S R Dalvi (I) Foundation

आनंददायी अभ्यासक्रम

Happiness syllabus

अलीकडच्या काळामध्ये गुणवत्तापूर्ण शाळेला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. जागतिक स्तरावरूनही शिक्षणामध्ये मोठ्याप्रमाणात अमुलाग्र बदल घडत आहेत. शाळेमध्ये वातावरण हे प्रसन्न असावे. विद्यार्थ्यांना शाळेत यावेसे वाटणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना शनिवारी तसेच रविवारीदेखील शाळेत यावेसे वाटले पाहिजे. मुलांना आनंददायी शिक्षणाचा अनुभव येत राहणे गरजेचे आहे. शिक्षकांनी पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन मुलांना शिकवणे गरजेचे आहे.

शिक्षणातून प्रामाणिक आणि जबाबदार मानव तयार करण्याची काम शिक्षण व्यवस्थेस करावे लागणार आहे. Happiness Curriculum हे या दिशेने पहिले पाऊल आहे. त्यामाध्यमातून आपण शिक्षण व्यवस्थेला सर्वांगीण सक्षम बनवू शकू, मानवतेचा विकास करू शकू असे शासनास वाटते. संकोच न करता विद्यार्थी न घाबरता प्रश्न विचारण्यास उत्सुक असली पहिजेत. राज्यातील सर्व मुलांना शिक्षणातून आनंदही मिळाला पाहिजे.

सध्याच्या काळात लहान वयातही विद्यार्थ्यांना ताण तणाव, उदासीनता, नैराश्य या मानसिक विकारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अनेक हिंसात्मक घटना, आत्महत्येचे प्रसंग अवतीभवती घडताना दिसतात. तसेच कोरोना संकटामुळे सुद्धा गेल्या काही वर्षात मानसिक स्वास्थ्य टिकविणे हे विद्यार्थ्यांपुढे मोठे आव्हान आहे. विविध शिक्षण समित्या व आयोग यांनी शिक्षणातून शांतता, सौहार्द आणि सुसंवाद या मूल्यांच्या विकासावर भर दिला आहे. शिवाय तर्कसंगत विचार आणि कार्य करण्यासाठी सक्षम असणाऱ्या तसेच करुणा, सहानुभूती, साहस, लवचिकता, वैज्ञानिक चिंतन, रचनात्मक कल्पनाशक्ती, नैतिक मूल्य असणाऱ्या उत्तम मनुष्यत्वाचा विकास हा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा महत्त्वाचा उद्देश आहे. सहानुभूती, इतरांसाठी सन्मानाची भावना, स्वच्छता, शिष्टाचार, सेवाभाव, समानता, न्याय, सामाजिक कर्तव्य व जबाबदाऱ्या यांची जाणीव यासारखी नैतिक, मानवी, संवैधानिक मूल्य रुजवणे या बाबींवर सुद्धा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भर देण्यात आला आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर शालेय स्तरावर आनंददायी कृतींचा समावेश असण्याची गरज प्रकर्षाने जाणवते. सध्या “Happiness Curriculum” ही संकल्पना जगातील अनेक देशांनी स्वीकारलेली आहे. तसेच राज्यातील पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये मागील शैक्षणिक वर्षापासून आनंददायी शिक्षण कार्यक्रम कार्यान्वित करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून आनंददायी शिक्षण कार्यक्रम कार्यान्वित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये सजगता, कथा, कृती, अभिव्यक्ती या बाबींचा विचार करण्यात आलेला आहे. सदर आनंददायी शिक्षण कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढून अध्ययनाविषयी त्यांची रुची वाढल्याचे निदर्शनास येत आहे. सदर आनंददायी कृती महाराष्ट्र राज्यात इयत्ता १ ली ते ८ वी या इयत्तांमधील विद्यार्थ्यांसाठी राबविल्यास त्यांच्यामध्ये शिक्षणाविषयी अभिरुची वाढीस लागेल, तसेच विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य जपले जाऊन त्यांचें अध्ययन अधिक सुकर होईल. शिक्षण ही सुलभ व आनंददायी प्रक्रिया असावी यासाठी राज्य शासनाने अशा प्रकारच्या शिक्षण शाळेतून मुलांना मिळाले पाहिजे यासाठी मानवतावादी मूल्ये आणि सामाजिक आधार असलेला व वैज्ञानिकदृष्ट्या डिझाइन केलेला Happiness Curriculum प्राथमिक शिक्षणाच्या स्तरावर बणविण्यात आला आहे. यानुसार राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व खाजगी अनुदानित संस्थांच्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी Happiness Curriculum अर्थात आनंददायी अभ्यासक्रमाचा समावेश करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्तन व जबाबदारी बाबत जागरूकता निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी, सहकार्य वृत्ती, नेतृत्व गुणांचा विकास व्हावा, या हेतूने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व खाजगी अनुदानित संस्थांच्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ पासून इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी शालेय परिपाठात Happiness Curriculum अर्थात आनंददायी अभ्यासक्रमाचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांनी स्वतःमधील आनंदाला समजणे, तो अनुभवणे व तो आनंद मिळवता येणे यासाठी या पाठ्यक्रमात पुढील चार घटकांचा समावेश करण्यात आला आहे.

