S R Dalvi (I) Foundation

कारगिल विजय दिवस

Kargil Victory Day

“ए मेरे वतन के लोगो ….” हे गाणं रेडिओवर जरी ऐकलं तरी आपले डोळे पाणावल्या शिवाय राहात नाही. २६ जुलै १९९९ हा दिवस सर्व भारतीयांसाठी अविस्मरणीय व अभिमानास्पद आहे. कारण, याच दिवशी भारताने कारगिल युद्धात पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली.  कारगिल युद्ध हे भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान सन १९९९ मध्ये लढले गेलेले युद्ध होते, सन १९९९ च्या उन्हाळ्यात, पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठाणी कब्जा केल्याचे भारताच्या लक्षात आले व या घुसखोरांना हुसकावण्यासाठी कारगिलचे युद्ध सुरू झाले.

हे युद्ध आधुनिक इतिहासातील अतिउंचीवरच्या युद्धाचे अत्युत्‍कृष्ट उदाहरण आहे. यात युद्धाला लागणारी सामग्री व मनुष्यबळ ने-आण करण्याचा चांगलाच अनुभव भारतीय सैन्याला मिळाला.सर्व जगाचे लक्ष या युद्धाकडे लागले होते. परंतु भारताने हे युद्ध कारगिल पुरतेच मर्यादित ठेवले. त्यामुळे दाखवलेल्या संयमाबद्दल भारताचे जगभर कौतुक झाले. राष्ट्रीय महामार्ग लेह ते श्रीनगर या रस्त्यावर कारगिल वसलेले आहे. हिमालयाच्या इतर भागाप्रमाणे, कारगिलमध्ये थंड वातावरण असते. उन्हाळा हा सौम्य तर हिवाळा अतिशय दीर्घ व कडक असतो व बऱ्याचदा तापमान मायनस ४० पर्यंतही उतरू शकते. कारगिलचे युद्ध होण्याचे प्रमुख कारण हा रस्ता हे होय. घुसखोरांनी पाकव्याप्त काश्मीरच्या जवळच्या आणि रस्त्याला समांतर अशा १६० किलोमीटरच्या पट्यातच साधारणपणे घुसखोरी केली. लष्कराच्या अनेक चौक्या या भागात आहेत. त्यातील काही चौक्या समुद्रसपाटीपासून ५ हजार मीटरपेक्षाही अधिक उंचावर आहेत. नुसतेच कारगिल नव्हे तर आग्नेयेकडील द्रास व नैर्ऋत्येकडील मश्को खोऱ्यातील, तसेच बटालिक विभागातील चौक्यांवरही घुसखोरी झाली.

अतिउंचावरील चौक्यांवर कडक हिवाळ्याच्या महिन्यांत सैन्य तैनात करून ठेवणे अतिशय अवघड असल्याने, हिवाळ्यापूर्वी दोन्ही बाजूने सैन्याची माघार व्हावी आणि उन्हाळ्यात बर्फ वितळल्यावर व हवामान मानवी रहाण्यास स्थिर झाल्यानंतर, ते ते सैन्य आपापल्या चौक्यांमध्ये परतावे, असा अलिखित समझौता भारत-पाकिस्तानमध्ये, कारगिल युद्धाच्या आधी पर्यंत होता. मात्र १९९९ साली भारतीय सैन्य भारतीय चौक्यांवर परतण्यापूर्वीच पाकिस्तानी घुसखोरांनी ऐन हिवाळ्यात चौक्यांचा ताबा घेतला. त्यामुळे, कारगिलचे युद्ध भडकण्यास ठिणगी पडली. सन १९९९ च्या उन्हाळ्यात, पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठाणी कब्जा केल्याचे भारताच्या लक्षात आले व या घुसखोरांना हुसकावण्यासाठी कारगिलचे युद्ध सुरू झाले.
या युद्धानंतर भारताने आपल्या संरक्षण खर्चात अनेक पटीने वाढ केली. तर पाकिस्तानात राजकीय अस्थिरता माजली. परिणामी, काही महिन्यांतच (ऑक्टोबर, १९९९मध्ये) पाकिस्तानात जनरल परवेझ मुशर्रफ यांनी नवाझ शरीफ यांचे सरकार उलथून लष्करशाही लागू केली. कारगिल युद्ध भारताने जिंकले .

कारगिल युद्धातील विजय साजरा करण्यासाठी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. दरवर्षी कारगिल विजय दिवशी भारतीय पंतप्रधान अमर जवान ज्योती जवळ शहिद जवानांना श्रद्धांजली वाहतात. सगळीकडे देशभक्तीचे वातावरण असते. विविध प्रकारचे कार्यक्रम, प्रभातफेऱ्यांचे आयोजन केले जाते. या दिवशी सर्व जनतेकडून भारतीय सैन्याचे अभिवादन केले जाते.

तुम भूल न जाओ उनको इस लिये कही ये कहानी

जो शहीद हुए हैं उनकी ज़रा याद करो क़ुरबानी…

Scroll to Top