सुद्धा काडीमात्र त्रास होत नाही. पादचारी लोकांना रस्ता ओलांडण्यासाठी छप्पर असलेले पादचारी पुल बांधलेले आहेत तसेच पादचारी पुलाच्या दोन्ही बाजुला जिन्यासहीत उदवाहकाची सुद्धा सुविधा दिलेली आहे. पादचारी पुलामध्ये उदवाहक असल्यामुळे वयोवृद्ध पादचारी रहिवाश्यांना जिन्याच्या पायऱ्या न चढता रस्ता ओलांडणे अत्यंत सुविधाजनक व आरामशीर आहे. रस्त्यावर कोठेही खड्डे निदर्शनास येत नाही त्याचप्रमाणे फुटपाथ सुद्धा कोठेही तुटलेला फुटलेला दिसत नाही. शहरातील कारचा प्रवास अगदी सुलभ व सुखकारक होतो. पर्यटकांच्या पोटातील पाणी सुद्धा हलत नाही इतका सुखकारक प्रवास दुबईमध्ये अनुभवायला मिळतो.
दुबईमध्ये दुबई फ्रेम, मुलांसाठी चिल्ड्रेन पार्क, सील व डॉल्फीन शो, मोठमोठाले शॉपींग माँल, माँलमध्ये मच्छालय, पेंग्वीन गुहा, मिरॅकल गार्डन, ग्लोबल व्हीलेज, डेझर्ट सफारी,मरिना धाऊ कृझ शो, अबूधाबीचे फेरारी वर्ल्ड, १२४ मजली बुर्ज खलिफा व त्यावरील रात्रीचा लेझर शो, सप्ततारांकीत हॉटेल बुर्ज अल अरब, फ्यूचर म्युझीयम, डोळे दिपवणारा पाल्म जुमेराह बीच इत्यादी पर्यटन स्थळे दुबई सरकारने तयार केलेली आहेत. दुबईच्या धर्तीवर म्हणजेच दुबई व मुंबईमध्ये बरेच साम्य असल्यामुळे मुंबईमध्ये सुद्धा हॅगिंग गार्डन, गेट वे ऑफ इंडिया, राणीची बाग, दादर व गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, सायन फोर्ट, वल्ड वन टॅावर, ताजमहाल हॅाटेल व त्यावर लेझर शो, मिठी नदी मध्ये बारमाही मरिना कृझ शो, आरे गार्डन व नैसर्गिक जंगल, राजा शिवाजी संग्रहालय, एस्सेल वर्ल्ड, तुलशी लेक, पवई लेक व त्यामध्ये फांऊंटन शो,विहार लेक, महाकाली केव्हज,घारापुरी लेणी,नेकलेस सारखा सुंदर सौंदर्यदर्शी मरिन ड्राईव्ह व मनमोहक महापालिका भवन व छत्रपती शिवाजी टर्मिनस इत्यादी अस्तीत्वात असलेली प्रसिद्ध नैसर्गिक व मानव निर्मित स्थळे पर्यटनास अनुकूल करून मुंबईला सुद्धा जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ बनवून जगातील सर्व पर्यटकांना आकर्षित करता येईल पण त्यासाठी सरकारची व महानगरपालिकेची इच्छा शक्ती व जिद्द गरजेची आहे. केल्याने होत आहे रे आधि केलेची पाहिजे या पारंपारिक म्हणीप्रमाणे सर्वांनी कामकाज केले पाहिजेत तसेच मुंबईत राहणाऱ्या प्रत्येक रहिवाश्याने आपल्या अंगी चांगली शिस्त रूजवली पाहिजेत.
आपण परदेशी पर्यटनास गेल्यानंतर त्या शहराचे नियम व अटी आठ ते दहा दिवस अगदी तंतोतंत पाळतो पण आपल्या देशात परतल्यानंतर ती चांगली सवय तेथेच ठेऊन येतो आणि हीच खोड आपणांस आपल्या शरीरातून हद्दपार करावी लागेल तरच मुंबई पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला येण्याचा पहिला मार्ग खुला होईल.
दुबईमध्ये कोणतेही काम गुणनियंत्रणाच्या अधिन राहूनच पूर्ण केले जाते त्यामुळे तेथील प्रत्येक बाबीचे स्वतःचे अनुमानित आयुष्य आबाधित आहे. त्याचप्रमाणे त्याची सर्व कामे नियोजित आणि अगदी सखोल विचाराअंती करवून घेतली जातात. आपल्याकडे अगदी याच्याविरूद्ध कामे केली जातात. आज रस्ता बनविला जातो आणि उदया लगेच त्याच्यावर महानगर टेलीफोनवाले तसेच महानगर गॅसवाले व इलेक्ट्रिकवाले त्यांच्या कामासाठी चरी व खड्डे खोदतात आणि केबल चरी मध्ये टाकल्यानंतर ते अधिकारी त्यांच्याच पँनेलवरच्या कंत्राटदारांकडून ते खड्डे व चरी भरवून घेतात पण त्यावेळी पूर्वीच्या गुणनियंत्रणाप्रमाणे पॅचवर्क केले जात नाही आणि त्यामुळे रस्त्याचे नियोजित किंवा अनुमाणित आयुष्य कमी होते आणि त्या रस्त्यावर खड्डे आपुसकच जन्म घेतात अणि मग रस्त्यावरच्या प्रवाश्यांना खड्यांमुळे कमर दु:खीचा त्रास सुरू होतो.