१. सजगता
२. कथा (गोष्ट)
३. कृती
४. अभिव्यक्ती
५. छंद
प्रत्येक दिवशी दिलेल्या साप्ताहिक नियोजनानुसार शालेय परिपाठानंतरच्या पहिल्या तासिकेला आनंददायी कृती सर्वसाधारण ३५ मिनिटांच्या असतील. शालेय स्तरावर दररोजच्या प्रति तासिकेमधून ५ मिनिटांचा कालावधी कमी करून सदर ३५ मिनिटांचा कालावधी शालेय परिपाठानंतरच्या पहिल्या तासिकेतील आनंददायी कृतीसाठी उपलब्ध करून घेता येईल. या आनंददायी कृतींची सुरुवात माईंडफुलनेस कृतींनी म्हणजेच वर्तमानात सतर्क व सचेत राहण्याच्या कृतींनी करावयाची आहे.
आनंददायी कृतींची सुरूवात दोन ते तीन मिनिटे चेक इन म्हणजे श्वासावर लक्ष देण्याची कृती करून केली जावी व आनंददायी कृतींची समाप्ती दोन ते तीन मिनिटे चेक आऊट म्हणजे विद्यार्थ्यांनी डोळे मिटून शांत बसून तासिकेच्या निष्कर्षावर चिंतन करणे या कृतीने केली जावी. चेक इन व चेक आऊट या कृती दररोज करणे अपेक्षित आहे.

शिक्षकांनी शालेय परिपाठामध्ये घ्यावयाच्या विविध आनंददायी कृतींचे कालावधी, उद्देश, कृतीचे टप्पे, चर्चेसाठी प्रश्न या क्रमाने व निकषानुसार लेखन करावे.
शिक्षकांनी सदर लेखन करत असताना इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा वयोगट, समज, भाषिक समृद्धी, परिसर ज्ञान याचा विचार करून सजगता, कथा, कृती व अभिव्यक्ती या घटकांचे विस्तारित स्वरूपात लेखन करावे. प्रत्येक इयत्तेसाठी स्वतंत्र, आनंददायी प्रेरक उपक्रमांचा समावेश करावा.
सदर अभ्यासक्रमाचे कोणतेही औपचारिक लेखी मूल्यमापन केले जाणार नाही. त्यासाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. तसेच सदर अभ्यासक्रमासाठी कोणतेही गुणदान असणार नाही. विद्यार्थी किती आनंदी राहतो, किती आनंदाने, उत्साहाने अभ्यास करतो, आनंददायी कृतीमध्ये कसा सहभागी होतो यावरून अनौपचारिकरित्या त्याचे मूल्यांकन केले जाणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचा अध्ययनाचा प्रवास हा सर्वार्थाने वेगळा असतो हे तत्त्व येथे विचारात घेतले जाणार आहे.

Scroll to Top