S R Dalvi (I) Foundation

अरे सागरा भीम माझा येथे निजला शांत हो जरा ||
महामानवास अभिवादन

Mahamanvas Abhivadan….

चैत्यभूमीला 5 डिसेंबरच्या रात्री 12 वाजता महामानवाच्या चरणी अभिवादनास उसळलेला जलसागर तेथे लोटलेल्या जनसागरास ओहोटीने आपला किनारा खाली करीत म्हणतो,

गेला सोडून आम्हा पिता भीमराज
कल्याणकर्ता अमुचा राहिला ना आज
सोडूनी तो दुःखहर्ता आजला ह्या लेकरा
अरे सागरा… भीम माझा येथे निजला शांत हो जरा||

प्रत्येक वर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमी परिसरात लाखोंच्या संख्येत भारताच्या कानाकोपऱ्यातुन लोकं येतात. धमनिरपेक्ष लोकशाहीचा दीपस्तंभ चैत्यभूमीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले असते . ऊन, वारा, पाऊस, थंडीची तमा न बाळगता लहान मुलाबाळांसह लाखो लोक चैत्यभूमीवर रांगा लावून आपल्या उध्दारकर्त्या परमपूज्य बाबासाहेबांचे दर्शन घेत असतात.

डॉ. बी.आर. आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर या नावाने प्रसिद्ध होते आणि सर्वांना माहीत आहे की ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते. ते एक अतिशय प्रसिद्ध राजकीय नेते, प्रख्यात कायदेतज्ज्ञ, बौद्ध कार्यकर्ते, तत्त्वज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासकार, वक्ते, लेखक, अर्थशास्त्रज्ञ, विद्वान आणि संपादक होते. डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यतेसारख्या सामाजिक दुष्कृत्यांचे उच्चाटन करण्यासाठी आणि दलित आणि इतर सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीयांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढा दिला. जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळात भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणून डॉ. आंबेडकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. 1990 मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक वर्षे बौद्ध धर्माचा अभ्यास केला. त्यांनी त्यांच्या अनेक अनुयायांसह 1956 मध्ये बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांच्या महान विचार आणि कार्यामुळे त्यांची पुण्यतिथी ‘महापरिनिर्वाण दिन’ म्हणून साजरी केली जाते. भारतीय समाजातील जातिव्यवस्थेतील त्रुटी समोर आणून आंबेडकरांनी दलित, अस्पृश्यांचे समर्थन केले. त्यांनी बौद्ध धर्माचा अभ्यास केला आणि त्यांच्या शिकवणीचा समाजात विविध मार्गांनी प्रसार केला. यासोबतच मागासलेल्यांना शिक्षणाचा हक्क त्यांनी मिळवून दिला.

मूकनायक हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इ.स. १९२० साली समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी सुरू केलेले मराठी भाषेतील एक पाक्षिक होते. या वृत्तपत्राचा पहिला अंक ३१ जानेवारी १९२० रोजी प्रकाशित झाला. आंबेडकर सिडनेहम कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यामुळे त्यांना उघडपणे संपादक म्हणून काम करता आले नाही, त्यांनी पांडुरंग नंदराम भाटकर नावाच्या महार जातीतील सुशिक्षित तरुणाला पाक्षिकाचे संपादक केले. मुकनायक वृत्तपत्रकाच्या वस्थापकपदी म्हणून ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप यांची नियुक्ती करण्यात आली. आंबेडकरांनी पहिल्या अंकात स्वतः ‘मनोगत’ नावाचा अग्रलेख लिहिला होता. पुढील तेरा अंकातही त्यांनी लेख लिहिले होते. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी मुकनायकाला २५०० रुपयांची आर्थिक मदत केली होती. आंबेडकरांनी मराठीत मूकनायक प्रकाशित केले कारण त्या वेळी मराठी सामान्य भाषा किंवा स्थानिक भाषा होती आणि बाबासाहेबांचे कार्यक्षेत्र (कर्मभूमी) महाराष्ट्र होते. तसेच त्यावेळी महाराष्ट्रातील दलित फारसे शिक्षित नव्हते, त्यांना फक्त मराठी समजत होती.

मूकनायकाचे मुख्य उद्देश दलित, गोरगरीब, दलितांचा आवाज सरकार आणि इतर लोकांसमोर बुलंद करणे हा होता. यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेखणीतून अस्पृश्य निर्वासित समाजावर होत असलेल्या अन्यायाकडे लक्ष वेधले आणि या समाजाच्या उन्नतीसाठी तत्कालीन ब्रिटिश सरकारला काही उपाय सुचवले. अस्पृश्यांच्या उद्धारासाठी किंवा विकासासाठी अस्पृश्यांनी राजकीय सत्ता आणि शैक्षणिक ज्ञान मिळवणे आवश्यक आहे असे त्यांना नेहमीच वाटत असे.

बाबासाहेबांनी आपल्या चळवळीत महिलांना भाग घेण्यास भाग पाडले. 1927 च्या महाडच्या चवदार तळ्या सत्याग्रहात, 1930 च्या नाशिकच्या काळाराम मंदिर सत्याग्रहात आणि 1942 मध्ये नागपूरच्या महिला परिषदेत मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. विवाह हा मुलीच्या प्रगतीतील अडथळा असून, तिच्यावर जबरदस्ती करू नये. लग्नानंतर, स्त्रीने तिच्या पतीची मैत्रीण आणि समान हक्क असलेली सहकारी असावी. तिने आपल्या पतीचे गुलाम होऊ नये. असे मत बाबासाहेबांचे होते.

6 डिसेंबर रोजी दुपारी 12.15 वा. 1956 मध्ये त्यांचे दिल्लीतील निवासस्थानी निधन झाले (महापरिनिर्वाण). तेव्हा त्यांचे वय ६४ वर्षे ७ महिने होते. दिल्लीहून विशेष विमानाने त्यांचे पार्थिव मुंबईत आणण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेत १५ लाखांहून अधिक लोक सामील झाले होते. 7 डिसेंबर 1956 रोजी सायंकाळी 7:50 वाजता मुंबईत बौद्ध संस्कारानुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नमन त्या पराक्रमाला, नमन त्या देशप्रेमाला,
नमन त्या ज्ञानदेवतेला, नमन त्या महापुरुषाला,
नमन अशा आपल्या बाबासाहेबांना..!
ज्ञान सूर्य महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर,
यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

Scroll to Top