दुबईमध्ये कोठेही आपणास तेथील नेत्यांच्या वाढदिवसाचे कट आऊट तसेच बॅनर निदर्शनास येत नाहीत. तेथील इमारतीवर तसेच कोणत्याही रस्त्यावर लटकणाऱ्या केबल सुद्धा दिसत नाहीत त्याचप्रमाणे दुबईतील उड्डानपूल, पादचारी पुल अगदी बॅनर फ्री व केबल फ्री आहेत आणि आपल्या देशात वर्षाचे बाराही महिने नेत्यांच्या वाढदिवसाचे व सणासुदिच्या शुभेच्छांचे बॅनर, कटआउट त्यासोबत विद्युत रोषणाई लटकलेली पहायला मिळते. काही बॅनर तर महिनोमहिणे उलटे सुलटे लटकलेले दिसतात. उड्डाणपुलावर जाहिरातीचे साम्राज्य असते. खरेतर शहरातील उड्डाणपुल, पादचारीपुल तसेच लाईटचे खांब नेहमीच बॅनर फ्री व जाहिरात फ्री असले पाहिजेत. जाहिरात अडकवताना उड्डाणपुलाला कोणीही कोठेही ड्रिलींग करतात, खिळे मारतात तर पुलाच्या बॅरीकेटींवर वायरीचे जाळे पसरवून टाकतात. या सर्व उद्योगामुळे उड्डान पुलाचे इलेव्हेशन अगदी घाणेरडे व बकाल झालेले आपणास पहायला मिळते. नेत्यांच्या वाढदिवसांचे बॅनर फक्त पोस्टर स्पर्धेतून सवंग प्रतिष्ठा व नेत्यांवरचे बेगडी प्रेम दाखवण्यासाठी लावलेले असतात.
आज मुंबई व ठाण्यासारखी शहरे या बॅनर बाजीने अगदीच भकास व बकाल बनलेली आपल्या निदर्शनास येतील. वाढदिवसाच्या बॅनर बाजीने आपले उदयाचे नागरिक खुपच बेफाम झालेले आहेत. वयोवृध व तरुण नेतेमंडळीच्या वाढदिवसाच्या बॅनरमुळे शाळकरी मुले निराश होत आहेत कारण त्याना त्यांच्या क्रिडा कौशल्यांचे व शौर्याचे बॅनर कोठेही दृष्ठिस पडत नाहीत.कधी कधी बॅनर रस्त्यावर पडून काही ठिकाणी छोटे मोठे अपघात सुद्धा झालेले आहेत. उड्डाण पुलावरील व पुलाच्या खांबावरील स्थापत्य अभियंत्यांच्या कलाकुसरीला सुद्धा या बॅनरबाजीने झाकले आहे. जर मुंबईला जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ बनवायचे असेल तर पहिल्यांदा पोस्टर बाजीला तिलांजली दिली पाहीजेत.
आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना मुंबईमध्ये मनोरंजनासाठी तसेच पर्यटनासाठी घेऊन जायचे म्हटले तर जगप्रसिद्ध असे कोणतेही पर्यटन स्थळ नियोजित तसेच संकल्पित केलेले नाही. राणीच्या बागेतसुद्धा अगदी मोजकेच प्राणी व पक्षी आहेत. अडीच कोटी लोकसंख्या सामावून घेणाऱ्या मुंबई शहरात फक्त एक दोनच पेंग्वीन राणीच्या बागेत आहे यावरून आपणास लक्षात येईल कि आपण व आपले सरकार पर्यटनाविषयी किती जागरूक आहोत?
खरेतर पर्यटनाचे असंख्य फायदे आहेत. पर्यटनामुळे रोजगार वाढतो, शहराविषयी जिव्हाळा व प्रेम निर्माण होते. वाहतुकीच्या सोई सुविधा निर्माण होतात. परकीय चलन आपल्या देशात येते त्याचप्रमाणे आयात निर्यातीला चालना मिळते. हॅाटेल व टूरिस्ट व्यवसाय निर्माण होतात या व्यतिरिक्त जागतिक पातळीवर आपल्या मुंबईचे नाव पर्यटनस्थळाच्या यादीमध्ये येऊ शकते.
