Home psychotherapy for children to develop good habits
‘जग ही एक रंगभूमी आहे’, या शेक्सपियरच्या प्रसिद्ध वाक्याच्या संदर्भात एक मानसशास्त्रज्ञ म्हणतो, ‘‘घर ही एक प्राथमिक रंगभूमी आहे. तिथे कुठली भूमिका कशी करायची, ते मुले शिकतात.’’ घरातील वातावरण आणि माणसे, विशेषतः मुलाचे आई-वडीलच त्याचे मानसिक आरोग्य घडवण्यास मुख्यतः कारणीभूत असतात. एक मानसोपचार तज्ञ म्हणतात, ‘‘मुलांच्या समस्या, म्हणजेच समस्यायुक्त आई-वडील !’’ अशा वेळी मुलाच्या आई-वडिलांनाच मानसोपचाराची अधिक आवश्यकता असते. आई-वडील आणि घरातील इतर मोठी मंडळी यांची चुकीची विचारसरणी अन् वागणूक, तसेच चुकीच्या भावना यांचा परिणाम मुलाच्या मनावर कळत-नकळत सतत होत असतो. मुलावर मानसोपचार करायची पाळी येऊ नये; म्हणून प्रतिबंधक उपाय या दृष्टीने आई-वडिलांचे व्यक्तीमत्त्व चांगले असणे महत्त्वाचे असते. मुलांशी नेहमी वागतांना, तसेच मुलांच्या घरगुती मानसोपचाराच्या दृष्टीने काही नियम पाळणे आवश्यक असते.
मुलांना प्रेम आणि आधार यांची आवश्यकता असणे
मुलाच्या मनात ‘आई-वडिलांचे आपल्यावर पुष्कळ प्रेम आहे, त्यांना आपण हवे आहोत आणि त्यांचा आपल्याला आधार आहे’, अशा प्रकारच्या भावना निर्माण होतील, असे वर्तन आई-वडिलांनी ठेवले पाहिजे, उदा. अधून मधून त्याला जवळ घेणे, त्याला एकटे ठेवून फार वेळ घराबाहेर न रहाणे इत्यादी गोष्टी केल्या पाहिजेत. एकापेक्षा अधिक मुले असल्यास ‘डावे-उजवे’ असे मुळीच करू नये. दोन मुलांत ३ वर्षांपेक्षा अल्प अंतर असेल, तर मोठ्या मुलाकडे थोडेसे अधिक लक्ष द्यावे.
आई-वडिलांनी मुलांसमोर भांडल्यास त्यांना निराधार वाटणे
आई-वडिलांनी मुलांसमोर भांडू नये. लहान मुलांना ‘घरातील तंत्र बिघडले आहे’, याची लगेचच जाणीव होते आणि त्यांच्या मनात ‘आई-वडिलांचा आपल्याला आधार मिळेल कि नाही’, अशी शंका निर्माण होते.
पालकांनो, मुलांना शिस्त लावण्यासह वेळीप्रसंगी शिक्षाही करणे आवश्यक !
मुलांना प्रेमासह शिस्तही लावली पाहिजे; पण शिस्तीचा विपर्यास होऊ देऊ नये. विपर्यास झाला की, समस्या निर्माण झाल्याच, असे समजा.
चुकीची जाणीव होण्यासाठी तात्काळ शिक्षा करणे आवश्यक :
मुलांच्या हातून चुकीच्या कृती घडत असतांना त्यांना त्याची जाणीव तात्काळ करून देऊन शिक्षाही करायला हवी. त्या वेळी आईने ‘थांब, संध्याकाळी बाबा घरी आल्यावर त्यांना तुझे नाव सांगते’, असे म्हणून उपयोगी नाही. बाबा घरी आल्यावर त्यांनी विलंबाने दिलेल्या शिक्षेमुळे ‘चूक म्हणजे शिक्षा’, असे समीकरण त्याच्या मनात निर्माण होत नाही आणि ते मूल तीच चूक पुनःपुन्हा करत रहाते.
शिक्षेमध्ये सातत्यही असावे :
एखाद्या वेळी चुकीसंदर्भात शिक्षा करणे, तर दुसर्या वेळी चुकीकडे दुर्लक्ष करणे, असे करू नये.
शिक्षेमध्ये मतभेद नकोत :
शिक्षेचे स्वरूप आणि ती द्यावी कि नाही, याविषयी आई-वडील अन् घरातील इतर मोठी मंडळी यांच्यामध्ये मतभेद असले, तरी एकजण शिक्षा करत असतांना इतरांनी मध्ये पडू नये. जे मतभेद असतील, ते मुलांच्या अपरोक्ष चर्चा करून सोडवावेत, अन्यथा हे मतभेद ऐकून योग्य आणि अयोग्य काय, याचा मुलांच्या मनात गोंधळ उडतो.