S R Dalvi (I) Foundation

आयुष्य आनंदाने भरभरुन जगावे..

Live a life full of happiness…

“आता मला अजून जगावंसं नाही वाटत डॉक्टर, 87 वर्षांची झाले मी अजून आयुष्य नको मला, किती त्रास द्यायचा सगळ्यांना ” आजी, पण तुमच्या घरची माणसं सगळी चांगली आहेत, खूप काळजी घेतात तुमची.. नाहीतर बरेच लोक म्हातारया लोकांची काळजीचं घेणं बंद करतात त्यांना आश्रमात ठेवतात.. तुमच्या घरच्यांसाठी तरी असं म्हणू नका ” डॉक्टरांनी आजींना समजावलं ” ते बाकी खरंय, पण करायच काय एवढ्या आयुष्याचं ” आजी म्हणाल्या.
संध्याकाळी शेजारच्या बेड वर एक नविन पेशंट आला.. पोरगेलासा.. अगदी 22 23 वर्षाचा असेल.. आजींचे लक्ष जाताच त्यांच्याकडे बघुन हसला.. आजी नुसत्या बघत राहिल्या..

सकाळी कोणतेतरी गाणे गुणगुणत होता तो.. आजींचे लक्ष गेले तसा तो थांबला.. ” किती दिवस झाले? नविन दिसत्ये ही आजी ” त्याने विचारले ” हो, कालच ऐडमिट झाली आहे..” आजी म्हणाल्या ” मी परमनंट मेंबर आहे इथला बरं का, काही लागलं तर मला सांगायचं, इकडे सगळे ओळखतात आपल्याला ” तो हसत म्हणाला.. त्याची धीटाई बघुन आजींना पण हसू आले..

दुपारी आजींना आठवले तसे त्यानी त्या मुलाला विचारले ” सकाळी काय गुणगुणत होतास ? त्यानी त्या मुलाला विचारलं ” मुलगा हसला, म्हणाला ” त्याला रॅप म्हणतात आजे.. एक नंबर बनवतो आपण.. कोणत्या पण सब्जेक्ट वर.. तू तुझा आवडता सब्जेक्ट सांग.. मी तुला रॅप बनवून दाखवतो ” आजी हसल्या म्हणल्या ” माझा आवडता सब्जेक्ट म्हणजे माझा कृष्ण , त्याच्यावर करशील तुझा रॅप? ” “थोडा अवघड विषय दिला आहेस पण जमेल.. थांब जरा” असं म्हणत त्याने थोड्या वेळात खरचं कृष्णावर रॅप म्हणून दाखवला..गाण्याचा ठेक्याचा थोड्या वेगळ्या प्रकार ऐकुन आजींना मजा वाटली..

रोज त्याच्याशी बोलण्यात वेळ जाऊ लागला.. सतत काही ना काही बोलत असायचा.. बुधवार आला तसं आजींचा मुलगा आणी सुन हॉस्पिटल मधेच केक घेउन आले छोटासा.. त्यालाही दिला तसं तो म्हणाला ” एवढी म्हातारी नाही गं तू आजी.. ” ” झाले तर आहे खरी एवढी म्हातारी, काय करु आता सांग.. आता काय येईल तो दिवस पुढे ढकलायचा ” आजी थोड्या नाराजीनेच म्हणाल्या.

ना निरखत तो म्हणाला ” आजे, तुला देऊ का एक काम मग?”हसू आवरत आजींनी विचारलं ” कसलं काम रे, झेपणारं दे बाबा ह्या वयात.” तसं तो म्हणाला ” काळजी करु नको आजे, तुला जमेल मस्त.. फक्त तू मनावर घ्यायला पाहिजे” तो म्हणाला.. ” बघ आजे, मी काही दिवस आहे फक्त.. तुझ्यासारखं म्हातारं व्हायचं होतं मला पण तो तुझा कृष्ण तिकडेच बोलावतोय.. माझ्यासारखे किती असतील.. एवढं मोठं आणि छान आयुष्य मिळलंय तुला.. अस जेव्हा तुला वाटेल ना ,की फार आयुष्य आहे, तेव्हा आम्हाला आठव आणी आमच्यासारख्यांच आयुष्य पण तुच जग .. एकदम रापचिक स्टाइल ने.. आपल्या रॅप सारखं ” आजी त्याच्याकडे बघतच राहिल्या

दूसरया दिवशी आजीना डिस्चार्ज मिळाला.. तेव्हा शेजारचा बेड मोकळा होता.. आजी काय समजायचं ते समजल्या..
घरी आल्यावर आजींमधे खुप बदल झाला.. घरी एका खोलीत असणारया आजी आता सगळ्यांमधे मिसळत होत्या.. काहीबाही पदार्थ करत होत्या.. त्यांची आवडती पेटी माळ्यावरुन खाली आली होती.. घरातल्या सर्वांना फार फार बरे वाटत होते..
आजी आता भरभरुन जगण्याचा आनंद घेत होत्या.. ज्यांना तो मिळाला नाही त्यांच्यासाठी.. आणी.. त्याच्यासाठीही…

Scroll to Top