S R Dalvi (I) Foundation

”सम्राट अशोक” – भारतीय इतिहासातील एक महान व उदार शासक

“Emperor Ashoka” – A great and generous ruler in Indian history

येशू ख्रिस्त पूर्वीचा कालखंड हा भारतीय इतिहासातील प्राचीन इतिहास म्हणून ओळखला जातो, तत्कालीन शासन काळात मगध म्हणजेच पाटलीपुत्र एक प्रभावी व समृद्धशाली राज्य होते जिथे अनेक शूर राजांनी राज्य केले त्याच पाटलीपुत्र येथील मौर्य शासक अशोकच्या जीवनाविषयी आज आपण या लेखात माहिती घेणार आहे. एक चक्रवर्ती सम्राट ते अहिंसा, दया, शांती व उदात्त मानवी मुल्यांचा जोपासक अश्या महान राजाचा परिचय आज जाणून घेऊयात.

मौर्य शासन संस्थापक चंद्रगुप्त मौर्य यांचा नातू सम्राट अशोक ह्यांचा उल्लेख भारतीय इतिहासात केवळ महान राजा इतकाच नसून एक सर्वगुणसंपन्न, प्रजा हितकारी व भारतीय स्थापत्य कला विकसित करणारा राजा म्हणून होतो. सम्राट अशोकाची कीर्ती ही संपूर्ण भारतातच नव्हे तर श्रीलंका, नेपाळ व मध्य आशिया खंडापर्यंत दूरवर पसरली होती.

नंद शासकाला पदच्युत करून आचार्य चाणक्य ह्यांनी चंद्रगुप्त मौर्याला राजा बनविले. व इथूनच मौर्य शासनाचे पाटलीपुत्र येथे अधिराज्य निर्माण झाले, सम्राट अशोक ह्यांच्या काळात पाटलीपुत्र साम्राज्याचा विस्तार उत्तरेस हिंदुकुश पर्वत श्रेणी पासून दक्षिणेस गोदावरी नदीला व्यापून कर्नाटकातील म्हैसूर पर्यंत पसरले होते. ह्याव्यतिरिक्त पूर्वेस बंगाल प्रांतापासून पच्छिमेस अफगाणिस्तान पर्यंत दूरवर साम्राज्याचा विस्तार होता, सम्राट अशोकची कारकीर्द पाहता तत्कालीन इतिहासात पाटलीपुत्र हे इत्यादी कारणांनी क्षेत्रफळाच्या दृष्टीने एकछत्री राज्य होते.

सम्राट अशोक हे बिंदुसार ह्यांचे पुत्र व चंद्रगुप्त मौर्य ह्यांचे नातू होते. अशोकला इतरही सावत्र भाऊ होते ज्यामध्ये सुशीम, तिष्य इत्यादींचा इतिहासात दाखला मिळतो. ह्यांच्या आईचे नाव महाराणी धर्मा असे होते, बालपणापासून अशोक ह्यांच्यामध्ये साहसी वृत्ती, पराक्रम व शत्रू हन्ता (शत्रूचा समूळ नाश करणे )इत्यादी गुण स्पष्ट दिसून येत होते.

अशोक ह्यांना काही उपनाव सुध्दा होते ज्यामध्ये प्रियदर्शी व देवनावप्रिय इत्यादींचा समावेश होतो, सम्राट अशोक ह्यांचा जन्म ईसवी सन पूर्व ३०४ अशी ऐतेहासिक नोंद आहे, प्रत्यक्षात पाटलीपुत्र राज्याची सत्ता सूत्रे ईसवीसन पूर्व २६९ ते २३२ ह्या काळात अशोक ह्यांच्या कडे आल्याचा उल्लेख आहे. अवंती राज्यात उसळलेले बंड व दंगा रोखण्याचे कार्य वडिल बिंदुसार ह्यांनी पुत्र अशोकला सोपविले होते, त्यात आपले नेतृत्व कौशल्य व दूरदृष्टीचा परिचय देत अशोकने ते सहजरीत्या शांत केले ह्याच त्यांच्या कला गुणावर प्रभावित होवून त्यांना राज्य शासन सोपविण्याचा वडिलांनी निर्णय घेतला होता.

घोड्सवारी, तिरंदाजी, शिकार करणे ह्या व्यतिरिक्त तलवारबाजी व ईतर शस्त्र विद्येत अशोक निपुण होते. आचार्य चाणक्य ह्यांचा पूर्व आयुष्यात अशोक ह्यांना राज्य नीतिशास्त्र व व्यक्ती विकास शिक्षणात मोलाचा फायदा झाला, सम्राट अशोक ह्यांना राणी पद्मावती, तीश्यारक्षा, महाराणी देवी व करुवकी इत्यादी राण्या होत्या तसेच कुणाल, महेंद्र, संघमित्रा, जालूक, चारुमती, तीवाला इत्यादी संताने होती.

ईसवी सन पूर्व २६९ ते ईसवी सन पूर्व २३२ ह्या कालखंडात अशोक एक चक्रवर्ती सम्राट म्हणून नावलौकिकास आले. सावत्र भावांच्या अंतर कलहाला पूर्णपणे मोडून काढून व त्यांचा पराभव करीत पाटलीपुत्र शासन एकहाती अशोक ह्यांच्याकडे आले. भारतातील तामिळनाडू, केरळ पर्यंत तसेच विदेशी भूमी श्रीलंका पर्यंत साम्राज्य विस्तार करण्याची अशोक ह्यांची महत्वाकांक्षा होती ती पूर्णत्वास जावू शकली नाही.

