S R Dalvi (I) Foundation

आपल्या ‘ मायमराठीची काळजी घेऊयात ‘

Let’s take care of our ‘Maymarathi’

विविध भाषांचे ज्ञान जरूर घ्या परंतु आपल्या मायबोली मराठीला विसरू नका. समृद्ध मराठीची परंपरा आणि मराठीच्या भवितव्याची चिंता करणे खरेच योग्य आहे काय? मराठी भाषेचे काय होणार, याविषयी काळजी करण्यापेक्षा नव्या पिढीला आणि लहान मुलांना तिची गोडी कशी लागेल, याची जाणीव होण्याची आता वेळ आली आहे. मराठी भाषेविषयी दोन विभिन्न मतप्रवाह अनुभवायला मिळतात. पहिला प्रवाह मराठीच्या भवितव्याविषयी शंका व्यक्त करणारा, तर दुसरा मतप्रवाह बोलण्यातून, वागण्यातून, आविष्कारातून मराठी भाषेची आणि संस्कृतीची पाळेमुळे भक्कम करणारा आणि मराठीच्या भवितव्याविषयी साशंकता न बाळगणारा आहे.

मुलांना शाळेत टाकताना पालकांना नेहमी हे प्रश्न पडतात की माध्यम कोणते असावे ? शाळा कुठली निवडावी? खर्च किती ये‌ईल? एक ना अनेक प्रश्न. शाळा कोणतीही निवडा, परंतू माध्यम मातृभाषा मराठीच असले पाहिजे. “आपल्या पाल्यांना मायमराठी पासून तोडू नका”. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यामुळे पाल्यांचा मानसिक,बौद्धिक,सामाजिक आणि भावनिक विकास होतो, त्यातूनच निरोगी समाज निर्माण होतो. शिवाय असे आनंददायी शिक्षण घेतलेले पाल्य पुढे जगातील कुठल्याही परकिय भाषेवर सहज प्रभूत्व मिळ‌ऊ शकतात.

मराठी हा आपला समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे. वारसा अमूल्य असतो. त्याची उपयुक्तता सिद्ध करण्याची आवश्यकता नसते. भाषा संस्कृतीचे माध्यम असते. एखाध्या भाषेचा र्‍हास म्हणजे संस्कृतीच्या महत्वपूर्ण अंगाचा लोप. मराठी संस्कृतीवर मराठीच्या र्‍हासाचा विपरित परिणाम हो‌ईल. तो परिणाम टाळण्यासाठी मराठीविषयी आस्था असणे ही एक सामाजिक गरज आहे. रोज प्रचंड वेगाने बदलणार्‍या परिस्थितीशी जुळवून घेताना आपल्या पाल्याने त्याची आर्थिक प्रगती,त्याच्या भावना आणि विचारांना इंग्रजीतूनच वाट करुन ध्यावी हा आग्रह घातक नाही का ? इंग्रजीच्या अट्टहासापायी भावी पिढ्यांना ज्ञानभाषा नाही म्हणून मातृभाषा नसेल अशी लाजिरवाणी, केविलवाणी परिस्थिती पुढे उदभवेल.

मातृभाषा असणे ही गोष्ट बालकाला माता असण्या‌इतकेच महत्वाचे असते. कारण, अति आनंदाचे,अति दु:खाचे प्रत्येक हुंकार मातृभाषेतुनच व्यक्त होतात. मग इंग्रजीतुन शिकले की आपला उद्धार आपो‌आपच हो‌ईल असे दिवास्वप्न आपण आपल्या पाल्यांना का दाखवत आहोत? आधीच आपण आपल्या संस्कृत आजीला गमा‌ऊन बसलो आहोत, उद्या मायमराठीलाही आम्ही पोरके हो‌ऊ. जगातील सर्व प्रगत राष्ट्रांत मातृभाषा हेच शिक्षणाचे माध्यम असताना आम्हीच गुलामगिरीचे प्रतिक असणार्‍या परकीय भाषा इंग्रजीचाच का आग्रह धरत आहोत? सातासमुद्रापार ये‌ऊन इंग्रजांनी त्यांच्या स्वार्थासाठी आपल्या देशात त्यांची इंग्रजी भाषा, त्यासाठी त्यांचे इंग्रजी संस्कार(की कुसंस्कार ?) सर्व अडचणींवर मात करुन आपल्यावर लादले,रुजवले आहेत का याचा विचार करावा.

या मानसिक गुलामगिरीतुन आपण बाहेर कधी येणार? आज आपल्याच देशात आपल्याच मातृभाषेतुन शिक्षण घेण्यास,सर्व दैनंदिन व्यवहार करण्यास अडचणींचा बा‌ऊ का केला जातो आहे? हे पराभूत मनोवृत्तीच्या स्वाभीमानशून्य समाजाचे लक्षण आहे. परकीय भाषेच्या कुबडया वापरुन व विदेशी विकृतींचे अनुकरण करुन कुठलाही देश प्रगती करु शकत नाही. स्वाभीमानाने ताठ उभा राहु शकत नाही. स्वदेशी सभ्येतेची कास धरुन या मानसिक गुलामगिरीतुन देश ज्या दिवशी बाहेर ये‌ईल तो आपला खरा मुक्तीदिन असेल.

‘खरे तर नव्या युगाची आव्हाने पेलण्याचे सामर्थ्य मराठीच्या हाती आहे. पण तिच्या सामर्थ्यांविषयी साशंक असणारी आम्ही तिची अपत्ये मात्र दुबळी आहोत’, हे १९८९ च्या जागतिक मराठी परिषदेतील कुसुमाग्रजांचे वाक्‍य आज ठळकपणे आठवते. म्हणून मराठीचा ऱ्हास होतो आहे, असे नुसते म्हणण्यापेक्षा ‘जाणीव आणि कृती’ या दोन्ही पातळीवर मराठीच्या वैभवात, अस्तित्वात आणि लौकिकात मी काय भर घालू शकतो, याचा आता अंतर्मुख होऊन विचार करावा लागेल.

Scroll to Top