आपल्या पै पाहुण्यांना सुट्टी कालावधीत आपल्याकडे आमंत्रित करून मुंबईतील नवसाच्या सिद्धी विनायकासोबत इतर पर्यटन स्थळांचे पर्यटन करून त्यांना आनंदीत व समाधानी करू शकतो. पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मामाच्या गावाला जायला मिळायचे आणि गावच्या जंगली ओल्या सुक्या मेव्याचा मनसोक्त आस्वाद चाखन्यास मिळत होता पण आज रोजी नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने बरेच मामा लोक मुंबईत स्थायिक झालेले आहेत पण त्याना त्यांच्या भाचरांना आज कोणते पर्यटन स्थळ दाखवायचे तसेच त्यांचे मनोरंजन कसे करायचे हा अतिगहन प्रश्न सर्व मुंबईकरांसमोर उभा ठाकला आहे.
पर्यटन ही आजची मुख्य मुलभूत गरज आहे त्यासाठी सरकारने तालुका, जिल्हा, मेट्रो पोलिटीयन शहरे इत्यादी ठिकाणी विभागवार पर्यटनाचा अभ्यास करून त्या त्या ठिकाणी उचित पर्यटन विकास केला पाहिजेत. आज मुंबईच्या आजुबाजूला बऱ्याच ठिकाणी आपले आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे गड व किल्ले जीर्ण अवस्थेत अस्तित्वात आहेत त्या सर्वांचे मजबूतीकर व सुशोभिकरण केले तर ते सर्व गड किल्ले नक्कीच जगप्रसिद्ध पर्यटन स्थळे बनतील याचे कारण म्हणजे ते सर्व गड व किल्ले नैसर्गिक ठिकाणी बांधलेले आहेत त्याचबरोबर ते सर्व किल्ले स्थापत्य अभियांत्रिकी शास्राचे उत्तम व आदर्श नमुणे आहेत. गड व किल्ल्यांचा ऐतिहासिक पर्यटन विकास केला तर भविष्यात तरुण पिढीला महाराजांचा आदर्श घेऊन आपल्या जीवनाची यशस्वी वाटचाल नक्कीच करता येईल.
मुंबईला जागतिक पर्यटन स्थळ बनविले तर, अतिथी देवो भव या पारंपारिक म्हणीप्रमाणे आपल्या सर्व पै-पाहूण्यांना मुंबईच्या परिसरात असलेल्या सर्व पर्यटन स्थळांचे पर्यटन घडवून त्यांना आनंद मौजमजा तसेच सुख समाधान प्राप्त करूण देता येईल. आजच्या धावपळीच्या युगात विरलेली व विखुरलेली जुनी जाणती सर्व नाती पुन्हा एकदा पर्यटनाच्या आणि अतिथ्यांच्या माध्यमातून ताजीतवाणी करता येतील आणि त्यांचा आनंद सर्वांना घेता येईल, त्याचप्रमाणे इतर देशवासियांचे व परदेशी पाहूण्यांचे पण आपणाला आदरातिथ्य करता येईल.
मुंबईला मिठी नदीचे नैसर्गिक वरदान लाभले होते. कदाचित मुंबईला प्राचिण काळात गोडे पाणी पुरवित असल्यामुळे त्या नदीला मिठी नदी हे गोंडस नाव मिळालेले असेल पण आज ती नदी फक्त मिठी नदी या नावाने सरकार दरबारी अस्तित्वात आहे पण आज मितीला त्या मिठी नदिला फक्त आणि फक्त मोठाले घाणेरड्या पाण्याचे व टाकाऊ वस्तूचे महागटर संबोधणे सार्थ ठरेल. पुन्हा एकदा नावाप्रमाणे मिठी नदीला गोड व स्वच्छ करूण त्या नदी मध्ये मुंबईच्या पारंपारिक कलेचा आदर्श नमुना दाखविण्यासाठी मुंबई मिठी कृझ सेवा उपलब्द झाली तर मुंबईकरांना व मुंबईमध्ये येणाऱ्या सर्व पाहुण्यांना एक आदर्श पर्यटनाची मेजवाणीच मिळेल पण यासाठी मुंबई महानगरपालिकेची व सरकारची पर्यटनावरील इच्छाशक्ती व अर्थशक्ती कधी बहरते याकडे सर्व मुंबईकर व देशवासीय डोळे लाऊन बसले आहेत. मुंबई आणि दुबई जर पर्यटनाच्या , कलाकौशल्याच्या व इनफ्रास्ट्रक्चर तांत्रीक बाबीच्या क्षेत्रात जुळे भाऊ बनले तर खरोखरच देशवासियांना पर्यटनाची मेजवानी मुंबईतच मिळेल. मुंबई व दुबई या नावांमध्ये उच्चार व अक्षरे सारखीच आहेत म्हणून जुळे भाऊ बनन्यास अधिक अनुकूल आहेत, मग बघूया आपली मुंबई जागतिक पातळीवरील प्रसिध्द पर्यटन स्थळ कधी बनते.