अशोकच्या शासन काळात भारतात विज्ञान व तंत्रज्ञान ह्यासोबतच आरोग्य शास्त्रात खूप प्रगती झाली. त्याचबरोबर चोरी, लुट वगैरे सारख्या घटनांना कडक शासन मार्गाचा अवलंब अशोकने केला ह्या मुळे ह्या सर्व बाबींना आळा बसला, दानधर्म व यात्रा ह्यासारख्या बाबींना अशोकने मुक्तहस्ताने मदत केली तसेच धर्म व मानवतेच्या प्रसारासाठी यथाशक्ती मदत व सोय पुरविली.

कलिंग युध्द हे अशोकच्या आयुष्यातील एक निर्णायक व अभूतपूर्व बदल घडवणारी घटना म्हणून ओळखल्या जाते. तत्कालीन कलिंग (आजचे ओडिसा राज्यातील ठिकाण) व अशोक ह्यांच्या राज्यामध्ये ईसवी सन पूर्व २६१ साली एक मोठे युध्द झाले, सम्राट अशोक ह्यांच्या साम्राज्याच्या तुलनेत कलिंग फार छोटे व कमकुवत राज्य होते त्यामुळे ह्या युद्धात मोठ्या प्रमाणात नरसंहार झाला ह्यात जवळपास एक लाख मनुष्य हानी झाली ज्यात सर्वात जास्त सैन्य मारले गेले तसेच कलिंग येथील स्त्रिया, बालक ह्यांचा सुध्दा मृत्यचा आकडा मोठा होता.

सर्व दूर केवळ रक्त, आक्रोश व अस्ताव्यस्त मृत शरीरे असे भयाण व दृदय द्रावक दृष्य बघून सम्राट अशोकचे मन व्यथित झाले. एक आत्मग्लानी सारखी अवस्था झालेला अशोक राजा खचून जावून त्याने भविष्यात पुन्हा कधी युध्द व रक्तपात न करता शांती व अहिंसा मार्गाचा आजीवन अवलंब करण्याचा दृढ संकल्प केला.

अहिंसा,शांती व मानवता ह्या मूल्यांना आजीवन आपल्या जीवनांत स्थान देत अशोकने बुध्द धर्माचा स्वीकार केला. शिकार, पशुहत्या व जीवहत्या ह्याचा त्याने पूर्णपणे त्याग केला, धर्म व मानवसेवा ह्या करिता अनेक कार्य केले ज्यामध्ये गरिबांना दान, भोजन व शिक्षणासाठी विद्यालये स्थापन केले. दळणवळणासाठी रस्ते निर्माण केले तसेच वाटसरुना भोजन व पाणी पिण्याची सोय उपलब्ध केली.

बुध्द धर्माचा प्रसार करण्यासाठी अशोकने भारतभर व भारता बाहेर भ्रमण केले त्याने स्वतः व्यतिरिक्त आपल्या अपत्यांना सुध्दा श्रीलंका, नेपाळ, अफगाणिस्तान, मिस्त्र, युनान इत्यादी देशांत पाठविले व बौध्द धर्म प्रसारित करण्याचे कार्य केले. गौतम बुद्धाचे अवशेष सुरक्षित राखण्यासाठी अशोकने जवळपास ८४ हजार स्तुपांचे निर्माण केले, ह्याच बरोबर बौध्द धर्म सभेचे आयोजन सुध्दा आपल्या राज्यात केले व बौध्द भिक्कुना राहण्यासाठी मठ स्थापन केले.

अशोकने जवळपास २० हजार विश्व विद्यालये स्थापन करण्याची मुहूर्त मेढ रोवली तसेच ८४ हजार छोटे मोठे स्तूप बांधले ह्यामध्ये मध्य प्रदेशातील सांचीचा स्तूप व सारनाथ येतील शिलालेख स्तंभ विश्व प्रसिद्ध आहे. अशोकने अनेक शिलालेख कोरून घेतले व शिला स्तंभ उभारले ज्यामध्ये सारनाथ येथील त्रिमूर्ती शिला स्तंभ व अशोक चक्र आज भारतातील प्रमुख वास्तू म्हणून ओळखल्या जाते. भारतीय झेंड्यातील अशोक चक्र अशोक राजाच्या महान कारकिर्दीची साक्ष देते, त्यामुळेच ते आज भारताचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून ओळखल्या जाते.

अश्या महान राजाचा ईसवी सन पूर्व २३२ साली मृत्यू झाला. एक महान विचारक, धार्मिक,उदार व सहिष्णू राजा म्हणून अशोकच्या रूपाने भारतीय इतिहास गौरवशाली झाला. इतिहासात केवळ युध्द व हिंसा ह्याचाच समावेश नसतो तर एक तत्ववेत्ता राजा सुध्दा जन्म घेऊन गेला आहे ज्याने दया शांती अहिंसा ह्यांचा परम आदर्श जगाला दिला ह्याचे मूर्तिमंत उदाहरण आपल्याला अशोकच्या रूपाने पहायला मिळते.

Scroll to Top