S R Dalvi (I) Foundation

शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील

Education Maharshi Karmaveer Bhaurao Patil

महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक शिक्षणमहर्षी अर्थात कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म २२ सप्टेंबर १८८७ रोजी महाराष्ट्रातील कुंभोज या लहानशा गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पायागोंडा पाटील तर आईचे नाव गंगाबाई पाटील होते . त्यांचे वडील सरकारी खात्यात कारकून म्हणून काम करत होते. त्यामुळे त्यांच्या वडिलांच्या बऱ्याचदा बदल्या होत राहायच्या. या बदल्यांमुळे कर्मवीर भाऊराव पाटील यांना सुद्धा अनेक वेळा शाळा बदलाव्या लागत असत.

कर्मवीर भाऊराव पाटील यांचा अभ्यास लहानपणापासून थोडा कच्चा होता. कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूल मध्ये भाऊराव पाटील यांनी इंग्रजी सहाव्या इयत्तेपर्यंत शिक्षण घेतले. पण इंग्रजी सहाव्या इयत्तेतून पुढे matric च्या वर्गात अभ्यास कच्चा असल्यामुळे त्यांना जाता आले नाही. याबाबत त्यांनी पुढच्या वर्गात पाठवण्याच्या दृष्टीने त्यांच्या वर्गशिक्षकांना विनंती केली होती. ही विनंती वर्गशिक्षकांनी अमान्य केली. तेव्हा ही बाब भाऊराव पाटील यांनी राजर्षी शाहू महाराजांना सांगितली. महाराजांनी गुरुजींना बोलावून चौकशी केली तेव्हा ‘या विद्यार्थ्याचा अभ्यास कच्चा आहे. पुढील वर्गात घातल्यास याचेच नुकसान होईल’ असे गुरुजींनी सांगितले. तेव्हा शाहू महाराजांनी गुरुजींना विनंती केली. तव्हा गुरुजी म्हाणाले, “महाराज, भाऊराव ज्या बाकावर बसत होते त्या बाकाला एक वेळ मी वरच्या वर्गात घालीन. पण त्याला वरच्या वर्गात घालणार नाही” हे ऐकून महारज गुरुजींवर अजिबात रागावले नाही उलट त्यांच्या कर्तव्यानिष्ठातेचा आदर त्यांनी केला आणि भाऊराव पाटील यांनीही गुरुजींचा राग मनात नाही ठेवला. परंतु पुढच्या वर्गात न पाठवणाऱ्या गुरुजींना सुद्धा कुठं माहित होतं की हा मुलगा पुढे शिक्षण महर्षी होईल.

महात्मा फुले आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांनी भाऊराव पाटील प्रेरित झाले होते. आपल्या शैक्षणिक कार्याची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील दुधगाव या गावातून केली. येथील स्थानिक लोकांच्या सहकार्यातून त्यांनी ‘दुधगाव विद्याप्रसारक मंडळ’ स्थापन केले. या संथेच्या माध्यमातून त्यांनी ‘दुधगाव विद्यार्थी आश्रम’ सुरु केले. या वसतिगृहात सर्व प्रकारच्या जातीचे विद्यार्थी होते.

कर्मवीर भाऊराव पाटील हे सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते होते. काही काळ सत्यशोधक समाजाच्या प्रचाराचे कार्य सुद्धा त्यांनी केले. ४ ऑक्टोबर १९१९ मध्ये त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. पुढे रयत शिक्षण संस्थेच्या वतीने सातारा येथे ‘छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस हे वसतिगृह सुरु केले. या वसतिगृहातही सर्व जातीधर्माचे विद्यार्थी राहत. स्वतः कर्मवीर भाऊराव पाटील गावागावात फिरून गरीब मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत. कारण शिक्षणातून गरिबी आणि दारिद्र दूर होईल असं त्यांचा विश्वास होता. विद्यार्थ्यांवर त्यांचे खूप प्रेम होते. वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या खाण्यापिण्याची, राहण्याची सर्व सोय भाऊराव करत असत. यासाठी अनेक ठिकाणाहून देणगी मिळवण्यासाठी ते प्रयत्नशील असत. त्यांच्या कार्यात त्यांची पत्नी लक्ष्मीबाई पाटील या सुद्धा सहभागी असत. वसतीगृहातील मुले उपाशी राहू नयेत म्हणून या माऊलीने आपल्या गळ्यातील मंगळसूत्र सुद्धा विकण्यासाठी मागेपुढे पहिले नाही.

कर्मवीर भाऊराव पाटील स्वावलंबी शिक्षणाचा पाया घातला असे म्हणायला हरकत नाही. गरीबाच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च त्यांचे पालक करू शकत नाहीत. मग अशा मुलांसाठी कामाव आणि शिका हि मोहीम त्यांनी सुरु केली. यातून स्वाभिमानाने आणि ताठ मानेने जगणारे विद्यार्थी तयार झाले. ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ हे रयत शिक्षण संस्थेचे ब्रीदवाक्य आहे. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाची गंगा सर्वसामान्यांच्या दारोदारी पोहचवण्याचे काम करणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांचा मृत्यू ९ मे १९५९ रोजी झाला.

आज कर्मवीर भाऊराव पाटील आपल्यात नाहीत पण त्यांचे विचार आणि त्यांनी सुरु केलेली रयत शिक्षण संस्था आजही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा आधार देत आहे. अशा थोर शिक्षणमहर्षीला आमचा मनाचा मुजरा…   

Scroll to Top