S R Dalvi (I) Foundation

तुम्ही प्लास्टिक किंवा कागदाचा स्ट्रॉ वापरत असाल, तर आधी हे वाचा..

If you use plastic or paper straws, read this first..

प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर करू नये, यासाठी जगभरात अनेक मोहिमा सुरू झाल्या आहेत.

प्लॅस्टिक हा पर्यावरणासाठी अभिशाप आहे, तो केवळ आपल्या सभोवतालचेच नाही तर दुर्गम प्रदेश, पर्वत, नद्या आणि समुद्र यांचंही प्रचंड नुकसान करत आहे.

द सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, 2040 पर्यंत जगभरात सुमारे 1.3 अब्ज टन प्लास्टिक जमा होईल. एकट्या भारतात दरवर्षी 33 लाख टनांपेक्षा जास्त प्लास्टिकचं उत्पादन होतं.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) आणि प्रॅक्सिस ग्लोबल अलायन्स यांच्या सहकार्यानं तयार केलेल्या अहवालानुसार, भारतात दरवर्षी सुमारे 3.4 दशलक्ष टन म्हणजेच 340 कोटी किलो प्लास्टिक कचरा निर्माण होतो आणि त्यातील फक्त तीस टक्के रिसायकल (पुनर्वापर) केला जातो.

या अहवालानुसार गेल्या पाच वर्षांत देशात प्लास्टिकचा वापर झपाट्यानं वाढला आहे.

मानवाचं प्लास्टिकवरील अवलंबित्व इतकं वाढलं आहे की पृथ्वीवर या पांढऱ्या प्रदूषणाचे ढीग साचत आहेत.

सिंगल यूज प्लास्टिक 300 वर्षे पर्यावरणात राहतं
एका अंदाजानुसार, अमेरिकेत दररोज वापरल्या जाणार्‍या ड्रिंकिंग स्ट्रॉची संख्या 500 दशलक्ष आहे.

मात्र या आकड्याच्या वैधतेवर वाद सुरू असून प्रत्यक्ष आकडा त्या आकड्याच्या निम्मा असू शकतो. पण हे अगदी खरं आहे की, गेल्या दोन दशकांपासून डिस्पोजेबल ड्रिंकिंग स्ट्रॉ म्हणजे पाणी पिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सिंगल युज स्ट्रॉवर खर्च होत असलेल्या रकमेत दरवर्षी वाढ होत आहे.

यातील बहुतेक स्ट्रॉ वापरानंतर कचऱ्यात फेकल्या जातात, ज्यामुळे आपले पर्यावरण प्रदूषित होतं. सिंगल युज प्लास्टिकचं वातावरणात पूर्णपणे विघटन होण्यासाठी 300 वर्षे लागतात.

सिंगल यूज प्लास्टिक स्ट्रॉची संख्या इतकी वाढली आहे की, सिंगल यूज प्लास्टिकच्या विरोधात जगभरात मोठ्या प्रमाणावर मोहीम चालवली जात आहे.

भारतात सिंगल यूज प्लास्टिक उत्पादनांच्या विरोधात मोहीम सुरू झाली असताना, जगभरातील लाखो लोक अशा मोहिमेशी जोडलेले आहेत, जे प्लास्टिकच्या वापरास विरोध करतात आणि त्यापैकी एक म्हणजे प्लास्टिकच्या स्ट्र्रॉला विरोध.

प्लास्टिक स्ट्रॉला झालेल्या विरोधाचे श्रेय माइलो क्रुसो यांना देता येईल. वयाच्या नऊव्या वर्षी त्यांनी ‘बी स्ट्रॉ फ्री’ मोहीम सुरू केली, ज्यामुळे स्टारबक्स आणि मॅकडोनाल्ड सारख्या कंपन्यांनी प्लास्टिक स्ट्रॉ वापरणं पूर्णपणे बंद केलं.

सिंगल यूज प्लास्टिकच्या विरोधामुळे हल्ली बाजारात कागद, धातू, काच आणि वनस्पतींवर आधारित स्ट्रॉ मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत, पण यापैकी एका स्ट्रॉची निवड करणं इतकं सोपं आहे का ? आणि त्याच्यामुळे खरोखर पर्यावरणाला हानी पोहचत नाही का?

संशोधन काय सांगत?
अलीकडील संशोधनानं कागदाच्या स्ट्रॉ संबंधित आणखी एका पैलूकडे लक्ष वेधलं आहे.

बेल्जियममधील अँटवर्प विद्यापीठातील संशोधकांनी कागदापासून बनवलेल्या स्ट्रॉवर हे संशोधन केलं आणि त्यात प्लास्टिकपेक्षा जास्त पॉलीफ्लोरो एल्किल पदार्थ म्हणजे पीएफएएस असल्याचं आढळलं.

पीएफएएस किंवा पॉलीफ्लोरो एल्किल हे असे पदार्थ आहेत जे लवकर तुटत नाहीत आणि आपल्या वातावरणात, पावसाचं पाणी आणि मातीमध्ये दीर्घकाळ टिकून राहू शकतात. म्हणूनच त्यांना ‘फॉरएवर केमिकल’ देखील म्हणतात.

पीएफएएस वातावरणात अनेक दशकं टिकून राहू शकतं आणि दूषित पाण्यासह मानवांमध्ये अनेक आरोग्य समस्या निर्माण करू शकतं.

भारतात निर्माण होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्यापैकी 43 टक्के सिंगल-यूज प्लास्टिक कचरा आहे. हे लक्षात घेऊन, भारत सरकारनं जुलै 2022 पासून भारतात सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घातली आहे.

स्ट्रॉ, गुटखा, शाम्पू पाऊच, पिशव्या, लहान बाटल्या, प्लास्टिकचे ग्लास आणि कटलरीच्या अनेक लहान वस्तू इत्यादींबरोबरच प्लास्टिकच्या वस्तूंचा पुनर्वापर होत नाही आणि प्लास्टिक प्रदूषणाचं ते एक प्रमुख कारण आहे.

जर आपण अशा गोष्टी वापरल्या नाहीत आणि त्या बाजारातून विकत घेतल्या नाहीत तर त्याचे फायदे आपल्याला नक्कीच दिसतील. त्यामुळे याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे.

भारत दरवर्षी मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा निर्माण करतो, पण रिसायकल केलेल्या प्लास्टिक कचऱ्याचा योग्य वापर करण्यात तो जगभरातील देशांपेक्षा पुढे आहे.

त्याची सुरुवात 2000 साली झाली, जेव्हा प्लास्टिक केबल म्हणजेच प्लास्टिक आणि कोलतार याचा भारतातील रस्ते बांधकाम तंत्रज्ञानामध्ये वापर होऊ लागला. दिल्ली ते मेरठ या रस्त्यावर प्लास्टिक केबलचा वापर करण्यात आला आहे. अशा अनेक छोटया-छोट्या उपाययोजनांमुळे प्लास्टिक कचऱ्याचं व्यवस्थापन करण्यासाठी योग्य पावलं उचलता येतील.

Scroll to Top